रुईघर (सातारा) येथे अनधिकृत उत्खनन करणार्‍यांना २० लाख रुपयांचा दंड !

प्रतिकात्मक चित्र

सातारा, २ एप्रिल (वार्ता.) – जावळी तालुक्यातील रुईघर येथे अनधिकृत उत्खनन केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे जावळीचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी दिलीप घाडगे आणि महेश देशमुख या दोघांवर १९ लाख ८९ सहस्र रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. जावळी तहसीलदार कार्यालयामध्ये स्थानिक ग्रामस्थ रामचंद्र बेलोसे यांनी याविषयी तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानुसार तहसीलदार कोळेकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. त्यानंतर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

घटनास्थळी १९७ ब्रास दगड आणि गोट्यांचे उत्खनन करण्यात आले आहे. याचे बाजारमूल्य ३ लाख ७४ सहस्र ३०० रुपये आहे, तसेच याची रॉयल्टी १ लाख १८ सहस्र २०० रुपये आहे. यावर पाचपट दंड आकारणी केली असून एकूण दंड रक्कम १९ लाख ८९ सहस्र ७०० रुपये निश्चित करण्यात आला आहे. तपासणीनुसार दिलीप घाडगे आणि महेश देशमुख यांनी ‘इको सेन्सिटिव्ह झोन’मध्ये अनधिकृतपणे उत्खनन केले आहे.

तहसीलदार कोळेकर यांनी केवळ घटनास्थळी आढळून आलेल्या दगड आणि गोट्यांवर कारवाई केली आहे; मात्र यापूर्वी तेथून वाहतूक करून विक्री केलेले दगड आणि गोट्यांची मोजणी करून योग्य ती दंडाची आकारणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.