मुंबई – विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने २५ उमेदवारांची तिसरी सूची प्रसिद्ध केली आहे. पहिल्या सूचीत ९९, दुसर्या सूचीत २२, तर तिसर्या सूचीतील २५ मिळून आतापर्यंत भाजपने एकूण १४६ उमेदवार घोषित केले आहेत, म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्या महायुतीच्या एकूण २८८ जागांमध्ये भाजपकडे आतापर्यंत १४६ जागा आल्या आहेत.
भाजपच्या पूर्वीच्या सूचीत मुंबईतील वर्सोवा, बोरीवली, घाटकोपर पूर्व येथील आमदारांची नावे सूचीत नसल्याने त्यांचे तिकीट कापले जाते कि काय, अशी चर्चा होती. त्यामुळे ही सूची घोषित झाल्यावर चित्र स्पष्ट झाले आहे.
भाजपने निवडणुकीसाठी एकूण १४६ उमेदवार घोषित केले आहेत. तिसर्या सूचीत काही विद्यमान आमदार आहेत. पहिल्या दोन सूचींमध्ये नावे नसलेल्या काही आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यातील बहुतांश जणांना उमेदवारी मिळाली आहे. राम सातपुते यांना माळशिरसमधून तिकीट देण्यात आले आहे. ते फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. लोकसभेला त्यांचा सोलापूरमध्ये पराभव झाला होता. आता पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली आहे. मुंबईतील बोरीवली मतदारसंघात भाजपने पुन्हा उमेदवार बदलला आहे. आमदार सुनील राणे यांचे तिकीट कापून संजय उपाध्याय यांना संधी देण्यात आली आहे.
भाजपने वर्सोव्याच्या आमदार भारती लव्हेकर, घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शहा यांना पुन्हा संधी दिली आहे. ‘शहा यांच्या जागी आमदार प्रकाश मेहता यांना संधी मिळेल’, अशी चर्चा होती.