हुपरी येथील अनधिकृत मदरशावरील अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन !

‘मुस्लिम सुन्नत जमियत’ने उभारलेला हाच तो अवैध मदरसा !

हुपरी (जिल्हा कोल्हापूर), २ ऑक्टोबर (वार्ता.) – हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे गायरान भूमीवर ‘सुन्नत जमियत’ने अतिक्रमण करून त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करून त्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे हे अतिक्रमण तात्काळ निष्कासित करण्याची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने १ ऑक्टोबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. हिंदुत्वनिष्ठ श्री. नितीन काकडे यांनी श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान, कणेरी मठ येथील ‘संत समावेश’ सोहळ्याच्या वेळी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी कार्यालयाने २५ जानेवारी १९८४ या दिवशी हुपरी येथील या ‘मुस्लिम सुन्नत जमियत’ यांचा जागा मागणी अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर तहसीलदार यांनी १५ नोव्हेंबर १९८३ या दिवशी मदरसा काढून घेण्यासाठी ७ दिवसांच्या मुदतीची नोटीस दिली. त्यानंतर पुन्हा १८ ऑगस्ट १९९० या दिवशी जिल्हाधिकार्‍यांनी अतिक्रमण काढून नोटीस दिली. त्यानंतर अपर तहसीलदार यांनी २ ऑगस्ट २०१९ या दिवशी ‘मुस्लिम सुन्नत जमियत’ला अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस दिली. आता पुन्हा हुपरी नगर परिषदेने तात्काळ अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस दिली आहे, तसेच मिळकतीमधील वीज बंद करण्यात आली आहे. प्रवेशास बंदीची नोटीस असतांनाही या जागेचा गैरवापर चालूच आहे. त्यामुळे अतिक्रमण तात्काळ निष्काषित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.