Madras University Programme On Christianity : मद्रास विद्यापिठात ‘भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रचार कसा करायचा ?’ या विषयावर होणार व्याख्यान !

तमिळ ब्राह्मण न्यायमूर्तींच्या नावाने आयोजित कार्यक्रम !

(द्रमुक म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम्, म्हणजेच द्रविड प्रगती संघ)

‘भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रचार कसा करायचा ?’ या विषयावर एका व्याख्यानाचे आयोजन !

चेन्नई (तमिळनाडू) : मद्रास विद्यापिठात ‘भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रचार कसा करायचा ?’ या विषयावर एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे १०० वर्षांपूर्वीचे मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि एक तमिळ ब्राह्मण एस्. सुब्रमणिया अय्यर यांच्या नावाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ मार्चला आयोजित होणार्‍या या कार्यक्रमात के. सिवा कुमार हे भाषण करणार असून व्याख्यानाचे पत्रक सध्या सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहे. या विरोधात सामाजिक माध्यमांत हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

१. प्रसारित झालेल्या या पत्रकानुसार, विद्यापिठाच्या ‘प्राचीन इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्र विभागा’ने ‘सर एस्. सुब्रमणिया अय्यर एंडोमेंट लेक्चर’अंतर्गत ‘भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रचार कसा करावा ?’, तसेच ‘हा धर्म का आवश्यक आहे ?’ या विषयांवर व्याख्यानाचे आयोजन केले आहे.

२. या व्याख्यानाचे मुख्य वक्ते अभियंता के. शिवकुमार, (मुख्य अभियंता, भाग्यनगर) असतील.

३. विशेष म्हणजे, विद्यापिठात ख्रिस्ती अध्ययनासाठी वेगळा विभाग असतांना प्राचीन इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्र विभागाने हे धार्मिक व्याख्यान आयोजित करणे संशयास्पद मानले जात आहे.

व्याख्यानाचे सर्वत्र प्रसारित होत असलेले पत्रक
(चित्रावर क्लिक करा)

विद्यापिठाच्या प्रतिष्ठेवर परिणाम !

मद्रास विद्यापिठाने सुप्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन्, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्, भौतिकशास्त्रज्ञ सी.व्ही. रामन, हिंदु आध्यात्मिक गुरु स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांच्यासारख्या अनेक महान व्यक्तीमत्त्वांना घडवले आहे. ही घटना मात्र मद्रास विद्यापिठाच्या प्रतिष्ठेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे.

भाजपकडून विरोध !

‘मद्रास विद्यापिठात ‘भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रचार कसा करावा ?’ या विषयावर व्याख्यान ! कट्टरतावाद ? अतिरेकी प्रचार ? कुणाला काही बोलायचे आहे का ?’, अशा शब्दांत तमिळनाडूतील भाजपचे राज्य सचिव डॉ. एस्.जी. सूर्या यांनी ‘एक्स’वरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दुसरीकडे ज्येष्ठ विचारवंत एस्. गुरुमूर्ती यांनी म्हटले की,

‘या कार्यक्रमामुळे ख्रिस्ती धर्माची प्रतिष्ठा वाढत नाही, उलट यामुळे ख्रिस्ती धर्माने केवळ व्यक्तींनाच नव्हे, तर बौद्धिक संस्थांनाही फसव्या मार्गाने प्रभावित केले आहे, हे सिद्ध होते.’

संपादकीय भूमिका

  • शाळेत श्रीमद्भगवद्गीता शिकवण्याच्या सूत्रावरून ‘शिक्षणाचे भगवेकरण’ केले जात असल्याचा आरोप करणारे आता ‘शिक्षणाचे ख्रिस्तीकरण’ केले जात असल्याचा आरोप करत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • मद्रास विद्यापीठ हे सरकारी विद्यापीठ असूनही ते अशा प्रकारे ख्रिस्त्यांच्या प्रचारासाठी कार्य करत असणे संतापजनक आहे. कार्यक्रम आयोजित करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई होण्यासाठी आता हिंदूंनी तमिळनाडू सरकारवर दबाव आणला पाहिजे !
  • प्रखर हिंदुद्वेष्ट्या द्रमुक सरकारच्या राज्यात अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जाणे, यात काय आश्चर्य ? धर्मनिरपेक्षतेचा ढोल बडवणारे मात्र यावर काहीएक बोलणार नाहीत, हेही तितकेच खरे !