म्हापसा येथे समस्त हिंदु संघटनांनी अनधिकृत फुलविक्रेत्यांच्या विरोधात राबवली मोहीम
म्हापसा, ११ ऑक्टोबर (वार्ता.) – दसर्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात झेंडू किंवा अन्य फुले यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. यामुळे कर्नाटक राज्यातील हावेरी, हुब्बळ्ळी आदी ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणावर फुलविक्रेते गोव्यात ठिकठिकाणी रस्त्याच्या बाजूला अनधिकृतपणे फुलांची विक्री करत असतात. म्हापसा येथे ‘शिवराज्य प्रतिष्ठान गोवा’ आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी ११ ऑक्टोबर या दिवशी म्हापसा परिसरात फुलांची अनधिकृत दुकाने उभारणार्यांच्या विरोधात जागृती मोहीम राबवली. समस्त हिंदु संघटनांनी या वेळी म्हापसा नगरपालिका, म्हापसा पोलीस ठाणे, काणका-वेर्ला पंचायत आणि पर्रा पंचायत या ठिकाणी अनधिकृत फुले विकणार्यांवर कारवाई करण्याची मागणी संबंधितांना भेटून केली. या वेळी म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्षा नूतन डिचोलकर आणि म्हापसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनीही याविषयी कारवाई चालू असल्याचे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या शिष्टमंडळाला सांगितले.
या वेळी म्हापसा येथील जागरूक युवकांनी एकत्र येऊन म्हापसा परिसरातील बाजार, गिरी येथील ‘ग्रीन पार्क’ हॉटेल, जुने आझिलो रुग्णालय, तारीकडे आदी ठिकाणी अनधिकृत फुलविक्रेत्यांवर पोलिसांच्या सहकार्याने बंदी आणली. जागरूक युवकांनी अनधिकृत फुलविक्रेत्यांचे आधारकार्ड तपासण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. या वेळी ‘शिवराज्य प्रतिष्ठान गोवा’चे अध्यक्ष गोविंद गोवेकर यांनी म्हापसा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना एक निवेदन देऊन रस्त्याच्या बाजूला अनधिकृत फुलविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
स्थानिक फुलविक्रेत्यांना शासनाने पाठिंबा देण्याची मागणी
मडगाव – दसर्याच्या पार्श्वभूमीवर मडगाव मार्केट येथे मोठ्या प्रमाणावर झेंडूची फुले विक्रीसाठी आलेली आहेत. कर्नाटक राज्यातील हावेरी, हुब्बळ्ळी आदी ठिकाणच्या फुलविक्रेत्यांनी मडगाव परिसरात रस्त्याच्या बाजूने फुले विकण्याची दुकाने थाटलेली आहेत. स्थानिक विक्रेत्यांनाच व्यवसाय मिळावा, यासाठी काही स्थानिक हिंदु संघटनांनी मडगाव आणि फोंडा येथे फुले विकण्यासाठी सुमारे १५ दुकाने उघडलेली आहेत. स्थानिक संघटना ‘हिंदु एकता मंच’चे रवींद्र पै म्हणाले, ‘‘भाविकांना झेंडुची फुले विकण्यासाठी हिंदु संघटनांचा हा पहिलाच प्रयत्न आहे. परराज्यांतून फुले आणून ती विकली जात आहेत. यंदा प्रथमच हा उपक्रम राबवला जात आहे.’’ सरकार स्थानिक फुलविक्रेत्यांना प्रोत्साहन देणार कि पराराज्यांतील अनधिकृत फुलविक्रेत्यांना प्रोत्साहन देणार ? असा प्रश्न सूज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अनधिकृत फुलविक्रेत्यांच्या विरोधातील मोहिमेला चांगला प्रतिसाद
राज्यात यंदा दसर्याच्या पूर्वसंध्येवर चालू झालेल्या अनधिकृत फुलविक्रेत्यांच्या विरोधातील मोहिमेला म्हापसा, काणकोण, मडगाव, फोंडा आदी भागांत चांगला प्रतिसाद लाभत असल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी अनधिकृत फुलविक्रेते आणलेली फुले परत घेऊन जातांना दिसून आले.