‘नमस्कार करणे’, हा हिंदु मनावर असलेला एक सात्त्विक संस्कार !

‘माझे वडील कै. शंकर खंडोजी दाभोलकर हे मूलतः सात्त्विक होते. ते मनमिळाऊ होते. त्यांचा आजूबाजूच्या परिसरातील अनेक लोकांशी परिचय होता. ते नेहमी सायकलने प्रवास करत. ते मार्गातून जात असतांना त्यांना परिचित व्यक्ती दिसल्यास तिला नमस्कार करत. मी कधी कधी त्यांच्या समवेत जात असे. तेव्हा त्यांची ही कृती मला अयोग्य वाटत असे. त्यांनी परिचित व्यक्तींना नमस्कार केल्यावर कुणी त्यांच्याकडे पाहून प्रतिसाद द्यायचे, तर कुणी त्यांच्याकडे पहातही नसत. तेव्हा ‘वडिलांनी असे करायला नको’, असे मला वाटत असे. मी अनुमाने १४ – १५ वर्षांचा झाल्यावर ‘त्यांच्यातील या गुणाचे बीज माझ्या मनामध्ये कधी अंकुरित झाले ?’, हे मला कळलेच नाही. (एकदा प.पू. डॉक्टरांनी मला सांगितले, ‘‘तुमचे वडील संत होते.’’)

(पू.) श्री. गुरुनाथ दाभोलकर

माझ्यामध्ये असलेल्या या गुणाचा काही जणांवर संस्कार होतो, तर काही जणांना मी तसे करणे अयोग्य वाटते. मी कुडाळ येथील सनातनच्या सेवाकेंद्रात असतांना एका सत्संगात एक ज्येष्ठ साधक म्हणाले, ‘‘काय हे दाभोलकर, ऊठसूठ कुणालाही नमस्कार करत असतात.’’ त्यांचे हे बोल ऐकून माझे मन काहीसे अस्थिर झाले. तेव्हा मला वाटले, ‘माझ्या या सवयीला आवर कसा घालायचा ?’; पण मन सांगेल, ते तन स्वीकारत नव्हते. ‘प्रत्येकात देवाचा अंश आहे’, अशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण आहे. दिसणार्‍या प्रत्येक व्यक्तीला नमस्कार करण्याची सवय सोडण्याचा माझा जो विचार होता, त्या विचाराला एक दिवस खो पडला, तो असा …

‘नमस्कार करणे’, हा हिंदु मनावर असलेला एक सात्त्विक संस्कार !, समृद्ध हिंदु संस्कृतीचा वारसा जपणारी कृती, ‘भक्तीभाव, प्रेम, आदर आणि लीनता’ यांसारख्या दैवी गुणांची अभिव्यक्ती करणारी एक सहज, सुंंदर आणि सुलभ धार्मिक कृती होय !’, असे माझ्या वाचनात आल्यावर माझ्या मनाचा ठाम निर्णय झाला की, ‘कुणी हसो वा काही असो, ‘नमस्कार करणे’, सोडायचे नाही.’ खरेतर माझ्या या नमस्काराच्या कृतीने आधुनिक वैद्य, व्यावसायिक,  व्हॉलीबॉल खेळाडू आणि बरेच परिचित माझ्याशी जोडले गेले आहेत. त्याचा मला फार मोठा लाभ झाला आहे.

माझ्या या नमस्कार करण्याच्या कृतीमुळेच मूलतः मी सनातन संस्थेशी जोडला गेलो आहे.

एकदा श्री समर्थ रामदासस्वामींचा एक श्लोक माझ्या वाचनात आला.

नमस्कारें लीनता घडे । नमस्कारें विकल्प मोडे ।
नमस्कारें सख्य घडे । नाना सत्पात्रासीं ।। – दासबोध, दशक ४, समास ६, ओवी १४

अर्थ : नमस्काराने अंगी नम्रता येते, नमस्काराने मनातील शंका नाहीशी होते, नमस्कारामुळे निरनिराळ्या संतसज्जनांशी मैत्री, सख्य होते.

असे असतांना मी माझी नमस्कार करण्याची कृती कुणी काहीही म्हटले, तरी का बरे सोडू ? परात्पर गुरुमाऊलींच्या कृपेने सुचलेले हे शब्द त्यांच्या सुकोमल चरणी समर्पित !’

– (पू.) गुरुनाथ दाभोलकर (सनातनचे ४० वे संत, वय ८४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२३.६.२०२४)