दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मतदानासाठी हिंदू एकत्र न आल्यास ‘व्होट जिहाद’ होईल ! – महंत महेशगिरी महाराज; क्षुल्लक कारणावरून चारचाकीची काच फोडली !

मतदानासाठी हिंदू एकत्र न आल्यास ‘व्होट जिहाद’ होईल ! – महंत महेशगिरी महाराज

महंत महेशगिरी महाराज

नाशिक – सर्व हिंदूंनी २० नोव्हेंबरला एकत्र येऊन मतदान केले पाहिजे. जर आपण एकत्र आलो नाही, तर समोरचे सर्व एकत्र येऊन ‘व्होट जिहाद’ करतील, असे विधान येथील श्री दत्त देवस्थान धारणगावचे मठाधिपती महंत महेशगिरी महाराज यांनी केले. प्रति गाणगापूर समजल्या जाणार्‍या श्री दत्त देवस्थान येथे महाराष्ट्रभरातून प्रत्येक गुरुवारी मोठ्या संख्येने भक्त येतात. या वेळी त्यांनी भक्तांसमोर हे आव्हान केले.


क्षुल्लक कारणावरून चारचाकीची काच फोडली !

प्रतिकात्मक चित्र

डोंबिवली – रस्त्यातून चालणार्‍या दोघांना चारचाकी चालकाने भोंगा वाजवून बाजूला होण्यास सांगितले. याचा राग येऊन पादचार्‍यांनी चालकाच्या वाहनाची रात्री तोडफोड केली. एकाने चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सराईत गुन्हेगार असणारे कैलास भंडारी, रोशन लोखंडे, शिवम त्रिपाठी, नीतेश गुप्ता, तेजस म्हात्रे, नीर बुटेला, ओमकार मांडरे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांनी आणलेल्या एका पिशवीत पिस्तुल, ३ जिवंत काडतुसे, ३ लोखंडी चॉपर आढळले.

संपादकीय भूमिका 

समाजातील वाढती गुन्हेगारी धोकादायक !


महिला पोलिसाची आत्महत्या !

प्रतिकात्मक चित्र

पनवेल – नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असणार्‍या महिला पोलीस स्नेहा गोडसे (वय २६ वर्षे) यांनी पतीच्या टोमण्यांमुळे त्रस्त होऊन आत्महत्या केली. मॅरेथॉन नेक्सॉन सोसायटीमधील झेनिथ या इमारतीमध्ये ही घटना घडली. त्यांच्या पतीचे दुसर्‍या महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे पती-पत्नीत भांडणे होत होती.


प्रतीकात्मक चित्र

नालासोपारा – येथील ६९ वर्षांच्या वृद्धाला ‘हनी ट्रॅप’मध्ये (‘हनी ट्रॅप’ म्हणजे मोहात पाडणे किंवा आकर्षक व्यक्तींचा वापर करून एखाद्याला जाळ्यात अडकवणे) अडकवून त्याच्याकडून ३४ लाख रुपये उकळण्यात आले. या प्रकरणी एका तरुणीसह तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रियांका शर्मा नावाच्या तरुणीने संपर्क साधून वृद्धाला स्वतःचा नग्न व्हिडिओ पाठवला आणि त्यांनाही तसा व्हिडिओ पाठवण्यास सांगितले. वृद्धाने तसे केल्यावर तरुणीने पैसे मागायला प्रारंभ केला. यामुळे घाबरून त्यांनी तरुणीचा क्रमांक ब्लॉक केला. त्यानंतर दुसर्‍या क्रमांकावरून आणखी दोघांनी संपर्क करून ३४ लाख रुपये उकळले. पैशांची मागणी वाढत असल्याचे लक्षात आल्यावर वृद्धाने तक्रार प्रविष्ट केली.

संपादकीय भूमिका 

अशी फसवणूक करणार्‍यांवर कठोर कारवाई कधी होणार ?