हणजूणवासियांची आंदोलनाद्वारे मागणी
(कोमुनिदाद ही पोर्तुगीजकालीन गावकर्यांची संस्था)
पणजी, २७ ऑक्टोबर (वार्ता.) – कुचेली येथे संगीत रजनी कार्यक्रमाला (‘इ.डी.एम्.’ला म्हणजे ‘इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक’ला) यापूर्वी विरोध झाला आहे. आता हणजूण-वागातोर येथील कोमुनिदादची भूमी ‘सनबर्न’सारख्या कुठल्याही संगीत रजनी कार्यक्रमाला देण्यात येऊ नये, अशी मागणी हणजूणवासियांनी २७ ऑक्टोबर या दिवशी सकाळी हणजूण येथील सेंट मायकल चर्चच्या परिसरात आंदोलन करून केली.
आंदोलन करणार्या इग्नासियो फर्नांडिस म्हणाल्या, ‘‘शांततापूर्ण आणि अहिंसामार्गाने करण्यात आलेल्या या आंदोलनातून सरकार अन् प्रशासन यांना ‘हणजूणवासीय ध्वनीप्रदूषण करणार्या संगीत रजनी कार्यक्रमांच्या विरोधात आहे’, हा संदेश गेलेला आहे. ध्वनीप्रदूषणामुळे आम्ही त्रस्त झालेलो आहोत. आम्ही आमच्या व्यथा या आंदोलनाच्या माध्यमातून मांडत आहोत आणि असे सांगण्याचा आम्हाला घटनात्मक अधिकार आहे. ‘हणजूण परिसरात संगीत रजनी कार्यक्रम नको’, अशी मागणी करणारे निवेदन आम्ही हणजूण पंचायत आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांना दिले आहे. अशा संगीत रजनी कार्यक्रमांमुळे गोव्याचे नाव अपकीर्त होत आहे.’’