जेजुरीच्या खंडेरायाला वाहिल्या जाणार्‍या भंडार्‍यात भेसळ होत असल्याचा माजी विश्वस्तांचा आरोप !

भेसळयुक्त भंडार्‍याच्या उधळणीमुळे जेजुरी गडाच्या ऐतिहासिक दगडांवर परिणाम !

पुणे – प्रत्येक महिन्याला लाखोंच्या संख्येने भाविक जेजुरीच्या खंडेरायाला येत असतात, तसेच जेजुरीच्या वर्षभरात ८ ते ९ यात्रा भरतात आणि याच काळात मोठ्या प्रमाणात भंडार्‍याची उधळण केली जाते. वर्षाकाठी साधारणपणे काही टन भंडारा उधळला जातो. जेजुरीच्या खंडेरायाला वाहिल्या जाणार्‍या या भंडार्‍यात भेसळ होत असल्याचा आरोप माजी विश्वस्त शिवराज झगडे यांनी केला आहे. याची थेट तक्रार त्यांनी अन्न आणि औषध मंत्री नरहरि झिरवळ यांच्याकडे केली आहे.

जेजुरी गडाच्या ऐतिहासिक दगडांवर परिणाम !

‘यलो पावडर’ म्हणजेच ‘नॉन ईडीबल टरमरीक पावडर’ या नावाने येथे भेसळयुक्त भंडारा विकला जात आहे. यात्रा उत्सव काळात मोठ्या प्रमाणावर याची विक्री होते. या भंडार्‍यामुळे त्वचेची आग होणे, डोळे चुरचुरणे, त्वचेवर काळे डाग पडणे या समस्या जाणवतात. या भंडार्‍यामध्ये होत असलेल्या भेसळीमुळे भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे भेसळयुक्त भंडार्‍याच्या उधळणीमुळे जेजुरी गडाच्या ऐतिहासिक दगडांवर परिणाम होत असल्याचा अहवाल, मागील काळात पुरातत्व विभागाने दिला असून त्यावर निर्बंध घालण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या आहे.

संपादकीय भूमिका :

जेजुरी येथील भंडार्‍यात भेसळ होत असल्याचा केवळ आरोप न करता संबंधितांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक !