बद्दी (हिमाचल प्रदेश) येथील काँग्रेस आमदाराच्या पत्नीला दंडित केल्याची शिक्षा !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – हिमाचल प्रदेशात असलेल्या बद्दी येथील पोलीस अधीक्षक इलमा अफरोज या सध्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. राज्यातील काँग्रेस सरकार त्यांच्यावर नाराज असल्याने सरकारने त्यांना सक्तीच्या दीर्घ रजेवर पाठवले आहे. यामुळे अफरोज त्यांच्या आईसमवेत उत्तरप्रदेशातील त्यांच्या गावी परतल्या आहेत. अफरोज यांनी काँग्रेसचे आमदार राम कुमार चौधरी यांच्या पत्नीच्या चारचाकीच्या संदर्भात नियमभंग केल्याने दंड ठोठावला होता. यामुळे आमदार संतप्त झाले.
या घटनेवरून राजकारणही तापले आहे. काँग्रेसला केवळ मुसलमानांची मते हवी आहेत, प्रत्यक्षात ती त्यांच्या भल्यासाठी काहीही करत नाही, असा आरोप भाजपच्या नेत्या कौसर जहां यांनी केला.
काय आहे प्रकरण ?
बद्दी येथील पोलीस अधीक्षक इलमा अफरोज यांचा काँग्रेसचे आमदार रामकुमार चौधरी यांच्याशी वाद झाला होता. अलीकडेच अफरोज यांनी चौधरी यांच्या पत्नी कुलदीप कौर यांच्या वाहनांसाठी दंड ठोठावला होता. याखेरीज अफरोज यांनी एका भंगार व्यावसायिकाला अटक केली होती. तोही काँग्रेस आमदाराच्या जवळचा असल्याचे सांगितले जाते. अफरोज यांनी मुसलमानांना मोठ्या प्रमाणात परवाने दिल्याचाही आरोप काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी केला होता; परंतु माहितीच्या अधिकारात असे समोर आले की, त्यांच्या ९ महिन्यांच्या कार्यकाळात अफरोज यांनी एकूण ५० बंदुकांचे परवाने दिले. त्यांपैकी ४८ हिंदूंना आणि २ मुसलमानांना देण्यात आल्या. यातून काँग्रेसचा खोटारडेपणाही उघड झाला. अन्यही अशा काही घटना घडल्या, ज्यात अफरोज तत्त्वनिष्ठ राहिल्या. त्यांच्यावर सत्ताधारी काँग्रेस सरकारकडून दबाव आणण्यात आला, तरीही त्या बधल्या नाहीत.
संपादकीय भूमिका
|