ईश्वरपूरला (जिल्हा सांगली) प.पू. भक्तराज महाराज यांनी अध्यात्मातील अनेक विषयांवर मार्गदर्शन करून दिलेला आशीर्वाद आणि त्या आशीर्वादरूपी बोलाचा उलगडणारा भावार्थ !

२४ नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘प.पू. भक्तराज महाराज यांचे श्रेष्ठत्व बुद्धीला पटणे, प.पू. बाबांनी प्रथम भेटीतच ‘दुःखाचे जे मूळ’ या भजनाचा अर्थ उलगडून सांगतांना पतीच्या अहंकाराची जाणीव करून देणे आणि त्यातून त्यांच्या आध्यात्मिक अधिकाराची जाणीव होणे’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

भाग २.

भाग १. वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा :  https://sanatanprabhat.org/marathi/857306.html

प.पू. भक्तराज महाराज

५. ‘व्यावहारिक जीवनापेक्षा अध्यात्म अधिक महत्त्वाचे आहे, तर वैद्यकीय व्यवसाय का करायचा ?’, असा प्रश्न निर्माण होणे आणि प.पू. बाबांनी ईश्वरपूरला बोलावल्याचा निरोप येणे 

सनातन संस्थेच्या प्रथम अभ्यासवर्गात समजल्यानुसार माझा नामजप चालू झाला होता. अनुमाने ३ मासांनंतर मला प.पू. बाबांच्या भजनांची गोडी लागली आणि ‘आता अन्य काही वाचायला नको’, असे मला वाटू लागले. माझ्या मनावर नामाचे महत्त्व ठसले होते. मनात प्रश्न निर्माण झाला होता की, ‘जर ‘नामजप’ आणि ‘अध्यात्म’ हे सामान्य व्यावहारिक जीवनापेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत’, तर आपण वैद्यकीय व्यवसाय करून काय करणार ?’ अशातच प.पू. बाबा ईश्वरपूर येथे येणार आहेत’, असे मला समजले. सौ. नंदिनी (पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत) हिला त्यांच्या दर्शनाला जायची इच्छा होती. माझ्या मनातही इच्छा होती. एवढ्यात एका सकाळी ईश्वरपूरहून प.पू. बाबांच्या भक्ताचा दूरभाष आला, ‘‘प.पू. बाबा आले आहेत. तुम्ही येत आहात ना ? ते बोलवत आहेत.’’ मला फारसे काही आकलन झाले नाही; पण लगेच आमच्या रुग्णालयात ‘आम्ही दोन दिवस येणार नाही’, असे सांगितले आणि बसने ईश्वरपूरला रवाना झालो. तेथे आम्हाला ‘प.पू. बाबांचे म्हणजे दिसायला सामान्य वृद्धाचे प्रथम दर्शन झाले; परंतु काहीतरी अवर्णनीय आकर्षण असलेली ती व्यक्ती आहे’, असे वाटले.

५ अ. ‘प.पू. बाबांनी बोलावले की जायचे आणि ते सांगतील तेव्हाच त्यांच्याकडून निघायचे’, ही वहिवाट बनणे : प.पू. बाबा सांगली परिसरात यायचे. ते आल्याचे समजले की, ‘आम्ही हातचे सर्व सोडून तिकडे जायचो. ते सांगतील तोपर्यंत तेथे थांबायचो आणि ‘त्यांनी सांगितल्यानंतरच तेथून परत निघायचो.’ ही आमची वहिवाट बनली. ते अन्य ठिकाणी सोबत यायला सांगायचे. तेव्हाही तसेच घडत असे.

५ आ. प.पू. बाबांनी ‘तुमचे गुरु मोठे थोर म्हणून तुम्हाला हे चरण भेटले’, असे सांगणे : ६.३.१९९४ या दिवशी ईश्वरपूरला मी प.पू. बाबांचे दर्शन घ्यायला जाताच त्यांनी नुसते पाहिले आणि मला आपल्यासमोर बसायला सांगितले. ते एकच वाक्य बोलले, ‘‘तुमचे गुरु मोठे थोर; म्हणून (तुम्हाला) हे चरण भेटले !’’ त्या वेळी मला लगेच काही या वाक्याचा अर्थ समजला नाही. नंतर मला वाटले, ‘पूर्वजन्मी आपले कुणी गुरु असावेत आणि त्यांच्या कृपेने मी प.पू. बाबांपर्यंत पोचलो आहे. पुढे अभ्यास करतांना समजले, ‘ईश्वरानुग्रह झाल्याने मनुष्य साधनेकडे वळतो. नंतर त्याला गुरूंची प्राप्ती होते.

५ इ. प.पू. बाबांनी रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत अध्यात्मातील अनेक विषयांवर बोलणे आणि त्या वेळी ‘प्रत्यक्ष ईश्वरच स्वतःविषयी सांगत आहे’, असे वाटणे : त्या दिवशी मी प.पू. बाबांना माझ्या मनात भेडसावत असलेला प्रश्न विचारला, ‘‘मला सर्व व्यवसाय सोडून ‘नामजपादी साधना करावी’, असे वाटू लागले आहे, तर मी काय करावे ?’’ ते म्हणाले, ‘‘प्रारब्ध भोगायचे आहे. त्यामुळे काही सोडायचे नाही. नंतर विस्ताराने सांगतो.’’ रात्री ९ वाजता अकस्मात् त्यांनी माझ्याशी बोलायला आरंभ केला. ते थेट १२ वाजेपर्यंत बोलत राहिले. आम्ही दोघे (मी आणि पत्नी) त्यांच्या पायांशी बसलो होतो. अन्य भक्त भोवताली बसले होते. ते म्हणाले, ‘‘स्थूल आणि सूक्ष्म, म्हणजेच ‘अपरा आणि परा’, अशा दोन विद्या आहेत. तुम्ही स्थुलाचा अभ्यास करता. आम्हाला सूक्ष्मही समजते.’’ त्यांनी ‘नामसाधना, गुरु, गुरुकृपा, अद्वैतदर्शन, ब्रह्म, माया, भजन, साधना, पुरुष-प्रकृती म्हणजे काय ? भविष्यात काय होणार ?’, आदी अध्यात्मातील सर्व विषय सांगितले. आम्ही या अनोख्या कृपेच्या वर्षावात अक्षरशः चिंब भिजलो. त्या वेळी मला ‘प्रत्यक्ष ईश्वर स्वतःविषयी सांगत आहे’, असे वाटले. तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले, ‘‘सहजसमाधी’ हेच ध्येय ठेवा. त्याच्या खालचे ध्येयच नको.’’ मला परत परत हेच वाटत राहिले की, ‘प्रत्यक्ष ईश्वर स्वतःविषयी सांगत आहे. हा अनमोल योग आहे.’

५ ई. प.पू. बाबांनी दिलेले दोन आशीर्वाद !

५ ई १. तुला शेवटी अनाहत नादाची अनुभूती येईल ! : वरील बोलणे झाल्यानंतर त्यांनी मला दोन आशीर्वाद दिले, ‘‘तुला शेवटी अनाहत नादाची अनुभूती येईल. आज मी जे सांगितले, ते तुला समजले नसेल; परंतु पुढे जेव्हा समजेल, तेव्हा तुला स्मरण होईल की, मी हे आधीच सांगितले होते.’’

५ ई २. ‘जिसने पायो उसने छिपायो, वहीं नर सच्चा गुरु का बच्चा ।’ हे सांगून प.पू. बाबांनी त्याचा अर्थही सांगणे : दुसर्‍या आशीर्वादाची थोरवी, म्हणजे ‘अध्यात्म-तत्त्वज्ञान आदींमध्ये पुढे मला काही समजले, तर ‘मला समजले’, हा अहं होऊ नये, याची त्यांनी घेतलेली काळजी आहे. बीजरूपाने त्यांनी जे रोवले, तेच उगवून येत आहे. ‘अनूभूती कोणती येत आहे ? कोणती यायला हवी ?’ याचाही विचार करू नये; कारण जे मिळणार आहे, ते त्या त्या वेळी त्यांच्या कृपेनेच मिळणार आहे. हे काही काळानंतर हळूहळू माझ्या लक्षात आले. त्या वेळी मला एवढेच वाटले, ‘काही अनुभूती आली, तर मला प.पू. बाबांचे स्मरण होईल.’

आता लक्षात येत आहे की, पुढे अगदी शेवटी त्यांनी सांगितले, ‘‘जिसने पायो उसने छिपायो, वहीं नर सच्चा गुरु का बच्चा ।’’ हे सांगून त्याचा अर्थही सांगितला, ‘म्हणजे ज्याच्यावर गुरूंची किंवा देवाची कृपा होते, तो कुणाला सांगत फिरत नाही, ‘माझ्यावर कृपा झाली आहे.’ हे सर्व तो गुपितच ठेवतो. अशा प्रकारे आत्मस्तुती न करणाराच ईश्वराला प्रिय असतो.’

५ उ. प.पू. बाबांनी नामाविषयीचा विकल्प दूर करून नामजपाच्या फलितासंबंधी आशीर्वाद देणे 

डॉ. दुर्गेश सामंत

५ उ १. प.पू. बाबांसमवेत असलेल्या भक्तांनी ‘प.पू. बाबा प्रसन्न आहेत, तर गुरुमंत्र मागून घ्या’, असा आग्रह करणे, त्या वेळी प.पू. डॉक्टरांचे वाक्य स्मरणे आणि ‘गुरुमंत्र मागावा कि नको ?’, असा प्रश्न पडणे : वरील सर्व संवाद प.पू. बाबांच्या समवेत वर्षानुवर्षे राहिलेल्या भक्तांना अगदी नवीन होता. श्री. आणि सौ. भोसले म्हणाले, ‘‘मागील १७ वर्षांत प.पू. बाबांना असे बोलतांना आम्ही कधी पाहिलेले नाही.’’ नंतर ते माझ्या मागे लागले, ‘‘प.पू. बाबा तुमच्यावर प्रसन्न आहेत. हीच वेळ आहे गुरुमंत्र मागून घ्यायची. त्यांच्याकडून गुरुमंत्र मिळायला वर्षानुवर्षे वाट पहावी लागते. आज ते प्रसन्न आहेत, तर गुरुमंत्र मागून घ्या.’’ प्रथम मी ते फारसे मनावर घेतले नाही; कारण अभ्यासवर्गात प.पू. डॉक्टरांनी सांगितले होते, ‘गुरुमंत्र मागायचा नसतो, गुरूंना द्यायचा तेव्हा ते देतातच.’ तरी ते भक्त, तसेच अन्य काही जण परत परत येऊन मला सांगू लागले, ‘‘नंतर आयुष्यभर तुम्ही पस्तवाल. आता योग्य वेळ आहे, तर ही संधी सोडू नका. गुरुमंत्र मागून घ्या.’’ मी तसे केले नाही; परंतु मनात विकल्प मात्र तयार झाला की, ‘खरेच गुरुमंत्र मागायला हवा कि नको ?’

५ उ २. प.पू. बाबांनी मनातील गुरुमंत्राविषयीचे विचार ओळखून ‘तू कोणतेही नाम घे. ते एकाच चैतन्याकडे जाईल’, असे सांगणे आणि त्यानंतर मनातील संघर्ष थांबणे : नंतर एक दिवस उलटल्यावर दुपारच्या वेळी प.पू. बाबांचा निरोप आला, ‘परत सांगलीला जा.’ जातांना दर्शन घेण्यासाठी मी त्यांच्या खोलीत गेलो. तर ते भिंतीकडे तोंड करून निजलेले दिसले. खोलीत अंधार होता. मी नंदिनीला म्हटले, ‘‘आपण लांबूनच नमस्कार करूया आणि मनातूनच ‘येतो’, असे सांगूया. बांगड्यांचा आवाज न करताच नमस्कार कर.’’ आम्ही मांजराच्या पावलाने आत जाऊन आवाज होऊ न देता भूमीवर अगदी वाकून नमस्कार केला. तेव्हा ‘गाढ झोपले आहेत’, असे वाटणारे प.पू. बाबा अकस्मात् कुशीवर वळले आणि माझ्याकडे तोंड करून म्हणाले, ‘‘तू कोणतेही नाम घे. ते एकाच चैतन्याकडे जाईल !’’ ‘नाम कोणते घ्यावे ?’, हा माझ्या मनात चाललेला संघर्ष तेथेच संपला.

६. प.पू. बाबांनी आशीर्वादाचे उलगडलेले विविध भावार्थ ! 

आजपावेतो मधून मधून ‘तू कोणतेही नाम घे. ते एकाच चैतन्याकडे जाईल !’, हे वाक्य स्मरून या आशीर्वादाचे नवे नवे अर्थ माझ्या मनात उलगडत राहिले.

अ. प्रथम ‘कोणतेही नाम घेतले, तरी ते एकाच देवाकडे जाणार आहे’, (‘अनेकातून एकात’ याप्रकारे) असे वाटले. त्या वेळी ‘नाम, चैतन्य, मी आणि अनुभूती’, हे सर्व मनात वेगळे वेगळे होते. नंतर ‘कोणतेही नाम घेतले, तरी एकच अनुभूती येणार’, असे वाटले आणि तसे होतही राहिले.

आ. नंतर मला ‘देवाचा शोध घ्यायचा आहे’, असे वाटले. आजकाल मी ‘गीतादी अद्वैत ग्रंथांचे प्रतिदिन थोडे वाचन करतो. ‘ती प्रेरणा, वाचनातून होणारा बोध, त्याचा स्वतःवर होणारा परिणाम आदी सर्व त्या आशीर्वादाचे फलित आहे,’ असे मला वाटते.

इ. दीर्घकाळानंतर ‘नाम हेच चैतन्य आहे’, हे उमजले. ‘नाम नाण्याची एक बाजू, तर चैतन्य ही दुसरी बाजू आहे’, असे वाटले.

ई. सध्या ‘चैतन्य म्हणजे नाम आणि ते माझ्यातच आहे’, असे मला जाणवते.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.४.२०२४)

भाग ३. वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/861414.html

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.