दिवाळी : उत्साह, प्रसन्नता आणि आनंद यांची उधळण !

दिवाळी हा आपल्या देशातील सर्वांत मोठा सण. राज्यपरत्वे काही सण पालटतात; पण दिवाळी सर्वत्र सारख्याच उत्साहाने आणि आवडीने साजरी होते. हिंदु परंपरेत केवळ गंमत किंवा मजा म्हणून सण साजरे करण्याची पद्धत नाही. त्या पाठीमागे व्यक्ती आणि समष्टी यांच्या हिताचा विचार हमखास दडलेला असतो. २२ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘दिवाळीचे धार्मिक, सामाजिक, आर्थिक, आरोग्य आणि कला या दृष्टीकोनातून महत्त्व अन् मनुष्याला ज्ञान, धन आणि बळ प्राप्त करून देणारी दिवाळी’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

मागील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/846866.html

३. दिवाळीचा फराळ शरिराचे बल वाढवणारा असणे

वैद्या सुचित्रा कुलकर्णी

हे दिवाळीचे वैशिष्ट्य आहे. चिवडा, चकल्या, करंज्या, अनारसे, शेव, विविध लाडू, कडबोळी, शंकरपाळे अशा बहुविध चविष्ट पदार्थांनी संपन्न असा हा फराळ, म्हणजे ‘खाणार्‍यांची’ दिवाळीच. निसर्गात चालू झालेल्या थंडीला आणि त्यामुळे शरिरात प्रज्वलित होऊ लागलेल्या अग्नीला साजेसा हा गोड अन् तिखट फराळ पचायला जड असला, तरी शरिराला पोषक असतो. पावसाळ्यात भूक अल्प म्हणून केलेल्या उपवासांनी थोड्या कृश झालेल्या शरिराचे बल वाढवायला हे पदार्थ पुष्कळ उपयोगी पडतात. एकूणच दिवाळीत ज्ञान, धन आणि बळ प्राप्त करण्याची मुहूर्तमेढ रचायची असते. या गोष्टी प्राप्त झाल्यावर त्यांचा विनियोग कसा करायचा, याचेही भान हवे. सुभाषितकार म्हणतात,

विद्या विवादाय धनं मदाय शक्तिः परेषां परिपीडनाय ।
खलस्य साधोर्विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय ।।

अर्थ : दुष्ट लोक त्यांनी प्राप्त केलेली विद्या वाद घालण्यासाठी, धन उन्मादासाठी, तर शक्ती इतरांना त्रास देण्यासाठी वापरतात. याउलट सज्जन माणसे त्यांनी प्राप्त केलेली विद्या ज्ञानासाठी, धन दानासाठी, तर शक्ती इतरांच्या रक्षणासाठी वापरतात.

४. उत्साह आणि आनंद देणारी दिवाळी प्रतिदिन अनुभवायचा प्रयत्न करूया !

समस्त प्राणीमात्रांचा विचार करून निर्माण करण्यात आलेल्या या सणात प्रदूषणकारी आणि लहान लहान जिवांना मारक ठरणार्‍या फटाक्यांना कुठेतरी स्थान आहे का ? कुठेच नाही; कारण फटाके ही दिवाळी साजरी करायची एकमेव पद्धत नाही. त्यांना वगळून दिवाळी साजरी करण्याचे अनेक प्रशस्त मार्ग आपल्याच परंपरेत आहेत. दिवाळीचे हे उत्साही आणि आनंदी स्वरूप फारच मोहक आहे. प्रतिदिनच्या आयुष्यात हा आनंद आणि प्रसन्नता टिकवणे अजिबात अशक्य नाही. दिवाळीतील विशेष फराळ आणि वस्त्रालंकार सोडले, तरी पहाटे उठणे, अभ्यंग, उटणे, देवपूजा, जप आणि सर्व जिवांविषयी स्नेह हे उपचार केवळ दिवाळीपुरते नाहीतच मुळी. ते प्रतिदिन आचरणात आणून राजासारखे आयुष्य जगता येते. म्हणूनच म्हटले आहे, ‘राजाला दिवाळी काय ठाऊक ?’, म्हणजे राजासाठी प्रतिदिन हा दिवाळीसारखाच असतो.

(समाप्त)

– वैद्या सुचित्रा कुलकर्णी

(साभार : साप्ताहिक ‘विवेक’, २८ ऑक्टोबर २०१६)