बैरूत (लेबनॉन) – इस्रायलने बैरूतच्या दक्षिणेकडील भागात जोरदार हवाई आक्रमण केले. लेबनॉनमधून सीरियामध्ये जाणारा मार्ग या आक्रमणामुळे उद्ध्वस्त झाला. हिजबुल्लाचे आतंकवादी शस्त्रास्त्रे आणि अन्य युद्धजन्य साहित्य सीरियामध्ये नेण्यासाठी या मार्गाचा वापर करत होते. लेबनॉनमध्ये इस्रायलद्वारे करण्यात येत असलेल्या हवाई आक्रमणांपासून वाचण्यासाठीही तेथील नागरिक या मार्गाचा वापर करून सीरियात जात होते.
हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेला सीरियामार्गे इराणकडून शस्त्रांचे मोठे साहाय्य मिळत असल्याचे मानले जाते. सीरियातही हिजबुल्लाचा गट सक्रीय आहे. तेथे सीरियाचे राष्ट्रपती बशर-अल्-असद यांच्यासाठी हिजबुल्लाचे आतंकवादी लढत आहेत. लेबनॉनच्या दक्षिणेकडील भागातील नागरिकांना संबंधित क्षेत्र रिकामे करण्याचा इशारा इस्रायलने दिला होता. त्यानंतर त्याने या भागावर जोरदार हवाई आक्रमण केले.