‘डीप स्टेट’चे नवे प्यादे ‘सोनम वांगचुक’ !

साम्यवादी व्यवस्था निर्माण करण्यासाठी असलेली विचारधारा जी उघडपणे किंवा गुप्तपणे आता असलेल्या व्यवस्था उलथवणार्‍या ‘डीप स्टेट’चे प्रातिनिधिक चित्र

(टीप : ‘डीप स्टेट’ म्हणजे सरकारी अधिकारी आणि खासगी संस्था यांच्यात गुप्त जाळे निर्माण करणारी आणि जी कुणासही उत्तरदायी न रहाता सरकारी धोरणावर प्रभाव टाकणारी विचारधारा.)

‘संपूर्ण जगावर स्वतःचे प्रभुत्व असले पाहिजे’, या महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या काही निरंकुशतावादी शक्ती जगात कार्यरत आहेत. आपल्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी आपल्याला हवे ते भूराजकीय पालट कधी उघड बळजोरीने किंवा आक्रमणांद्वारे, तर कधी गुप्त कटकारस्थानांद्वारे सातत्याने घडवून आणणे, ही या निरंकुशतावादी शक्तींची कार्यशैली असते. या शक्ती, म्हणजे

अ. अमेरिकेचे वर्चस्व जपणारी ‘अँग्लो-सॅक्सन डीप स्टेट’.

आ. संपूर्ण मानवी सभ्यता नष्ट करून तिच्या जागी आपल्या विचारांची साम्यवादी व्यवस्था निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असलेली सांस्कृतिक मार्क्सवादाची विचारधारा, जिचा वापर जगातील उदयोन्मुख महासत्ता असलेला चीन चलाखीने करून घेत असतो.

इ. ‘संपूर्ण जग ख्रिस्ती धर्माच्या प्रभावाखाली असावे’, यासाठी जंग जंग पछाडणारे चर्च.

ई. ‘संपूर्ण जगावर इस्लामचा झेंडा फडकावण्यासाठी आतूर असलेला जिहादी इस्लाम’.

या चारही शक्ती कधी एकमेकांच्या सहकार्याने, तर कधी एकमेकांच्या विरोधात स्वतःचा ‘अजेंडा’ (कार्यसूची) पुढे रेटत असतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी ही अनेक पदर असलेली आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असते, ज्यात कोण कुणासमवेत आणि विरोधक हे वास्तव सतत पालटत रहाते अन् समजून घेण्यास अवघड असते; पण काही विषयांमध्ये मात्र त्यांचे ‘अजेंडे’ असे जुळून येतात की, ते एकदिलाने कामाला लागतात. ‘भारताचे तुकडे करणे’, हा असाच एक कार्यक्रम आहे, ज्यावर या सगळ्यांचे एकमत आहे.

श्री. अभिजित जोग

१. ख्रिस्ती आणि साम्यवादी यांनी चालू केलेली युद्धाची नवीन पद्धत

चिनी तत्त्वज्ञ सुन झु याने २ सहस्र वर्षांपूर्वीच असे सांगून ठेवले आहे की, युद्धभूमीवर समोरासमोर, शस्त्रास्त्रांनी युद्ध करणे, ही जुनी पद्धत झाली. खरे युद्ध, म्हणजे शत्रूच्या प्रदेशातील लोकांचाच वापर करून त्याला आतून पोखरत इतके शक्तीहीन करायचे (सबव्हर्जन) की, तो स्वतःहूनच कोसळून पडेल. या लेखात उल्लेख केलेल्या सर्व निरंकुशतावादी शक्तींना या मार्गाची महती पटून त्यांनी त्याचा वापर चालू केला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या जागतिक वर्चस्वाच्या उद्दिष्टांवर, सद्गुण संकेत करणारे (व्हर्च्यु सिग्नलिंग) आकर्षक मुखवटे चढवून त्यामागे आपल्या विध्वंसक कारवाया चालू ठेवल्या आहेत. या तंत्राची महती सर्वप्रथम पटली, ती ख्रिस्ती चर्चला. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या धर्मप्रसाराच्या उद्दिष्टावर दीनदुबळ्यांना शिक्षण, आरोग्य वगैरे सेवा देण्याचा मुखवटा चढवला. साम्यवाद्यांनी ‘बंदुकीच्या नळीतून येणारी रक्तरंजित क्रांती’, ही उघड भूमिका सोडून संस्कृतीला बळ देणार्‍या संस्थांना आतून वाळवीसारखे पोखरून टाकणारी सांस्कृतिक मार्क्सवादाची संकल्पना आपलीशी केली.

२. ‘डीप स्टेट’ची योजना आणि त्यानुरूप केलेले घातकी सत्तांतरे

अमेरिकेचा स्वार्थ जपणार्‍या ‘डीप स्टेट’ला या तंत्राचे महत्त्व थोडे उशिराने समजले; पण त्यानंतर मात्र त्यांनी अत्यंत प्रभावीपणे त्याचा वापर चालू केला. आधी ‘सीआयए’ (अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा) या सर्वशक्तीमान गुप्तहेर संघटनेद्वारे जगात आपल्याला हवी तशी उलथापालथ घडवून आणण्याचा खेळ खेळला जात असे; पण या भूमीगत पद्धतीने, गुप्तपणे, प्रसंगी हिंसेचा वापर करून केल्या जाणार्‍या कारवायांमुळे ‘उदारमतवादी लोकशाहीचे प्रणेते’ या अमेरिकेच्या प्रतिमेवर ओरखडे पडत असत. हे लक्षात घेऊन अमेरिकेने ‘नॅशनल एंडोमेंट फॉर डेमॉक्रसी’ (एन्.ई.पी.) ही अमेरिकन सरकार आणि ‘सीआयए’ यांची संपूर्ण शक्ती पाठीशी उभी असलेली; पण उघडपणे खासगी मानली जाणारी संस्था उभी केली. ‘संपूर्ण जगात लोकशाहीचा पुरस्कार करणे’, या आकर्षक मुखवट्यामागे ‘विविध देशातील आपल्या नजरेत खुपणारी सरकारे उलथवणे’, हे या संस्थेचे प्रमुख कार्य असते. यासाठी ते स्वतःचे लक्ष्य असलेल्या देशात शिक्षण, पर्यावरण, लोकशाहीची स्थापना यांसारखे आकर्षक मुद्दे घेऊन त्या आधारे सरकारविरुद्ध जनमत सिद्ध करणे, चळवळी उभ्या करणे, समाजात फूट पाडून संघर्ष भडकावणे, अराजकाची परिस्थिती निर्माण करून सरकार उलथवणे, अशा पद्धतीने कार्य करतात. त्या देशात आधीपासूनच लोकशाही अस्तित्वात असेल, तर देशातील लोकशाही कमजोर झाल्याची आवई उठवली जाते. या योजना राबवण्यासाठी त्यांनी प्रचंड आर्थिक शक्ती असलेली फाऊंडेशन्स, माध्यमे, कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था यांचे एक प्रचंड विश्वव्यापी जाळे उभे केले आहे. त्यांनी उभ्या केलेल्या आंदोलनांमागे याच जाळ्याची आर्थिक शक्ती आणि प्रचारतंत्रावरील हुकूमत उभी असलेली हमखास आढळते.

‘डीप स्टेट’च्या योजनेनुसार ‘भारतातील निवडणुकांमध्ये सरकार पालटण्यात यश आले नाही’, असे म्हटल्यावर योगेंद्र यादव यांनी काढलेले ‘यापुढे राज्यघटनेचे रक्षण निवडणुकांमुळे नव्हे, तर जनआंदोलनांमधून होईल’, हे उद्गार पुढे काय वाढून ठेवले आहे, याचेच द्योतक आहेत. इजिप्त, ट्युनिशिया यांसारख्या देशांमध्ये वर्ष २०११ मध्ये झालेली ‘अरब स्प्रिंग’ ही चळवळ, युक्रेनमध्ये वर्ष २००४ मध्ये झालेली ‘ऑरेंज रिव्हॉल्युशन’ चळवळ, तर वर्ष २०१३-१४ मधील ‘युरोमेडन प्रोटेस्ट्स’, वर्ष २०२४ मधील बांगलादेशातील सत्तापालट, अशा अनेक प्रयोगांमधील अनुभवातून नको असलेली सरकारे उलथवणारे ‘रेजीम चेंज एक्स्पर्टस्’ (सरकारे उलथवून टाकणारे तज्ञ) सिद्ध झाले आहेत. अशाच एक ‘तज्ञ’ व्हिक्टोरिया न्यूलँडस् यांची नुकतीच ‘एन्.ई.पी.’च्या संचालिका म्हणून नेमणूक झाली. पूर्वी जे काम ‘सीआयए’ गुप्तपणे करत असे, तेच काम आता ‘एन्.ई.पी.’उघडपणे, स्वतः नीतीमानपणाचा आव आणून करते. अमेरिकेच्या दबावाला न भूलता ‘देशहिताची धोरणे आखणारी सरकारे कशी ‘लोकशाहीविरोधी’ आहेत आणि त्यांना उलथवणे, हे कसे पवित्र कार्य आहे’, असा प्रचार टिपेला नेऊन त्यांची ‘इकोसिस्टम’ (यंत्रणा) या कार्यात महत्त्वाचा हातभार लावते. या चळवळींमधून आजवर विविध देशात लोकशाही नव्हे, तर अराजक, हिंसा आणि विध्वंस यांचे थैमानच निर्माण झाले आहे.

३. आकर्षक व्यक्तीमत्त्वे ही ‘डीप स्टेट’ची नवी खेळी !

सामाजिक न्याय, लोकशाही, पर्यावरण अशा आकर्षक मुखवट्यांसह स्वतःच्या विध्वंसक कारवायांचा स्वीकारार्ह चेहरा ठरतील, अशी काही आकर्षक व्यक्तीमत्त्वेही ते उभी करतात. विविध मानसन्मान, पुरस्कार देऊन एक ‘आयकॉन’ म्हणून त्यांची उभारणी केली जाते. ‘मॅगेसेस’ पुरस्कार या मंडळींना हमखास मिळतो. अनेकदा नोबेल पुरस्कारासाठीही वर्णी लागते. बांगलादेशावर लादल्या गेलेल्या, कुठलीही प्रामाणिकता किंवा राज्यघटनात्मक आधार नसलेल्या सरकारचे ‘सल्लागार’ महंमद युनुस हा असाच एक ‘डीप स्टेट’ने जोपासलेला चेहरा ! भारतातही असे अनेक चेहरे निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. त्यातील एक चेहरा म्हणजे अरविंद केजरीवाल ! आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी केजरीवाल कितपत उपयुक्त ठरतील, याची खात्री उरलेली नसल्यामुळे नव्या चेहर्‍यांचा शोध चालू झाला आहे. यातीलच एक नाव म्हणजे सोनम वांगचुक !

४. अभिनेते आमीर खान, काँग्रेस, चीन आणि सोनम वांगचुक यांचा एकमेकांशी असलेला संबंध

अभिनेते आमीर खानच्या ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटामधील ‘रँचो’ हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावरून घेण्यात आले आहे’, असे सांगण्यात आले आणि त्याच्याभोवती सद्गुणांचे एक वलय निर्माण करण्यात आले. चित्रपटात रँचो हा एका गरीब माळ्याचा मुलगा दाखवण्यात आला आहे; पण सोनम वांगचुक हे एका उच्चभ्रू, श्रीमंत आणि सत्ताधीश कुटुंबात जन्मले, हे मात्र सांगितले गेले नाही. त्यांचे वडील सोनम वांग्याल हे काँग्रेस नेते आणि जम्मू-काश्मीर सरकारमध्ये मंत्री होते. वर्ष २००८ मध्ये काँग्रेस पक्षाने चीनच्या ‘कम्युनिस्ट पक्षा’शी गुप्त समझोता केला, ज्याचा तपशील अजूनही उघड करण्यात आलेला नाही. त्यानंतर आमीर खानच्या चित्रपटांना चीनमध्ये अचानक सहस्रो कोटी रुपयांची रहस्यमय कमाई होऊ लागली. वर्ष २००९ मध्ये काँग्रेस सरकारचे तत्कालीन संरक्षणमंत्री ए.के. अँटनी यांनी लोकसभेत सांगितले, ‘आपण बांधलेले पूल आणि रस्ते यांचा वापर करून चीनने आपल्यावरच आक्रमण करू नये; म्हणून आम्ही भारत-चीन सीमेवर कुठल्याही पायाभूत सुविधा निर्माणच करत नाही.’ आता सोनम वांगचुक यांनी मागणी केली आहे, ‘‘लडाखच्या पर्यावरणावर परिणाम होऊ नये; म्हणून मोदी सरकारने सीमेवरील पायाभूत सुविधांची उभारणी थांबवावी.’’ ‘संपूर्ण लडाख गिळंकृत करण्याची चीनची उघड महत्त्वाकांक्षा असतांना भारतीय सैन्याला वेगवान हालचाली करता याव्यात, यासाठी भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नांना खीळ घालण्याचा हा प्रकार आहे’, जो काँग्रेस आणि सोनम वांगचुक दोघांनाही मान्य आहे अन् अजून बरेच मुद्दे सिद्ध होऊ शकतात !

५. सोनम वांगचुक यांना विदेशातून मिळणारे अर्थसाहाय्य आणि काँग्रेसशी हितसंबंध

सोनम वांगचुक

वर्ष १९८८ मध्ये वांगचुक यांनी लडाखमध्ये ‘स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुव्हमेंट’, तर वर्ष १९९५ मध्ये ‘ऑपरेशन न्यू होप’ यांचा प्रारंभ केला. त्याच्या सर्व प्रकल्पांना ‘फोर्ड फाऊंडेशन’ आणि ‘डॅन चर्च एड’ यांच्याकडून अर्थसाहाय्य मिळत असे. वर्ष १९९० च्या दशकाच्या प्रारंभीला त्याने अमेरिकन रिबेका नॉर्मन हिच्याशी विवाह केला. तिचे शिक्षण अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाशी निकटचा संबंध असलेल्या ‘स्कूल फॉर इंटरनॅशनल ट्रेनिंग  (एस्.आय.टी.)’ आणि हार्वर्ड विद्यापीठ येथे झाले होते. ‘एस्.आय.टी.’ला ‘फोर्ड फाऊंडेशन’ आणि आंतरराष्ट्रीय उद्योगपती जॉर्ज सोरोसच्या ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’कडून अर्थसाहाय्य मिळत असे. रिबेकाशी लग्न झाल्यानंतर वांगचुकला परदेशातून मोठ्या प्रमाणात पैसा मिळू लागला. वर्ष २००२ मध्ये त्यांना ‘अशोका फेलोशिप’ (शिष्यवृत्ती) मिळाली, जी ‘स्कोल फाऊंडेशन’, ‘श्वॅब फाऊंडेशन’ आणि ‘रॉकफेलर फाऊंडेशन’ यांच्या वतीने दिली जात होती.

वर्ष २००४ मध्ये काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी सरकार आल्यानंतर वांगचुकला मोठ्या प्रमाणात नवीन संधी आणि साहाय्य मिळू लागले. लडाखचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ बनवण्याच्या (भविष्यातील लडाख कसे असावे, याविषयीची योजना) समितीवर, तसेच लडाखचे शिक्षण आणि पर्यटन धोरण सिद्ध करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समित्यांवर त्यांची नेमणूक करण्यात आली. काँग्रेसच्या मनमोहन सिंह सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल गव्हर्निंग कौन्सिल फॉर एलिमेंटरी एज्युकेशन’वरही त्यांची नियुक्ती झाली. वर्ष २००७ ते २०१० पर्यंत डेन्मार्कची एक स्वयंसेवी संस्था भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयासाठी काम करत होती. सोनम वांगचुक हे त्यांचे सल्लागार होते. विविध हितसंबंधांच्या जाळ्यातून त्यांची काँग्रेस पक्षाशी कमालीची जवळीक होती, हे स्पष्ट आहे.

६. सोनम वांगचुक यांना कथित आदर्श बनवण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि ‘डीप स्टेट’ यांनी केलेले प्रयत्न !

वर्ष २०१६ मध्ये सोनम वांगचुक यांना स्वित्झर्लंड येथील ‘इंटरनॅशनल युनियन फॉर काँझर्व्हेशन ऑफ नेचर’ यांच्या वतीने ‘फ्रेड एम्. पॅकर्ड’ हा पुरस्कार देण्यात आला. याचे फंडिंग (निधी) ‘रॉकफेलर फाऊंडेशन’कडून झाले होते. वर्ष २०१७ मध्ये ‘फोर्ड फाऊंडेशन’कडून त्यांना ‘टी.एन्. कोशू मेमोरियल अवॉर्ड’ देण्यात आला. वर्ष २०१८ मध्ये वांगचुक यांना ‘फोर्ड फाऊंडेशन’चा सर्वोच्च ‘मॅगेसेस पुरस्कार’ देण्यात आला. प्रतिवर्षी एक महत्त्वाचा पुरस्कार या गतीने त्यांना ‘आयकॉन’ (आदर्श व्यक्तीमत्त्व) बनवले जात होते. ज्या ‘लीड इंडिया’ या संस्थेशी वांगचुक हे संबंधित आहेत, तिला निधीही ‘फोर्ड फाऊंडेशन’कडूनच दिला जातो. वांगचुक यांच्याशी संबंधित असलेली आणखी एक संस्था ‘इंटरनॅशनल असोसिएशन फॉर लडाख स्टडीज’ यांनी लडाखच्या संस्कृतीवर ४ खंड प्रकाशित केले. या प्रकल्पासाठी निधी कुणाकडून आला ? अर्थातच ‘फोर्ड फाऊंडेशन’कडून ! या सर्व माहितीवरून सोनम वांगचुक यांची काँग्रेस पक्ष आणि ‘डीप स्टेट’ची अर्थशक्ती ज्यांच्याद्वारे वापरली जाते, ती फाऊंडेशन्स यांच्याशी किती जवळीक आहे, हे स्पष्ट होते. यातून त्यांनी सोनम वांगचुक यांना ‘एक आयकॉन’ म्हणून उभे करण्यासाठी किती गुंतवणूक केली आहे, हेही लपून रहात नाही. या गुंतवणुकीची परतफेड करण्याची वेळ आता आलेली दिसते. म्हणूनच कलम ३७० (जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम) रहित केल्यानंतर प्रथम त्याचे स्वागत करणार्‍या सोनम वांगचुक यांनी नंतर कोलंटउडी मारून त्या निर्णयाला विरोध करायला प्रारंभ केला. याचा लाभ घेऊन पाकिस्तानने या निर्णयाला लडाखचाही विरोध असल्याचा प्रचार चालू केला. चीन आणि पाकिस्तान यांच्या लाभाच्या ठरतील, अशा चळवळी करण्याची कसली बळजोरी वांगचुक यांच्यावर आहे ?, हा प्रश्न विचारणे आवश्यक आहे.

७. कथित आदर्श व्यक्तीमत्त्वांना वेळीच ओळखणे हे प्रत्येक भारतियाचे कर्तव्य !

आता आपण २१व्या शतकातील गांधी असल्याचा आव आणून वांगचुक यांनी देहलीत उपोषण चालू केले आहे. त्याच्या आधारे भारतविरोधी प्रचार जगभर टिपेला नेला जाईल. बांगलादेशानंतर आता ‘रेजीम चेंज’साठी (सरकारे उलथवून टाकणारे तज्ञ) भारताचा क्रमांक लावण्याची ‘डीप स्टेट’ची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यामुळे पर्यावरण, लोकशाही, राज्यघटना यांसारख्या छान-छान विषयांसाठी आंदोलने करणारे अनेक ‘आयकॉन्स’ आपल्याला बघावे लागणार आहेत. त्यांना वेळीच ओळखणे, हे प्रत्येक भारतियाचे कर्तव्य आहे !’

– श्री. अभिजित जोग, ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकाचे लेखक, पुणे. (७.१०.२०२४)