बाणावली येथे समुद्रात मासेमार पेले यांना सापडले भगवान श्रीविष्णूच्या १० अवतारांच्या मूर्तींचे शिल्प

समुद्रात सापडलेले श्रीविष्णूच्या दशावतारांचे शिल्प दाखवत असतांना बाणावलीचे पारंपरिक मासेमार पेले

मडगाव, १२ ऑक्टोबर (वार्ता.) – बाणावली येथील पारंपरिक मासेमार तथा पारंपरिक मासेमार संघटनेने अध्यक्ष पेले यांना समुद्रात आलेल्या वादळाच्या वेळी भगवान श्रीविष्णूच्या १० अवतारांचे चंदनाच्या लाकडावरील कोरीव शिल्प सापडले. काही जणांनी हे शिल्प पैसे देऊन विकत घेण्याची सिद्धता दर्शवली; मात्र मासेमार पेले यांनी शिल्प हिंदूंच्या देवतेचे असल्याने विक्री करण्यास नकार दर्शवला.

समुद्रदेवतेने दिलेली भेट म्हणून शिल्पाची विक्री न करता ते स्वत:कडे ठेवले ! – पारंपरिक मासेमार पेले

याविषयी अधिक माहिती देतांना मासेमार पेले म्हणाले, ‘‘हल्लीच समुद्रात वादळ आले असताना लाटांवर वहात आलेले हे देवाचे हे शिल्प मला सापडले. काही हिंदु बांधवांकडून मला शिल्पाचे महत्त्व लक्षात आले. हे शिल्प ५० सहस्र ते १ लाख रुपये देऊन विकत घेण्याचे प्रस्ताव माझ्याकडे आले होते; मात्र हे शिल्प देवाचे असल्याने हा प्रस्ताव मी फेटाळला. आम्ही गोमंतकीय सर्व धर्मांचा आदर करतो. एकजुटीने आणि शांततेने रहातो. ही शिकवण आम्हाला लहानपणापासून मिळाली आहे. मिळालेले हे शिल्प ‘ज्याच्यावर आमची उपजीविका चालते, त्या समुद्रदेवतेने मला दिलेली भेट आहे’, असे मी समजतो. हे शिल्प म्हणूनच माझ्याकडे ठेवले आहे.’’