निवडणूक विशेष

उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची झडती !

वणी (जिल्हा यवतमाळ) – येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची झाडाझडती घेण्यात आली. याविषयी उद्धव ठाकरे यांनी सामाजिक माध्यमांवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. या वेळी त्यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याही बॅगा पडताळण्याचे आव्हान दिले.


आदित्य ठाकरे यांची ठाण्यात सभा नाही !

ठाणे – ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर ‘मुख्यमंत्र्यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात निवडणूक लढवीन’, अशी घोषणा केली होती; पण प्रत्यक्षात त्यांनी त्यांच्या प्रचार दौर्‍याच्या वेळी ठाणे येथे एकही सभा घेतलेली नाही अथवा रॅली काढलेली नाही.


१४ नोव्हेंबर या दिवशी शिवाजी पार्क येथे पंतप्रधानांची सभा !

मुंबई – विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ३ सभांचे १४ नोव्हेंबर या दिवशी आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी शिवाजी पार्क, दादर येथे त्यांची सभा होईल. दुसरी सभा नवी मुंबईत, तर तिसरी सभा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केली आहे.


आचारसंहिता भंगाच्या ४ सहस्र ६८३ तक्रारी निकाली !

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबरपर्यंत राज्यभरात ‘सी-व्हिजिल ॲप’वर आचारसंहिता भंगाच्या एकूण ४ सहस्र ७११ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४ सहस्र ६८३ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.


मावळ मतदारसंघातील सर्व उमेदवारांना नोटीस

वडगाव मावळ (पुणे) – मावळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी खर्चाची मूळ प्रमाणके अपूर्ण सादर केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ६ उमेदवारांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली. मावळ विधानसभा मतदारसंघाचे खर्च निरीक्षक प्रेमप्रकाश मीना यांनी मावळ विधानसभा मतदारसंघातील  उमेदवारांची प्रथम खर्च लेखा परीक्षण केले. त्या वेळी उमेदवारांनी दैनंदिन खर्चाचा तपशील नोंदवही, ताळमेळ, खर्चाची मूळ प्रमाणके अपूर्ण सादर केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे खर्च निरीक्षक मीना यांनी सर्व सहाही उमेदवारांना नोटिसा बजावण्याची सूचना निवडणूक निर्णय अधिकारी नवले यांना दिली. त्या नोटिसांचा खुलासा उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे २४ घंट्यांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे.