नगर – येथील सावेडी येथे कॅफेचालक तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत आहेत, तसेच तोफखाना हद्दीत मटका आणि बिंगो जुगाराचे अड्डे चालू आहेत. याच हद्दीत मंगळसूत्र चोरीचे प्रकार होत आणि अवैध कॅफेही चालू आहेत. काही महिन्यांपूर्वी गुन्हे शाखेने धाडी घालून कॅफेचालकांच्या मुसक्या आवळल्या होत्या; परंतु पुन्हा तशीच स्थिती झाली आहे. (गुन्हेगारांना पोलिसांचे भय नसणे, हे पोलिसांसाठी लज्जास्पद ! पोलीस ही स्थिती पालटण्यासाठी काय प्रयत्न करणार ? – संपादक)
याविषयी तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी सांगितले की, तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालू असलेल्या कॅफेचालकांच्या विरुद्ध आमच्या कारवाया चालूच आहेत. आतापर्यंत १५ ते २० जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. पुन्हा कॅफे चालू झाले असतील, तर त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. (कॅफे पुन्हा चालू झालेले पोलिसांना समजत नाही का ? असे असेल, तर गुन्हेगारांवर पोलिसांची वचक कधीतरी बसेल का ? – संपादक)