राजकीय अधिष्ठानाहून धार्मिक अधिष्ठान कायम मोठे आहे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान, कणेरी मठ येथील ‘संत समावेश’ सोहळ्याची उत्साहात सांगता

सोहळ्यात संत-महंत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवा झेंडा फडकावला 

कोल्हापूर, २ ऑक्टोबर (वार्ता.) – आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही. कुणाच्याही धर्माचा अनादर करत नाही; पण आमच्या धर्माचे रक्षण करणे, हे आमचे परमकर्तव्य आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत सर्व साधू-संतांनी, म्हणजे धर्मसत्तेने राज्यसत्तेला सतत मार्गदर्शन करण्याची दिव्य परंपरा आहे. त्यामुळे राजकीय अधिष्ठानाहून धार्मिक अधिष्ठान कायम मोठे आहे. महायुती सरकारच्या कालावधीत साधू-संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, अशी चेतावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली. १ ऑक्टोबर या दिवशी श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान, कणेरी मठ येथील संत समावेश’ सोहळ्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी अदृश्य काडसिद्धेश्‍वर महाराज, महंत रामगिरी महाराज, ह.भ.प. निरंजननाथ महाराज, पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज आदी उपस्थित होते.

सोहळ्यात संत-महंत यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान करण्यात आला 
सोहळ्यात उपस्थित असलेले वारकरी आणि भक्त
सोहळ्यात पुंगनूर गायीची पूजा करतांना मुख्यमंत्री, संत-महंत
सोहळ्यात हात उंचावून अभिवादन करतांना मुख्यमंत्री, संत-महंत 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, हिंदु धर्मातील साधू-संतांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेणे, हे धर्मपालन आहे. हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर सतत टीका करणार्‍या टोळ्या आहेत, त्यांचे विचारांद्वारे निर्दालन करणे आवश्यक आहे, हे सांगणारे आमचे हिंदुत्व आहे. धर्मजागृतीसाठी अशी संमेलने होणे, ही काळाची आवश्यकता आहे. कोट्यवधी लोकांना जागृत करण्याची शक्ती संतांकडे आहे. त्यामुळे या संमेलनामुळे समाजात बराच फरक पडेल.