१. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ हा ‘ज्ञानयज्ञ’ आहे’, असे जाणवणे
‘२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ होता. १२ वर्षांपूर्वी भारतातील हिंदुत्वनिष्ठांसाठी चालू झालेले ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आता वैश्विक स्तरावर होत आहे. यात मान्यवर हिंदुत्वनिष्ठ आपापले विचार, प्रयत्न आणि अडचणी मांडतात. यावर्षी मला वाटले, ‘हा महोत्सव म्हणजे ‘ज्ञानयज्ञ’ आहे. एरव्ही यज्ञात समिधांची आहुती दिली जाते, तशी या ज्ञानयज्ञात हिंदुत्वनिष्ठांचे प्रयत्न आणि विचार यांच्या आहुती पडत आहेत.’ विषय मांडणार्या सर्वच हिंदुत्वनिष्ठांचे विषय, विषय मांडण्याची पद्धत आणि भाव चांगला होता.
२. पुष्कळ सेवा करूनही थकायला न होणे आणि ‘देवच सेवा करून घेत आहे’, असे अनुभवणे
या महोत्सवाच्या काळात आम्ही हिंदुत्वनिष्ठांच्या भाषणांचे संकलन करत होतो. ही भाषणे त्याच दिवशी ‘अपलोड’ करायची होती. त्यामुळे आरंभी ‘सेवा पुष्कळ आहे आणि वेळ अपुरा पडेल’, असे आम्हाला वाटत होते; पण महोत्सव चालू झाल्यानंतर माझ्या लक्षात आले की, सेवा करून माझ्याकडे वेळ शेष रहात आहे. पुष्कळ सेवा करूनही मला थकायला होत नव्हते, म्हणजे ‘देवच माझ्याकडून सेवा करून घेत आहे’, हे मी अनुभवले.
३. ‘सर्वकाही देवावर सोडल्यास तोच काळजी घेतो’, याची अनुभूती येणे आणि देवाप्रती कृतज्ञता वाटणे
महोत्सव चालू झाल्यानंतर चौथ्या दिवशी सकाळपासून मला एकदमच गळल्यासारखे होत होते. तेव्हा मी ‘प्राणशक्तीवहन पद्धती’नुसार नामजप शोधला. ‘मी शोधलेला जप योग्य आहे का ?’, हे विचारण्यासाठी मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांना संपर्क केला; पण त्यांचा भ्रमणभाष न लागल्याने आणि सेवेला जाण्याची वेळ झाल्याने मी सेवेला गेले. सेवा चालू करण्यापूर्वी ‘बसून जप करण्यासाठी वेळ नाही. देवा, आता तूच पहा’, असे म्हणून मी सर्व देवावर सोडले. नंतर सेवा करतांना ‘मला थकल्यासारखे झाले आहे’, हे मी विसरून गेले. ‘माझा त्रास कधी न्यून झाला ?’, हे मला कळले नाही. मी नेहमीप्रमाणे सेवा करू लागले. थोड्या वेळाने सद्गुरु डॉ. गाडगीळकाका यांचा भ्रमणभाष आल्यावर त्यांनी माझ्या भोवती त्रासदायक शक्तीचे आवरण नसल्याचे आणि बसून वेगळा जप करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले. त्यामुळे ‘कोणत्याही प्रसंगी सर्वकाही देवावर सोडल्यास देव कशी काळजी घेतो आणि त्या प्रसंगातून बाहेर काढतो’, हे लक्षात येऊन मला देवाप्रती कृतज्ञता वाटली.’
– सुश्री (कु.) राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.८.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |