१. पू. सदाशिव (भाऊ) परब यांनी सूक्ष्मातून साधकाची स्थिती जाणून त्याला मार्गदर्शन करणे
‘काही दिवसांपूर्वी पू. सदाशिव (भाऊ) परब (सनातनचे २६ वे संत, वय ८३ वर्षे) यांच्या जावयाचे (विजय सावंत (वय ५५ वर्षे) यांचे) निधन झाले. आम्ही (मी आणि श्री. गोविंद चोडणकर) पू. भाऊकाकांना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा पू. भाऊकाका बैठककक्षात बसून एका लहान वहीत लिहीत होते. आम्ही प्रथम पू. भाऊकाकांच्या पत्नींना (सौ. सुफला परब (वय ७५ वर्षे) यांना) भेटलो. ‘त्या लाकडी पलंगावरून पडल्याने त्यांच्या कंबरेला बरीच इजा झाली आहे’, असे आम्हाला समजले.
आम्ही पू. भाऊकाकांना त्यांच्या जावयाविषयी विचारले. नंतर पू. भाऊकाकांनी मला मार्गदर्शन केले, ‘‘साधनेत आणखी चांगल्या प्रकारे प्रयत्न कर. गुरुदेवांच्या अनुसंधानात रहा. शरणागतीने साधनेचे प्रयत्न कर. ‘प्रारब्ध भोगण्यासाठी शक्ती द्या’, अशी त्यांना प्रार्थना कर. सतत स्वतःवर लक्ष ठेव. प्रत्येक दिवस संघर्षमय आहे. गुरुदेवांना शरण जाऊन संघर्षावर मात करण्याचा प्रयत्न कर.’’ (त्याच कालावधीत माझा पाठदुखीचा त्रास पुष्कळ वाढला होता; मात्र मी त्याविषयी पू. भाऊकाकांना सांगितले नव्हते.)
२. पू. भाऊ परब यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
२ अ. पू. भाऊकाका बोलत असतांना मला चंदनाचा सुगंध आला (मला अशी अनुभूती याआधी कधीच आली नव्हती.) तेव्हा संतांच्या सान्निध्यात रहाण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले.
२ आ. जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्यास घरी दुःखदायक किंवा तणावपूर्ण वातावरण असते; मात्र पू. भाऊकाकांच्या अस्तित्वामुळे त्यांच्या घरी तसे काही जाणवले नाही.
२ इ. पू. भाऊकाकांचे साक्षीभावाने वागणे : माझा कंबरदुखीचा त्रास वाढला, माझ्या मनाविरुद्ध झाले, मला कुणी काही बोलले किंवा घरातील एखादी व्यक्ती रुग्णाईत झाली, तर मी विचलित होतो, माझी चिडचिड होते आणि त्याचा माझ्या साधनेवर परिणाम होतो. पू. भाऊकाकांच्या घरी गेल्यावर ‘संत संसारात राहूनही सुख-दुःख किंवा माया यांपासून अलिप्त असतात. त्यांची कुठल्याही परिस्थितीत साधना चालू असते’, असे माझ्या लक्षात आले.
३. प्रार्थना
‘जीवनात कुठलाही प्रसंग आला, काहीही झाले, तरीही आपणच माझ्याकडून श्रद्धेने साधनेचे प्रयत्न करून घ्यावेत’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना !’
– श्री. युवराज गावकर, डिचोली, गोवा. (३०.७.२०२४)
|