Kashmir terror attack : जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये आतंकवाद्यांच्‍या आक्रमणात एक डॉक्‍टर आणि ६ कामगार ठार

  • बोगद्याचे काम चालू असतांना झाले आक्रमण

  • ‘द रेझिस्‍टन्‍स फ्रंट’ या आतंकवादी संघटनेने घेतले आक्रमणाचे दायित्‍व

श्रीनगर (जम्‍मू-काश्‍मीर) – जम्‍मू-काश्‍मीरमधील गांदरबल जिल्‍ह्यातील गगनगीर भागात आतंकवाद्यांनी केलेल्‍या आक्रमणात एक डॉक्‍टर आणि ६ कामगार ठार झाले. तसेच अनेक जण घायाळ झाले. हे कामगार बोगद्याच्‍या निर्मितीच्‍या प्रकल्‍पात काम करत असतांना हे आक्रमण करण्‍यात आले. हे कामगार गगनगीर या ठिकाणाला सोनमर्गला जोडणार्‍या झेड मोर बोगद्यावर काम करणार्‍या बांधकाम पथकाचा भाग होते. या घटनेनंतर लगेचच सुरक्षादलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून आतंकवाद्यांना पकडण्‍यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे. या घटनेवर मुख्‍यमंत्री ओमर अब्‍दुल्ला यांनी ‘मी या आक्रमणाचा तीव्र शब्‍दांत निषेध करतो आणि पीडितांच्‍या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्‍यक्‍त करतो’, असे म्‍हटले आहे. (या पलीकडे ओमर अब्‍दुल्ला काय बोलणार आहेत ? ‘एकेका जिहाद्याला ठार करून काश्‍मीरला आतंकवाद मुक्‍त करू’ असे अब्‍दुल्ला कुटुंबियांनी एकदा तरी म्‍हटले आहे का ? त्‍यांची तशी इच्‍छा तरी आहे का ? – संपादक) आतापर्यंत समोर आलेल्‍या माहितीनुसार, ‘द रेझिस्‍टन्‍स फ्रंट’ या आतंकवादी संघटनेने या आक्रमणाचे दायित्‍व स्‍वीकारले आहे.

२० ऑक्‍टोबरच्‍या रात्री साडेआठच्‍या सुमारास ही घटना घडली. एका प्रत्‍यक्षदर्शीने सांगितले की, जेवण बनवत असतांना आतंकवाद्यांनी तेथे उपस्‍थित असलेल्‍या कामगारांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारामुळे येथे असणार्‍या २ वाहनांना आग लागली आणि त्‍या जळून गेल्‍या.

मृत आणि घायाळ यांंची नावे

मध्‍यप्रदेशातील यांत्रिक कर्मचारी अनिल शुल्ला, बिहारमधील फहीम नसीर, महंमद हरिफ आणि कलीम, पंजाबमधील गुरमीत, जम्‍मू-काश्‍मीरमधील शशी अब्रोल आणि डॉ. शाहनवाज यांचा मृतांमध्‍ये समावेश आहे. याखेरीज इंदर यादव, मोहन लाल, मुश्‍ताक अहमद लोन, इश्‍फाक अहमद भट आणि जगतार सिंह अशी घायाळांची नावे आहेत.

आक्रमण करणार्‍यांना सोडणार नाही ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

या आक्रमणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्‍हणाले की, गगनगीरमध्‍ये नागरिकांवर झालेले आतंकवादी आक्रमण भ्‍याड आणि घृणास्‍पद कृत्‍य आहे. या घृणास्‍पद कृत्‍यात सहभागी असलेल्‍यांना सोडले जाणार नाही आणि त्‍यांना आमच्‍या सुरक्षादलांकडून जोरदार प्रत्‍युत्तर दिले जाईल. (अशा कितीही आतंकवाद्यांना ठार केले, तरी त्‍याच्‍या मागून दुसरे आतंकवादी आक्रमण करण्‍यास सिद्ध असतात, हे गेली ३५ वर्षे येथे चालू आहे. जर काश्‍मीर आतंकवाद मुक्‍त करायचा असेल, तर आतंकवाद्यांची निर्मिती करणार्‍या पाकला नष्‍ट करणे आवश्‍यक आहे. अन्‍यथा अशा घटना घडतच रहाणार, ही वस्‍तूस्‍थिती आहे ! – संपादक)  या दुःखाच्‍या प्रसंगी मी मृतांच्‍या कुटुंबियांप्रती मनापासून सहानुभूती व्‍यक्‍त करतो. घायाळांना लवकरात लवकर बरे होण्‍यासाठी मी प्रार्थना करतो.

संपादकीय भूमिका

जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये नवीन सरकार स्‍थापन झाल्‍यावर लगेचच हे आक्रमण होते, याचा अर्थ ‘काश्‍मीरमध्‍ये लोकशाही मार्गाने कोणतीही व्‍यवस्‍था आम्‍ही चालू देणार नाही’, असेच आतंकवाद्यांना दाखवून द्यायचे आहे. हे पहाता काश्‍मीर सैन्‍याच्‍याच नियंत्रणात देऊन जिहादी आतंकवादी आणि त्‍यांचे साहाय्‍यक असणारे देशद्रोही धर्मांध मुसलमान यांना धडा शिकवणे आवश्‍यक आहे !