१. साधिकेला झालेले त्रास
१ अ. १४.१.२०२२ या दिवशी झालेले त्रास
१ अ १. यज्ञस्थळी अर्धा घंटाच बसू शकणे आणि एकाग्रतेने नामजप न होणे अन् रात्री घशात टोचल्यासारखे होणे : ‘१४.१.२०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री राजमातंगी याग झाला. त्या दिवशी मी यज्ञस्थळी अर्धा घंटाच उपस्थित राहू शकले. या वेळेत माझा नामजप झाला नाही आणि मला एकाग्रता साधता आली नाही. देवाने माझ्याकडून ‘यज्ञकुंडातून निघत असलेल्या धुरातील चैतन्य आम्हा साधकांना ग्रहण करता येऊ दे. सर्वांची प्राणशक्ती वाढू दे. आमच्या साधनेतील सर्व अडथळे दूर होऊ देत. आम्हा सर्वांची साधना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी होऊ दे’, अशी प्रार्थना करून घेतली.
त्यानंतर मला घशात टोचल्यासारखे होत होते. माझ्या तोंडात कफ येत होता आणि माझी चिडचिड होत होती. मी रात्रभर बसून होते. माझ्या दोन्ही नाकपुड्या रात्री बंद असल्याने मला श्वास घ्यायला त्रास होत होता. मी स्वतःवरील त्रासदायक आवरण काढून नामजप करत होते.
१ आ. १५.१.२०२२ या दिवशी ‘श्री प्रत्यंगिरा यागाला जाऊ नये’, असे वाटणे : १५.१.२०२२ या दिवशी मी रामनाथी आश्रमात झालेल्या श्री प्रत्यंगिरा यागाला गेले नाही. मला ‘यागाला जावे’, असे वाटत नव्हते. मी खोलीच्या बाहेर येऊन ‘या यागाचा लाभ सर्व साधकजनांना होऊ दे. आम्हा सर्वांकडून तुम्हाला अपेक्षित अशी साधना होऊ दे’, अशी प्रार्थना केली.
१ इ. १६.१.२०२२ या दिवशी झालेले त्रास
१ इ १. थकवा असल्याने नामजपादी उपाय न होणे आणि शरीर दुखत असणे : १६.१.२०२२ या दिवशी मी औषध घेतल्याने मला दिवसभर ग्लानी होती. मला २ – ३ दिवस थकवा असल्यामुळे माझ्याकडून नामजपादी उपाय झाले नाहीत. माझे शरीर दुखत होते. मला होत असलेल्या त्रासामुळे मी बगलामुखी यागाला गेले नाही. ‘मला हे सर्व आध्यात्मिक त्रासामुळे होत आहे’, हे माझ्या लक्षात आले होते. माझ्याकडे देवाची आठवण काढल्याविना काहीच पर्याय नव्हता. मी त्याचे स्मरण करत रडत होते.
१ इ २. मला रात्री श्वास घेणे कठीण झाले. आधुनिक वैद्य मला औषध देत होते आणि ‘‘वाफ घे आणि गुळण्या कर’’, असे सांगत होते. मला परिस्थिती स्वीकारता येत नव्हती. माझ्या मनात नकारात्मक विचार येत होते.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधिकेला बरे वाटण्याविषयी आश्वस्त करणे
२ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधिकेला ‘१ – २ दिवसांत बरी होशील’, असे सांगणे : मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना लघुसंदेश करून माझ्या स्थितीविषयी सांगितले. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘तुझ्या त्रासाची तीव्रता अधिक असल्याने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना तुझ्यासाठी नामजपादी उपाय करायला सांगितले आहेत. तू ‘निर्गुण’ हा नामजप कर. तुला १ – २ दिवसांत बरे वाटेल.’’
२ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची कृपा अनुभवणे : मी
नामजपादी उपाय करत असतांना मला वाटले, ‘सद्गुरु गाडगीळकाका माझ्यासाठी किती करतात ! श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ देवीस्वरूप आहेत. त्यांचे सर्व साधकांवर किती बारकाईने लक्ष आहे ! त्या माझ्यासारख्या सामान्य साधिकेला उभारी देत आहेत.’ नंतर मला प्रेरणा मिळाली. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि सद्गुरु गाडगीळकाका यांच्या प्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे.
२ इ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेल्या नामजपादी उपायांतील सामर्थ्य अनुभवणे : सद्गुरु काकांनी माझ्यासाठी नामजपादी उपाय केल्यावर मला काही क्षणांतच बरे वाटले. मला नाकाने श्वास घेता आला. माझा घसा मोकळा झाला. मला नामजप करतांना ‘कधी झोप लागली ?’, ते समजलेच नाही. स्थुलातून सर्व उपचार करूनही माझा त्रास न्यून होत नव्हता; मात्र सद्गुरु काकांनी केलेल्या सामर्थ्यशाली नामजपादी उपायांनी माझा त्रास न्यून झाला.
त्यानंतर मला थकवा आला. मी थोडेसे चालले, तरी माझे पाय दुखत असत. माझे शरीरही दुखत होते. आधुनिक वैद्यांनी मला वेदनाशामक गोळी दिली.
३. त्यानंतर २ दिवसांनी मला बरे वाटले. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे बोलणे आठवून माझा कंठ दाटून आला. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यातील सामर्थ्याची मला प्रचीती आली.’
– सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१.२०२२)
|