‘BRICS’ Membership Denied To Pakistan : पाकला ‘ब्रिक्‍स’चे सदस्‍यत्‍व न मिळाल्‍याने पाकमधील जनतेत संताप !

ब्रिक्‍स परिषद

इस्‍लामाबाद (पाकिस्‍तान) – रशियातील कझान येथे झालेल्‍या ब्रिक्‍स (ब्रिक्‍स म्‍हणजे ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांची संघटना) देशांच्‍या परिषदेत पाकिस्‍तानला सहभागी करून घेण्‍यासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अर्ज केला होता; तो फेटाळण्‍यात आल्‍याने पाकमधील नागरिकांमध्‍ये संताप दिसून येत आहे. पाकसह अनेक देशांनी ब्रिक्‍समध्‍ये सहभागी होण्‍यासाठी अर्ज केले होते. त्‍यातील केवळ १३ देशांना ब्रिक्‍सचे भागीदार बनवण्‍याची घोषणा करण्‍यात आली. या १३ भागीदार देशांपैकी ७ इस्‍लामी देश आहेत. यामध्‍ये पाकिस्‍तानचा मित्र तुर्कीयेचाही समावेश आहे. ‘ब्रिक्‍सचे सदस्‍यत्‍व मिळावे; म्‍हणून तुर्कीयेने काश्‍मीरचे सूत्र संयुक्‍त राष्‍ट्रांत मांडले नव्‍हते’, असे सांगितले जाते. भागीदार देश ब्रिक्‍सचे औपचारिक सदस्‍य नसतील; परंतु संघटनेच्‍या नियोजनाचा भाग असतील.

या संदर्भात रशियच्‍या बाजूने सांगण्‍यात आले की, सदस्‍य होण्‍यासाठी सहमती आवश्‍यक आहे. त्‍यामुळे ज्‍या देशांच्‍या नावावर सर्वांनी सहमती दर्शवली, अशाच देशांना भागीदार बनवण्‍यात आले.


पाकिस्‍तानची दुर्बल अर्थव्‍यवस्‍था ब्रिक्‍सच्‍या निकषांमध्‍ये बसत नाही. या संघटनेमध्‍ये उदयोन्‍मुख अर्थव्‍यवस्‍था असलेल्‍या देशांना एकत्र आणण्‍याचा प्रयत्न आहे. त्‍यासह पाकिस्‍तान भारताविरुद्ध वक्‍तव्‍ये करण्‍यासाठी मोठ्या व्‍यासपिठांचा वापर करत असल्‍याने भारताचा पाकला विरोध होता.

संपादकीय भूमिका

ब्रिक्‍सचे सदस्‍यत्‍व मिळण्‍यासाठी पाक लायक तरी आहे का ? ज्‍या देशाला जगाने ‘आतंकवादी देश’ घोषित करून त्‍याच्‍यावर बहिष्‍कार घालण्‍याची आवश्‍यकता आहे, अशा देशाला आर्थिकरित्‍या भक्‍कम असणार्‍या देशांचे सदस्‍यत्‍व का म्‍हणून देण्‍यात यावे ?