रामनाथी (गोवा ) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधकत्ववृद्धी शिबिरात’ सहभागी झालेल्या साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. त्रासदायक अनुभूती

१ अ. सौ. शीतल माने, नवसारी, गुजरात.

१ अ १. शारीरिक आणि मानसिक त्रास होणे अन् सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे नामजपादी उपाय केल्यावर त्रास उणावणे : ‘शिबिरासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येण्यापूर्वी माझे मन विचलित करणारा एक प्रसंग घडला. त्यामुळे माझी मनःस्थिती तितकीशी चांगली नव्हती आणि शरिरालाही जडत्व आल्यासारखे वाटत होते. माझे डोके, तसेच आज्ञाचक्र आणि सहस्रारचक्र यांवर मला पुष्कळ जडपणा जाणवत होता.

‘शिबिरामध्ये एकाग्रतेने सहभागी व्हावे कि नको ?’, असे मला वाटत होते. शिबिराच्या पहिल्या दिवशी माझे डोळे विस्फारल्यासारखे जाणवत होते. डोळे बंद केले, तरी ‘ते आग ओकत आहेत’, असे मला वाटत होते.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे नामजपादी उपाय केल्यानंतर माझ्या शरिराचा जडपणा आणि डोळ्यांची जळजळ उणावली. मला रात्री शांत झोप लागली आणि सर्व शरीर हलके झाले. मनातील विचारांची गर्दी न्यून होऊन माझा नामजप आपोआप होऊ लागला.’

१ आ. श्री. यल्लाप्पा पाटील, नंदीहळ्ळी, बेळगाव.

१ आ १. ग्लानी येणे, डोके बधीर झाल्यासारखे वाटणे आणि आश्रमाच्या परिसरातील श्री सिद्धिविनायकाला प्रार्थना केल्यावर त्रास उणावणे : ‘शिबिराच्या वेळी मला मध्ये मध्ये ग्लानी येऊन विषय समजून घेण्यात अडचण येत होती. माझ्या आज्ञाचक्रावर दाब येऊन मला माझे डोके बधीर झाल्यासारखे वाटत होते. त्या वेळी मी रामनाथी आश्रमाच्या परिसरातील श्री सिद्धिविनायकाला प्रार्थना केली आणि मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर मला होणारा त्रास उणावला. नंतर जेव्हा मला त्रास जाणवला, तेव्हा शिबिरात असतांनाच माझ्याकडून श्री सिद्धिविनायकाला प्रार्थना होऊ लागली, ‘हे गणराया, माझ्या सेवेत अडथळा आणणार्‍या अनिष्ट शक्तींना तुझ्या पाशाने बांधून ठेव. माझ्या षट्चक्रांवरील अनिष्ट शक्तींची स्थाने नष्ट होऊ देत.’ त्यानंतर माझा त्रास उणावल्याची अनुभूती मला येत होती.’

१ इ. सौ. विद्या सादुल, पलूस, जिल्हा सांगली.

१ इ १. घशाचा त्रास जाणवणे, कणकण वाटणे आणि शिबिरातील चैतन्यामुळे त्रासांवर मात करता येणे : ‘शिबिराला येण्यापूर्वी मला घशाचा त्रास जाणवत होता. मला कणकण आल्यासारखी वाटत होती; परंतु शिबिरातील चैतन्यामुळे मला होणार्‍या सर्व त्रासांवर मात करता आली. त्यानंतर माझ्या मनात त्रासाविषयी विचारही आला नाही.’

२. चांगल्या अनुभूती

२ अ. सौ. विजयमाला कुलकर्णी, भाग्यनगर, तेलंगाणा आणि सौ. सुजाता गुप्ता, येवला, जिल्हा नाशिक.

१. ‘शिबिर चालू असतांना दिवसभरात आम्हाला आमच्या शरिरावर दैवी कण दिसले.’

२ आ. सौ. विद्या सादुल, पलूस, जिल्हा सांगली.

१. ‘शिबिराच्या संपूर्ण कालावधीत मला कृतज्ञताभाव आणि शिकण्याची स्थिती टिकवून ठेवता आली. मला चैतन्यमय वातावरण अनुभवता आले.

२. श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४० वर्षे) आणि श्री. चैतन्य तागडे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ३८ वर्षे) यांच्या सत्संगामुळे वातावरण प्रकाशमय झाल्याचे जाणवत होते. त्यांच्या चैतन्यमय वाणीमुळे साधनेचे वेगवेगळे दृष्टीकोन अंतर्मनात पोचल्याने मला आनंद अनुभवता येत होता.’

२ इ. श्री. ज्ञानेश्वर आप्पाना गावडे, बेळगाव 

१. ‘मी शिबिरासाठी आश्रमात आल्यावर ‘साक्षात् वैकुंठात आलो आहे’, असे मला वाटले. माझी वारंवार भावजागृती होत होती.

२. ‘विष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले शेषनागावर झोपले आहेत आणि त्यांच्या चरणांजवळ लक्ष्मीमाता आहे’, असे मला जाणवले.

३. ‘प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) सूक्ष्मातून आमचे शिबिर बघत आहेत’, असे मला तिन्ही दिवस जाणवले.

४. शिबिराच्या वेळी ‘आश्रमामधील दिवस मोठा आहे आणि अन्य ठिकाणी दिवस लहान आहे’, असे मला जाणवत होते.’

२ ई. सौ. मनीषा रामदास बोराटे, सातारा

१. ‘सायंकाळी ६.४० वाजता ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले शिबिरातील प्रत्येक साधकाजवळ जात आहेत आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवत आहेत’, असे मला जाणवले.

२. माझ्याकडून सतत गुरुदेवांचे स्मरण होत होते. मला त्यांचे सूक्ष्मातील अस्तित्व जाणवून माझी भावजागृती होत होती.’

२ उ. सौ. आशा देशमुख, संभाजीनगर (२८.१.२०२४)

२ उ १. व्यासपिठावरील साधकांभोवती पांढरा प्रकाश दिसणे : ‘शिबिराच्या समारोपाच्या वेळी व्यासपिठावर श्री. चैतन्य तागडे, श्री. संदीप शिंदे आणि सौ. अर्पिता पाठक बसले होते. तेव्हा मला चैतन्यदादा आणि अर्पिताताई यांच्या डोक्याभोवती अन् संदीपदादांच्या पूर्ण शरिराभोवती पांढरा प्रकाश दिसत होता.

२ उ २. शिबिरात एक साधिका प्रार्थना सांगत असतांना मला तिच्या जागी ब्रह्मोत्सवातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन होत होते. त्या वेळी मला चैतन्य मिळून माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होत होते.’

३. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ पंचतत्त्वांचे प्रयोग करत असतांना आलेल्या अनुभूती

३ अ. सौ. माधवी कुचेकर, संभाजीनगर (१६.२.२०२४)

१. ‘प्रयोगाच्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आसंदीवर बसल्यावर मला त्यांच्या मागे शुभ्र वलय दिसले.

२. प्रयोगाच्या वेळी मी सद्गुरु काकांच्या बाजूला उभी होते. तेव्हा मला पुष्कळ दैवी सुगंध येत होता. ‘गुरुदेव माझ्या जवळ आहेत’, असे मला वाटत होते. त्या वेळी माझ्या मनात कोणतेही विचार नव्हते.

३. सद्गुरु काका प्रयोगासंबंधी सांगत असतांना ‘प.पू. गुरुदेवच बोलत आहेत’, असे मला वाटत होते.

४. ‘सद्गुरु काका आकाशातील चंद्राप्रमाणे तेजस्वी, शांत आणि शीतल आहेत’, असे मला वाटत होते. त्यांच्या सत्संगात मला पुष्कळ शांत वाटत होते, तसेच माझ्याकडून प.पू. गुरुदेवांचे स्मरण अधिक होत होते आणि मला कृतज्ञता वाटत होती.’

३ आ. सौ. अंजली मणेरीकर (आध्यात्मिक  पातळी ६३ टक्के, वय ५२ वर्षे), सिंधुदुर्ग

१. ‘सद्गुरु काका पंचतत्त्वांचे प्रयोग करत असतांना मी डोळे बंद केल्यावर मला पांढर्‍या रंगाचा तेजस्वी प्रकाश जाणवत होता.’

(क्रमशः)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक