भाववृद्धी सत्संगांत घेण्यात आलेले भावजागृतीचे विविध प्रयोग आणि त्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !

१. भावजागृतीचा प्रयोग क्र. १

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पवित्र पादुका सूक्ष्मातून हृदयात स्थापित झालेल्या असणे

‘डिसेंबर २०२० मध्ये एका भाववृद्धी सत्संगाच्या वेळी मी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पवित्र पादुका सूक्ष्मातून हृदयात स्थापित झाल्या आहेत’, असा भाव ठेवला होता. त्या रात्री झोपण्यापूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांच्या पादुका सजीव झाल्याचे मला जाणवत होते. त्या वेळी माझे अंतरंग प्रकाशमान झाल्याचे जाणवून मला एक वेगळीच शक्ती जाणवत होती. मी पादुकांचे स्मरण जेवढे अधिक करत होते, तेवढा तो प्रकाश आणि शक्ती यांत वाढ होत होती. त्या क्षणी मला केवळ आनंद जाणवत होता. मला अन्य कशाचेच अस्तित्व जाणवत नव्हते. दुसर्‍या दिवशी उठल्यापासून मला आल्हाददायक आणि उत्साही वाटत होते. ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्या अंतरंगात आहेत’, असा भाव सतत असल्याने माझ्याकडून दिवसभरातील साधनेचे प्रयत्न सहजपणे आणि अंतर्मुखतेने होत होते.

२. भावजागृतीचा प्रयोग क्र. २

 सूक्ष्मातून तरुणपणीचे परात्पर गुरु डॉक्टर दिसणे

१५.१.२०२१ या दिवशी भाववृद्धी सत्संगाच्या वेळी सूक्ष्मातून मला तरुणपणीचे परात्पर गुरु डॉक्टर दिसले. त्या वेळी त्यांनी प्राचीन पद्धतीप्रमाणे सुंदर वेशभूषा केली होती आणि सोन्याचे अलंकार परिधान केले होते. ते एका सात्त्विक राजकुमारासारखे दिसत होते. त्या वेळी मी तिथे उभी होते आणि मीही प्राचीन पद्धतीप्रमाणे वेशभूषा केली होती. त्यानंतर एका सोन्याच्या रथात मी बसले. त्या वेळी मला इतके शांत वाटत होते की, मला माझे अस्तित्वच जाणवत नव्हते. त्यानंतर तो रथ एका प्रकाशाच्या दिशेने गेला. मला दिसत असणारे दृश्य त्या प्रकाशात लोप पावले. त्या वेळी मला आनंददायी शांतता जाणवत होती.

३. भावजागृतीचा प्रयोग क्र. ३

‘परात्पर गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर ‘ते कसे प्रतिसाद देतात ? आणि आपल्याला कसे मार्गदर्शन करतात ?’, याचे स्मरण करणे

१८.२.२०२१ या दिवशी भाववृद्धी सत्संगाच्या वेळी भावजागृतीचा हा प्रयोग घेण्यात आला. त्या वेळी मला पुढील दृश्य दिसले, ‘मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या समोर उभी आहे. मी त्यांच्या चरणांवर डोके ठेवले आहे; परंतु माझे स्थूल शरीर मात्र उभ्या स्थितीत आहे. तेव्हा माझ्या शरिरात प्राण नसल्याचे मला जाणवत होते. मी नतमस्तक झाल्याने मला हलकेपणा जाणवला आणि माझे शरीर प्रकाशमान झाले. ते प्रकाशमान शरीर परात्पर गुरु डॉक्टरांच्या पावन चरणांमध्ये विलीन झाले. त्यानंतर माझे स्थूल शरीर दिसेनासे झाले. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांकडून आनंदाची स्पंदने येत असल्याचे मला जाणवत होते.’

४. भावजागृतीचा प्रयोग क्र. ४

 मानसरित्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत त्यांचे दर्शन घेण्यासाठी जाणे

प्रतिदिन रात्री भावजागृतीचा हा प्रयोग केल्यामुळे मला शांत झोप लागते, तसेच मला रामनाथी आश्रमात गेल्याचे आणि परात्पर गुरुदेवांच्या चरणांजवळ असल्याचे समाधान मिळते. लहान मूल स्वत:च्या वडिलांना जसे सर्व सांगते, तसे दिवसभरातील साधनेचे प्रयत्न परात्पर गुरुदेवांना सांगण्याची आणि त्यांचे मार्गदर्शन ऐकण्याची माझ्यासाठी ही एक संधी असते. नेहमी त्यांच्या खोलीत गेल्यावर मी अगदी लहान होत जाते आणि परात्पर गुरुदेवांच्या नजीक पोचते. मी त्यांच्या पवित्र चरणांजवळ पोचल्यावर ते मला उचलून घेतात. १९.२.२०२१ या दिवशी जेव्हा मी त्यांच्या चरणांपर्यंत पोचले, तेव्हा त्यांनी मला उचलून घेतले आणि त्यांच्या हातांत मी हळूहळू लहान होत गेले आणि अदृश्य झाले. तेव्हा मला एक वेगळीच ऊर्जा आणि हलकेपणा जाणवला. एकदा भाववृद्धी सत्संगात ‘परात्पर गुरुदेवांच्या पादुका आपल्या हृदयमंदिरात स्थापित झाल्या आहेत’, असा भाव ठेवण्यास सांगितल्यावर मला जी शक्ती जाणवली, तशी शक्ती मला या वेळी जाणवत होती. ‘आपल्या हृदयमंदिरात पादुका आहेत’, असा भाव ठेवल्यावर मला स्वतःचे अस्तित्व काहीच जाणवत नव्हते. मला केवळ परात्पर गुरुदेवांचेच अस्तित्व जाणवत होते.

ही अनुभूती मला शब्दांत व्यक्त करता येणे अशक्य आहे; परंतु ‘परात्पर गुरुदेव आम्हाला प्रेम आणि आनंद देण्यासाठी सदैव आमच्या समवेत असतात’, असे मला वाटते.’

– एक साधिका

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक