
जयपूर (राजस्थान) – राजस्थान विधानसभेत भाजपचे आमदार गोपाल शर्मा यांनी काँग्रेसचे आमदार आणि मुख्य प्रतोद रफिक खान यांना सतत ‘पाकिस्तानी’ म्हटल्याने गदारोळ झाला. विरोधकांनी सभागृहात याचा निषेध व्यक्त केला. नगरविकास आणि गृहनिर्माण अनुदानाच्या मागणीवर चर्चा चालू असतांना ही घटना घडली.
१. रफिक खान यांनी त्यांच्या भाषणात काँग्रेस आणि भाजप सरकार यांची तुलना केली. त्या वेळी गोपाल शर्मा यांनी खान यांचा ‘पाकिस्तानी’ असा उल्लेख केला. यानंतर खान यांनी विधानसभा अध्यक्षांना याची माहिती देऊन यात लक्ष घालण्यास सांगितले. अध्यक्ष संदीप शर्मा यांनी भाजप आमदारांना खाली बसण्याचे निर्देश दिले.
२. विरोधी पक्षनेते टिकाराम जुली यांनीही या टिप्पणीवर आक्षेप घेत म्हटले की, हे काय चालू आहे ? इथे लोकशाहीची थट्टा चालू आहे. एक माणूस मनात येईल ते बोलत आहे. अशा प्रकारे एखाद्याचा अवमान करणे चुकीचे आहे.
३. मागच्या वर्षी जयपूर महानगरपालिकेच्या हेरिटेज विभागाच्या बैठकीतही दोन्ही नेते एकमेकांना भिडले होते. या बैठकीत शर्मा म्हणाले की, ते जयपूरला ‘छोटा पाकिस्तान’ होऊ देणार नाहीत. तेव्हाही काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये वाद झाला होता. या वादानंतर शर्मा म्हणाले की, खान जयपूरचे ‘महंमद अली जिन्ना’ बनण्याचा प्रयत्न करत आहेत.