सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या आध्यात्मिक स्तरावरील उपायांच्या संदर्भात रामनाथी, गोवा येथील श्रीमती रजनी नगरकर (वय ७२ वर्षे) यांना आलेली अनुभूती !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अनिष्ट शक्तींच्या त्रासांमुळे निर्माण झालेले त्रासदायक आवरण काढण्यासाठी विविध मुद्रा करण्यास सांगणे

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुमाऊली) आणि संत यांनी साधकांची साधना वृद्धींगत व्हावी अन् त्यांना आध्यात्मिक त्रासांशी लढता यावे, यांसाठी नामजपादी उपाय सांगितले आहेत. त्याच समवेत पुढील विशिष्ट मुद्रा करून अनिष्ट शक्तींच्या त्रासामुळे निर्माण झालेले त्रासदायक (काळे) आवरण काढण्यास सांगितले आहे.

२. शरिरावरील त्रासदायक शक्तींचे आवरण काढण्याच्या पद्धती

श्रीमती रजनी नगरकर

२ अ. दोन्ही तळहातांची एकत्रित मुद्रा करून आवरण काढणे : उजवा तळहात डोक्यावर १ – २ सें.मी. अंतराच्या पुढे स्वतःच्या दिशेने येईल, असा ठेवावा. त्यावर दुसर्‍या, म्हणजे डाव्या हाताचा तळवा उजव्या तळहाताच्या विरुद्ध दिशेला, म्हणजे वरच्या दिशेला येईल, असा ठेवावा. अशा पद्धतीने आवरण काढण्याच्या मुद्रेला ‘दोन्ही तळहातांची एकत्रित मुद्रा’ असे म्हणतात.

२ आ. मनोरा (‘टॉवर’) मुद्रा : यात दोन्ही हातांच्या मध्यमेची बोटांची टोके जुळवून ‘मनोरा मुद्रा’ केली जाते. या मुद्रेतून सात्त्विकता ग्रहण केली जाते, तसेच आपल्या देहातील विविध चक्रांच्या वर बोटे थांबवून जप करत आवरण काढले जाते.

३. ‘मनोरा मुद्रा’ करून आवरण काढतांना आरंभी कृत्रिमरित्या कृती होणे आणि नंतर ती भावपूर्ण होऊन बोटांतून रंगांच्या स्वरूपात सात्त्विकता मिळून हलके वाटणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मार्गदर्शन करतांना हे सर्व प्रकार प्रत्यक्ष कृतीसहित करून दाखवले. पूर्वी मला ‘मनोरा’ मुद्रा करतांना काहीच कळत नसे. माझ्याकडून केवळ कृत्रिमरित्या कृती होत होती. मागील दीड मासाच्या कालावधीत मला काही वेळेला मनोरा मुद्रेसाठी जुळवलेल्या माझ्या बोटांतून कधी निळा, कधी पिवळा, तर कधी पांढरा रंग दिसतो अन् त्यांचा प्रवाह माझ्या शरिरात जाऊन माझे शरीर त्या रंगांनी सात्त्विक होते. तेव्हा मला हलके वाटते.

४. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना अनुभूती सांगितल्यावर त्यांनी ‘हे चांगले आहे’, असे सांगणे

ती मुद्रा करतांना मला आनंद तर जाणवतोच; पण त्यानंतर त्या रंगांची स्पंदने मला बराच वेळ जाणवत असतात. त्या उपायाने ‘मला हलकेपणा जाणवून मला आध्यात्मिक लाभ होत आहेत’, असे मला जाणवते. मी हे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सांगितल्यावर ते मला म्हणाले, ‘‘हे चांगले आहे.’’

‘साधकांची साधना वाढणे, त्यांचे त्रास उणावणे आणि त्यांना चैतन्य मिळणे, यांसाठी देव किती प्रयत्नरत असतो !’, हे मला या अनुभूतीतून जाणवले. प्रत्यक्ष अनुभूतीतून देव आपल्याला चैतन्य देत असतो. यासाठी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– श्रीमती रजनी नगरकर (वय ७२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.  (५.५.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक