‘११.५.२०२३ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्सव’ सोहळा फार्मागुडी (गोवा) येथील मैदानात पार पडला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने या सोहळ्याचे वैज्ञानिक संशोधन करण्यात आले. त्यात ब्रह्मोत्सवापूर्वी आणि नंतर काही घटकांची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील नोंदींविषयी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. मधुरा कर्वे यांच्या मनात निर्माण झालेले काही प्रश्न आणि देवाच्या कृपेमुळे सूक्ष्मातून प्राप्त झालेल्या ज्ञानाद्वारे मी दिलेली त्यांची उत्तरे पुढे दिली आहेत.
(भाग १)
१. प्रश्न क्र. १
ब्रह्मोत्सवापूर्वी रामनाथी आश्रमातील माती आणि पाणी यांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळून आली नाही; पण देवद अन् वाराणसी येथील आश्रमांतील माती अन् पाणी, तसेच हवा यांमध्ये उत्तरोत्तर अधिक प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळून आली. यामागील कारण काय ?
१ अ. उत्तर
१ अ १. स्थानमाहात्म्य : रामनाथी आश्रमाची भूमी मुळातच सात्त्विक आहे. तेथे देवतांचा सूक्ष्मातून वास आहे, तसेच या परिसरात सूक्ष्मातून एक महात्मा आणि एक ऋषि साधना करतात. त्यामुळे असुरांच्या सूक्ष्मातील आक्रमणांचा परिणाम रामनाथी आश्रमातील माती आणि पाणी यांच्यावर झाला नाही. त्या तुलनेत देवद अन् वाराणसी येथील आश्रमांतील भूमीत सात्त्विकता अल्प आहे. त्यामुळे तेथे अनिष्ट शक्तींच्या सूक्ष्मातून होणार्या आक्रमणांचा परिणाम अधिक दिसून येतो.
१ अ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व : रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉक्टरांचे प्रत्यक्ष अस्तित्व आहे. त्यांच्या देहातून प्रक्षेपित होत असलेल्या चैतन्याचा रामनाथी आश्रमातील सजीव आणि निर्जीव घटकांवर सातत्याने परिणाम होत असतो. त्यामुळे अनिष्ट शक्तींना त्यांवर सूक्ष्मातून आक्रमणे करण्यासाठी अधिक शक्तीचा व्यय करावा लागतो; परिणामी तेथील माती आणि पाणी यांमध्ये नकारात्मक ऊर्जा नाही.
२. प्रश्न क्र. २
ब्रह्मोत्सवापूर्वी साधकांमध्ये नकारात्मक ऊर्जा पुष्कळ आणि सकारात्मक ऊर्जा अत्यल्प आढळून आली. यामागे काय कारण आहे ?
२ अ. उत्तर
२ अ १. ब्रह्मोत्सवात अडथळे आणण्यासाठी पाताळातील अनिष्ट शक्तींचे नियोजन असणे : पृथ्वीवर कुठलाही कार्यक्रम होण्याआधी पाताळातील अनिष्ट शक्तींना सूक्ष्मातून त्याची माहिती असते. ब्रह्मोत्सवापूर्वी ३ मास अनिष्ट शक्तींनी ‘परात्पर गुरु डॉक्टर, सनातन संस्थेचे देश-विदेशांतील साधक आणि संत’ यांच्यावर सूक्ष्मातून आक्रमणे करण्याचे नियोजन केले होते.
२ अ २. ७ व्या पाताळातील ‘तंत्रशिखर’ आणि ‘तंत्रमेरु’ या अनिष्ट शक्तींकडे ब्रह्मोत्सवात अडथळे आणण्याचे उत्तरदायित्व असणे : ७ व्या पाताळात तंत्रयोगानुसार साधना करणारे आणि गुप्त विद्यांचे अधिपती असलेले ‘तंत्रशिखर’ अन् ‘तंत्रमेरु’, अशा २ अनिष्ट शक्ती आहेत. त्यांच्याकडे ब्रह्मोत्सवात अडथळे आणण्याचे उत्तरदायित्व होते. या अनिष्ट शक्तींची वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
२ अ २ अ. तंत्रशिखर : तंत्राचे ९ मुख्य आणि ८१ उपभाग आहेत. ‘तंत्रशिखर’ या अनिष्ट शक्तीला तंत्राविषयी संपूर्ण ज्ञान आणि अनुभव आहे. या अनिष्ट शक्तीने उपासनेमुळे तंत्राची अत्युच्च स्थिती प्राप्त केली आहे. त्यामुळे या अनिष्ट शक्तीला ‘तंत्रशिखर’, अशी उपमा दिलेली आहे. ‘तंत्रशिखर’ या अनिष्ट शक्तीकडे हत्तीप्रमाणे बलशाली अनिष्ट सिद्धी आहेत. त्यामुळे त्याला ‘गजसिद्ध’, अशीही उपमा आहे.
२ अ २ आ. तंत्रमेरु : येथे ‘मेरु’ हा शब्द ‘कणा’ किंवा ‘आधार’ या अर्थांनी आहे. अनिष्ट शक्ती कोट्यवधी वर्षांपासून सातव्या पाताळात तंत्राचा उपयोग करत आहेत. त्या तंत्रविद्येला मूर्त स्वरूप देण्याचे प्रधान कार्य ‘तंत्रमेरु’ या अनिष्ट शक्तीचे आहे. ‘तंत्रविद्येचा आधारस्तंभ किंवा कणा’, या अर्थांनी या अनिष्ट शक्तीला ‘तंत्रमेरु’, हे संबोधन आहे.
२ अ ३. तंत्रशिखर आणि तंत्रमेरु यांचे कार्य : ‘तंत्रशिखर’ आणि ‘तंत्रमेरु’ या अनिष्ट शक्तींनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्यापूर्वी ३ मास पाताळभैरवीची उपासना चालू केली होती.
२ अ ३ अ. पाताळभैरवी : ‘पाताळभैरवी’ ही भगवान शिवाच्या तमोगुणापासून निर्माण झाली आहे. सप्तपाताळांत ही ‘दैत्यदेवी’ या नावाने प्रचलित आहे.
२ अ ३ आ. तंत्रशिखर, तंत्रमेरु आणि पाताळभैरवी : परात्पर गुरु डॉक्टरांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्यात अडथळे आणण्यासाठी तंत्रशिखर आणि तंत्रमेरु या अनिष्ट शक्तींनी ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या आधी ३ मास पाताळभैरवीला प्रसन्न करून घेतले. त्यामुळे पाताळभैरवीने तंत्रशिखर आणि तंत्रमेरु या अनिष्ट शक्तींना ‘कला’ अन् ‘शिखा’ या दोन अनिष्ट सिद्धी प्रदान केल्या.
२ अ ३ आ १. ‘कला’ या सिद्धीचे कार्य : ‘कला’ या अनिष्ट सिद्धीमुळे कोणत्याही अनिष्ट शक्तीला व्यक्तीच्या श्वासोच्छ्वासाच्या गतीनुसार तमोगुण, म्हणजे त्रासदायक (काळी) शक्ती निर्माण करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते.
२ अ ३ आ २. ‘शिखा’ या सिद्धीचे कार्य : या अनिष्ट सिद्धीमुळे कोणत्याही अनिष्ट शक्तीला काही क्षणांत व्यक्तीचे मन आणि बुद्धी भ्रमित करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते.
२ अ ४. तंत्रशिखर आणि तंत्रमेरु या अनिष्ट शक्तींनी सिद्धींद्वारे ब्रह्मोत्सवात आणलेले सूक्ष्मातील अडथळे : तंत्रशिखर आणि तंत्रमेरु या अनिष्ट शक्तींनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्यापूर्वी ३ मास परात्पर गुरु डॉक्टर, सनातनचे संत आणि देश-विदेशांतील सहस्रो साधक यांच्यावर सूक्ष्मातून आक्रमणे करण्यास आरंभ केला. या अनिष्ट शक्तींनी ‘कला’ या आसुरी सिद्धीद्वारे साधकांवर त्रासदायक (काळ्या) शक्तीचे आवरण आणणे, तसेच ‘शिखा’ नावाच्या अनिष्ट सिद्धीद्वारे ‘साधकांचे मन आणि बुद्धी भ्रमित करणे अन् त्यांचे लक्ष ब्रह्मोत्सव सोहळ्यापासून विचलित करणे’, यांसाठी पुष्कळ प्रयत्न केला. त्यामुळे काही साधकांना ‘परात्पर गुरु डॉक्टरांचा ब्रह्मोत्सव सोहळा पाहू नये, त्यात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभागी होऊ नये आणि ब्रह्मोत्सवात काही अर्थ नाही’, असे वाटणे, निरुत्साह येणे, उदासीनता येणे अन् काही न सुचणे’, इत्यादी त्रास होऊ लागले.
२ अ ४ अ. अनिष्ट शक्तींचा संत आणि साधक यांच्यावर सूक्ष्मातून आक्रमणे करण्याचा प्राधान्यक्रम : तंत्रशिखर आणि तंत्रमेरु या अनिष्ट शक्तींनी सूक्ष्मातून सर्वप्रथम परात्पर गुरु डॉक्टरांवर वेगवान अन् प्रचंड क्षमतेने आक्रमणे केली. त्यानंतर त्यांनी अनुक्रमे सनातनचे संत, आश्रमातील साधक आणि देश-विदेशांतील प्रसारातील साधक यांच्यावर आक्रमणे केली.
२ अ ४ आ. ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने अनिष्ट शक्तींनी सूक्ष्मातील आक्रमणांद्वारे परात्पर गुरु डॉक्टरांवर राग व्यक्त करण्यामागील कारणे
२ अ ४ आ १. परात्पर गुरु डॉक्टरांचे धर्मरक्षणाचे कार्य सूर्यप्रकाशाप्रमाणे होत असणे : सध्या हिंदु धर्माचा र्हास मोठ्या प्रमाणात होत असून पृथ्वीवर अधर्माचा अंधार मोठ्या प्रमाणात पसरत आहे; याउलट परात्पर गुरु डॉक्टर सूर्यप्रकाशाप्रमाणे धर्मरक्षणाचे कार्य करत आहेत. त्याविषयीचा राग अनिष्ट शक्तींच्या मनात आहे. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या व्यतिरिक्त अन्य कुणीही पृथ्वीला अनिष्ट शक्तींच्या प्रकोपातून वाचवू शकणार नाही’, हे त्यांना ठाऊक आहे.
२ अ ४ आ २. अनिष्ट शक्तींना पृथ्वीवर अधर्माचा प्रसार करण्यातील सर्वांत मोठा अडथळा परात्पर गुरु डॉक्टरांचा वाटतो. त्यामुळे अनिष्ट शक्ती परात्पर गुरु डॉक्टरांना प्राणपणाने विरोध करत असतात.
२ अ ४ आ ३. ‘साधक आणि संत यांना ब्रह्मोत्सवाचा आध्यात्मिक लाभ मिळू नये’, यासाठी अनिष्ट शक्ती प्रयत्नशील असणे : ‘ब्रह्मोत्सवाद्वारे परात्पर गुरु डॉक्टरांकडून वातावरणात पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होणार आहे’, हे अनिष्ट शक्तींना सूक्ष्मातून आधीच ठाऊक होते. त्यामुळे अनिष्ट शक्तींनी ‘ब्रह्मोत्सवातील चैतन्याचा लाभ होऊ नये’, यासाठी साधक आणि संत यांच्यावर सूक्ष्मातून तीव्र स्वरूपात आक्रमणे केली; परिणामी ब्रह्मोत्सवापूर्वी साधकांमध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा दिसून आली.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.८.२०२३)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/843755.html
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’ या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या http://goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |
|