वाशी (नवी मुंबई) येथील सौ. शिल्पा श्रीराम बोरसे यांनी प.पू. डॉक्टरांच्या अनमोल सहवासात अनुभवलेले अविस्मरणीय क्षण !

सौ. शिल्पा श्रीराम बोरसे (पूर्वाश्रमीच्या कु. शिल्पा यशवंत वसाने) या महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना सनातनच्या संपर्कात आल्या. त्यानंतर त्या मुंबई येथील सेवाकेंद्रात सेवा करू लागल्या. ‘तेथे सेवा करत असतांना त्यांना मिळालेला आनंद, त्यांनी प.पू. डॉक्टर अन् (डॉ.) सौ. कुंदाताई (प.पू. डॉक्टरांच्या पत्नी) यांच्या सहवासात अनुभवलेली त्यांची प्रीती आणि त्यानंतर प.पू. डॉक्टरांच्या संपर्कात नसतांनाही त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती’ पुढे दिल्या आहेत.

(भाग १)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. पू. शिवाजी वटकर यांच्या सत्संगापासून साधनेला आरंभ होणे 

‘आम्ही मानखुर्द (मुंबई) येथे रहात होतो. वर्ष १९९५ पासून श्री. शिवाजी वटकरकाका (आताचे सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकरकाका, वय ७८ वर्षे) आमच्याकडे सत्संग घेत होते. मी नियमितपणे सत्संगाला जात होते. काका सत्संग पुष्कळ छान घेत असत. ते अत्यंत आपुलकीने सगळ्यांची विचारपूस करायचे.

२. मुंबई सेवाकेंद्रात सेवेला येणे 

मी मार्च १९९६ मध्ये बारावीची परीक्षा दिली. तेव्हा पू. वटकरकाकांनी मला विचारले, ‘‘आता तू सुटीमध्ये काय करणार आहेस ?’’ माझे तसे काहीच नियोजन नव्हते. तेव्हा पू. काका मला म्हणाले, ‘‘मुंबई सेवाकेंद्रात मराठी ग्रंथांच्या संदर्भातील सेवा करशील का ?’’ त्यावर मी त्यांना ‘हो’ म्हणाले आणि त्यांनी मला सेवाकेंद्रामध्ये नेले.

सौ. शिल्पा बोरसे

२ अ. प.पू. डॉक्टर आणि डॉ. (सौ.) कुंदाताई यांची प्रथम भेट ! : सेवाकेंद्रामध्ये मी प्रथमच प.पू. डॉक्टर आणि डॉ. (सौ.) कुंदाताई (प.पू. डॉक्टरांच्या पत्नी) यांना भेटले. त्या दोघांनीही माझी पुष्कळ प्रेमाने आणि आपुलकीने विचारपूस केली. त्यांना भेटल्यावर ‘मी त्यांना प्रथमच भेटत आहे’, असे मला वाटलेच नाही.

त्यानंतर मी प्रतिदिन सेवाकेंद्रात जाऊ लागले. मी कुंदाताईंना थोडे साहाय्य करत होते, तसेच प.पू. डॉक्टर, श्री. संदीप आळशी (आताचे सनातनचे ११ वे संत, पू. संदीप आळशी, वय ५० वर्षे) आणि श्री. हेमंत रानडे या सर्वांच्या साहाय्याने ग्रंथांच्या संदर्भातील सेवा शिकत होते. मी ‘लिखाणाचे व्याकरण तपासणे, एखाद्या शब्दाचा अर्थ शब्दकोषात शोधणे’ अशा सेवा करत होते.

२ आ. प.पू. डॉक्टर आणि डॉ. (सौ.) कुंदाताई यांच्याविषयी ओढ वाटणे : माझे महाविद्यालय चालू झाले. माझे महाविद्यालय माटुंग्याला होते. सकाळी ११ वाजता महाविद्यालय संपल्यानंतर मी सेवाकेंद्रात जायचे. तेथे मला पुष्कळ आपलेपणा वाटायचा. प.पू. डॉक्टर आणि सौ. कुंदाताई यांच्याविषयी मला ओढ वाटायची.

२ इ. सेवा करतांना पुष्कळ आनंद मिळणे : सेवाकेंद्रात गेले की, मला बाहेरच्या जगाशी संबंध तुटल्यासारखे वाटायचे. मी प.पू. डॉक्टर आणि कुंदाताई यांनी सांगितलेली सेवा करायचे. बाकी मला काही कळत नसे; पण मला पुष्कळ आनंद मिळायचा.

२ ई. साधकांचा अनुभवलेला प्रेमभाव ! : सेवाकेंद्रातील सर्व साधक पुष्कळ प्रेमळ होते. सर्वश्री सत्यवानदादा (आताचे सद्गुरु सत्यवान कदम), दिनेशदादा (श्री. दिनेश शिंदे, आताची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५७ वर्षे), हेमंतदादा (श्री. हेमंत रानडे), मनोजदादा (श्री. मनोज कुवेलकर, आताची आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ५६ वर्षे), कु. शिल्पा प्रभु (आताच्या सौ. आरती नाडकर्णी), हे सगळे जण फार चांगले होते. या सगळ्यांनी मला समजून घेतले आणि सेवेत पुष्कळ साहाय्य केले.

३. विवाह ठरणे आणि प.पू. डॉक्टरांनी विवाह जमण्याचे सांगितलेले आध्यात्मिक कारण 

मी १४ वीला असतांनाच माझे लग्न ठरले. मी प.पू. डॉक्टरांना सांगितले, ‘‘मी लग्न करणार नाही. मला सेवा करायला आवडते.’’ तेव्हा प.पू. डॉक्टर मला म्हणाले, ‘‘ज्यांच्याशी आपले देवाण-घेवाण असते, तेच लोक आपल्या सभोवती किंवा नातेवाईक म्हणून येतात. तू जर हे देवाण-घेवाण या जन्मात संपवले नाहीस, तर असा योग जुळून यायला पुष्कळ जन्म घ्यावे लागतील. त्यामुळे हे योग जुळून आले आहेत, तर या जन्मी ते पूर्ण करून टाक.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘साधनेच्या दृष्टीने हे स्थळ चांगले आहे.’’

४. विवाह 

जानेवारी १९९८ मध्ये माझे लग्न झाले. माझ्या लग्नाला प.पू. डॉक्टर, कुंदाताई आणि सेवाकेंद्रातील सगळे साधक आले होते; म्हणून मला पुष्कळ आनंद झाला होता.

५. प.पू. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे केवळ दोन मास अभ्यास करूनही परीक्षेत उत्तीर्ण होणे

जेव्हा माझे लग्न झाले, तेव्हा मी १५ वीत होते; म्हणून मी ३ मास अभ्यासासाठी माहेरी आले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी मी प.पू. डॉक्टरांना भेटायला गेले आणि म्हणाले, ‘‘मी १५ वी पास होईन’, असे मला वाटत नाही. मला अध्यात्मच शिकायचे आहे आणि साधक बनायचे आहे, तर मग या पदवीचा मला तसाही काही उपयोग नाही. मी शिक्षण सोडते.’’ तेव्हा कुंदाताई म्हणाल्या, ‘‘तू शिक्षण अर्धवट सोडू नकोस’’ आणि प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘तू आजपासून अभ्यास केलास, तर निश्चितच उत्तीर्ण होशील !’’

मी केवळ दोनच मास अभ्यास केला. मे मासात माझी परीक्षा झाली आणि मी उत्तीर्ण झाले. मी हे प.पू. डॉक्टरांना सांगितल्यावर ते हसून म्हणाले, ‘‘मी सांगितले होते ना तुला !’’

– सौ. शिल्पा श्रीराम बोरसे, वाशी, नवी मुंबई. (१८.६.२०२४)

(क्रमशः)

या लेखाचा भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/891292.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक