उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. वेदिका शैलेश मोदी ही या पिढीतील एक आहे !
‘फाल्गुन शुक्ल नवमी (८.३.२०२५) या दिवशी जोधपूर (राजस्थान) येथील कु. वेदिका शैलेश मोदी हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. वेदिका शैलेश मोदी हिला सनातन परिवाराच्या वतीने १८ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
‘वर्ष २०१८ मध्ये ‘कु. वेदिका शैलेश मोदी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२५ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५९ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२२.२.२०२५)
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. इतरांना चुकांची जाणीव करून देणे
‘एकदा विद्यालयात शिक्षकांनी एका कार्यक्रमात सर्व मुलांना सहभागी न करता काही ठराविक मुलांना संधी दिली होती. वेदिकाला हे चुकीचे वाटले. तिने शिक्षकांना त्यांच्या या चुकीविषयी सांगितले. ‘सर्व मुलांना संधी मिळाली पाहिजे आणि मुलांचा विकास करण्याचे दायित्व शिक्षकांचे आहे’, असे तिने शिक्षकांना सुचवले.

२. ईश्वरावरील श्रद्धेत वाढ होणे
मागील वर्षी आम्ही विदेशात जाण्यासाठी विमानतळावर पोचल्यावर वेदिकाच्या मनात ‘मी आणि आई भारतात परत येणार नाही’, असे नकारात्मक विचार येऊ लागले. तेव्हा तिने भ्रमणभाषवर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप लावला. त्या वेळी तिला श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवले आणि ‘तोच आमचे रक्षण करणार आहे’, अशी वेदिकाच्या मनात श्रद्धा निर्माण झाली.
३. धर्माभिमान
अ. एकदा तिच्या सर्व मित्र-मैत्रिणी एक चित्रपट पहायला जाणार होते. ‘त्या चित्रपटात देवतांचा अपमान केला असून आपल्या संस्कृतीची चेष्टा केली आहे’, असे तिला कळले. तेव्हा ती चित्रपट बघायला गेली नाही. दुसर्या एका चित्रपटात भगवान शिवाचे विडंबन केले होते. त्याविषयी वेदिकाने तिच्या मैत्रिणींना सांगून चित्रपट पहाण्यापासून रोखले.
आ. वेदिका नेहमी शाळेत कुंकू लावून जाते. शाळेत कुंकू लावून येण्यामुळे तिला पुष्कळ वेळा विरोध करण्यात आला. तेव्हा तिने सर्वांना ‘मला माझ्या धर्माचे पालन करण्याचा पूर्ण अधिकार आहे’, असे सांगितले. तिने हिंदु धर्मातील कुंकू लावण्याचे शास्त्र इतरांनाही समजावून सांगितल्याने तिच्या २ – ३ मैत्रिणींनीही कुंकू लावण्यास आरंभ केला.
४. गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर निर्भयपणे नृत्य करता येणे
एकदा वेदिका महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या आध्यात्मिक संशोधन केंद्रात असतांना नृत्याचे संशोधनपर प्रयोग चालू होते. त्या वेळी तिला आलेली अनुभूती तिच्याच शब्दांत देत आहे. ‘संशोधनाच्या दृष्टीने ‘आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांवर नृत्याचा काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी त्या साधकांसमोर मला नृत्य करायचे होते. त्या साधकांसमोर नृत्य करण्याच्या कल्पनेने आधी मला पुष्कळ भीती वाटत होती. तेव्हा मला ‘सर्वप्रथम आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांसमोर नृत्य करायला आवडेल कि त्रास नसलेल्या ?’, असे विचारण्यात आले. तेव्हा मी परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांना प्रार्थना केली, ‘हे गुरुदेव, आता तुम्हीच मला सुचवा.’ मी डोळे मिटल्यावर मला एक दृश्य दिसले, ‘मी त्रास असलेल्या साधकांच्या समोर नृत्य करत असून त्यांच्या त्रासामध्ये वाढ झालेली असतांनाही मी निर्भयपणे नृत्य सादर करत आहे आणि त्या वेळी माझी दृष्टी केवळ गुरुदेवांवरच आहे.’ या दृश्यानंतर मी सांगितले की, मला सर्वप्रथम त्रास असणार्या साधकांसमोर नृत्य करायला आवडेल. त्यानंतर मला त्या साधकांच्या समोर नृत्य करतांना जराही भीती वाटली नाही आणि पुष्कळ आनंद मिळाला.’
– सौ. राखी मोदी (कु. वेदिकाची आई) (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४२ वर्षे), जोधपूर, राजस्थान. (१२.५.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |
|