चीनचा पाकिस्तानी सुरक्षा दलावरील विश्वास उडाला !
इस्लामाबाद – पाकिस्तानमधील चिनी नागरिकांवर सातत्याने होणार्या आक्रमणांमुळे चीनचा पाकिस्तानी सुरक्षा दलावरील विश्वास उडाला आहे. चीनला त्याच्या कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानात चिनी सैनिक तैनात करायचे आहेत. पाकिस्तानमध्ये काम करणार्या सहस्रावधी नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी चीन सरकार पाकिस्तानवर चीनचे सैन्य तैनात करण्याची अनुमती देण्यासाठी दबाव आणत आहे.
१. गेल्या महिन्यात कराची विमानतळाजवळ झालेल्या स्फोटात दोन चिनी अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे चीनचा संताप चांगलाच वाढला आहे. यामुळे पाकिस्तान सरकारला संयुक्त सुरक्षा व्यवस्थापन प्रणालीसाठी औपचारिक वाटाघाटी चालू करण्यास भाग पाडले आहे.
२. चीनने पाकिस्तानमधील सुरक्षेच्या सूत्रांवर अनेक वेळा उघडपणे चिंता व्यक्त केली आहे. चीनच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व पावले उचलण्याचे आश्वासन पाकिस्तानने दिले असले, तरी आक्रमणे थांबत नसल्याने चीन निराश झाला आहे.
३. पाकिस्तानी अधिकार्यांनी सांगितले की, इस्लामाबादमधील केवळ चीनचे दूतावास आणि त्यांचे वाणिज्य दूतावास यांमध्ये चिनी सुरक्षा कर्मचारी ठेवण्याची अनुमती आहे.