थोडक्यात महत्त्वाचे : मुंबईतील आगीत तिघांचा मृत्यू !…वादातून युवकाची हत्या

मुंबईतील आगीत तिघांचा मृत्यू !

मुंबई – मुंबईतील लोखंडवाला येथील १४ मजली रिया पॅलेसमध्ये सकाळी दहाव्या मजल्यावर आग लागली. त्यात तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीचे कारण अस्पष्ट आहे. आगीत घायाळ झालेल्यांना कूपर रुग्णालयात भरती करण्यात आले होते; पण त्यांपैकी तिघांचा मृत्यू झाला.


वादातून युवकाची हत्या

अमरावती – येथील चित्रा चौकात रात्री गोलू उसरेटे (वय ३० वर्षे) या तरुणाची हत्या करण्यात आली. चाकूने त्याच्या पोटात सपासप वार करण्यात आले. क्षुल्लक वादातून ही हत्या झाल्याचे समजते. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. (वादाचे रूपांतर हत्येत होणे म्हणजे नागरिकांना कायदा-सुव्यवस्थेचा धाकच नसल्याचे लक्षण ! – संपादक)


नायगाव स्मशानभूमीत भ्रमणभाषच्या विजेरीत अंत्यसंस्कार !

नायगाव (पालघर) – येथील कोळीवाडा परिसरात अंत्यसंस्कारासाठी असलेल्या स्मशानभूमीत विद्युत् व्यवस्था नाही. त्यामुळे रात्री भ्रमणभाषच्या विजेरीच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. तेथील पत्रे तुटलेले असल्याने पावसाचे पाणी सरणावर पडते. लोखंडी खांब गंजलेले असून ते कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. तेथील जाळ्याही मोडकळीस आल्या आहेत.

संपादकीय भूमिका : स्मशानभूमीसारख्या ठिकाणी विजेची व्यवस्था केली न जाणे प्रशासनाला लज्जास्पद !


राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर महायुतीतून बाहेर !

मुंबई – राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर महायुतीतून बाहेर पडले आहेत. त्यांचा पक्ष राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. महायुतीतील जागावाटपावरून जानकर असंतुष्ट होते. त्यांनी महायुतीकडे विधानसभेसाठी ४० ते ५० जागांची मागणी केली होती; पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला.


लाडकी बहीण योजनेत भविष्यात वाढ होईल – अजित पवार, उपमुख्यमंत्री

मुंबई – भविष्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून केल्या जाणार्‍या साहाय्यात आणखी वाढ होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. ‘या योजनेसाठी एकूण ४५ सहस्र कोटींचे वर्षभरासाठीचे प्रावधान केलेले आहेत. ही योजना तात्पुरती नाही. हे पैसे तुमचा अधिकार आहे. कुणीही ते काढून घेऊ शकत नाही’, असेही ते म्हणाले.