Karnataka Foreign Tourist Gang Raped : हम्पी (कर्नाटक) येथे परदेशी महिलेसह दोघांवर बलात्कार

परदेशी आणि देशी पर्यटकांना मारहाण :  एकाचा मृत्यू

हंपी (कर्नाटक) – येथे ७ मार्चच्या रात्री इस्रायलच्या २९ वर्षीय महिलेवर आणि एका भारतीय महिलेवर बलात्कार झाला. या वेळी या महिलांसह ३ पुरुष पर्यटकही उपस्थित होते. यांपैकी एका पुरुष पर्यटकाचा मृतदेह पोलिसांना तलावात आढळून आला आहे. रात्री ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास सानापूर तलावाजवळ ही घटना घडली. इस्रायलची महिला पर्यटक, अमेरिकेतील एक पुरुष पर्यटक, ओडिशा आणि महाराष्ट्र येथील प्रत्येकी एक पुरुष पर्यटक त्यांच्या ‘होम स्टे’ (हॉटेल ऐवजी स्थानिक लोकांच्या घरात रहाणे) मालक महिलेसह याठिकाणी फिरण्यासाठी आले होते. त्या वेळी ही घटना घडली.

१. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पाचही जणांवर आक्रमण करत त्यांना घायाळ केले, तसेच २ महिलांवर लैंगिक अत्याचार केला. सर्व जण रात्री तलावाशेजारी संगीताचा आनंद घेत थांबले होते. त्या वेळी दुचाकीवरून ३ आरोपी तेथे आले आणि त्यांनी पेट्रोल पंपावर जाण्याचा रस्ता विचारला.

२. ‘होम स्टे’ची मालक महिला स्थानिक असल्यामुळे तिने जवळपास पेट्रोल पंप नसल्याचे म्हटले. त्यानंतर दुचाकीवरील आरोपींनी त्यांच्याकडे पेट्रोलची मागणी केली आणि नंतर  पैसे मागू लागले. पर्यटकांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांनी पर्यटकांशी गैरवर्तन केले. महिला पर्यटकांना त्रास देत असतांना इतर ३ पुरुष पर्यटक आरोपींना रोखण्याचा प्रयत्न करत होते.

३. या वेळी आरोपींनी तीनही पुरुष पर्यटकांना बाजूलाच असलेल्या कालव्यात ढकलले. डॅनियल आणि पंकज या दोघांना पोहता येत असल्यामुळे ते पोहत बाहेर आले; पण ओडिशाचा पर्यटक बिबास बुडाला. इतर दोघांना दुखापत झाली असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

४. या गुन्ह्यांच्या अन्वेषणासाठी ६ पथके नेमली गेली आहेत. लवकरच आरोपींना पकडले जाईल. महिलेच्या तक्रारीनंतर आम्ही तात्काळ कारवाई चालू केली आहे, असे पोलिसांनी  सांगितले.

संपादकीय भूमिका

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने तेथे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत ! अशा घटनांमुळे जगात देशाची अपकीर्ती होते, हे काँग्रेस सरकारला कळत आहे का ?