वक्‍फ बोर्डाकडून परभणी येथील ६२१ मालमत्ताधारकांना नोटिसा !

व्‍यापारी वर्गात संतप्‍त प्रतिक्रिया

प्रतिकात्मक चित्र

परभणी – महाराष्‍ट्र राज्‍य वक्‍फ बोर्डाने परभणी शहरातील ६२१ मालमत्ताधारकांना नोटिसा बजावून त्‍यांची मालमत्ता स्‍वतःची असल्‍याचा दावा केला आहे. त्‍यामुळे व्‍यापारीवर्गात संतप्‍त प्रतिक्रिया उमटल्‍या आहेत. मे आणि ऑगस्‍ट महिन्‍यांत या नोटिसा काढण्‍यात आल्‍या होत्‍या. ज्‍यामध्‍ये या मालमत्तांवर अनधिकृत ताबा असल्‍याचा आरोप करण्‍यात आला आहे.

महाराष्‍ट्र राज्‍य वक्‍फ मंडळाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्‍यद यांच्‍या स्‍वाक्षरीने लागू झालेल्‍या या नोटिसांमध्‍ये संबंधित मालमत्ताधारकांना ४ आठवड्यांची मुदत देण्‍यात आली आहे. यामध्‍ये त्‍यांनी त्‍यांच्‍या मालमत्तेविषयीचे स्‍पष्‍टीकरण देणे आवश्‍यक आहे. जर त्‍यांनी दिलेल्‍या मुदतीत उत्तर दिले नाही, तर त्‍यांच्‍यावर फौजदारी कारवाई करण्‍यात येईल, असे नोटिसीत स्‍पष्‍टपणे म्‍हटले आहे.

या नोटिसांमुळे व्‍यापारीवर्गात प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. बहुतांश व्‍यापारी त्‍यांच्‍या मालमत्तांवर अनेक वर्षांपासून व्‍यापार करत आहेत आणि त्‍यांना या नोटिसीमुळे त्‍यांच्‍या मालमत्तांच्‍या भवितव्‍याविषयी मोठी चिंता निर्माण झाली आहे. व्‍यापारी संघटनांच्‍या मते, या मालमत्तांचे व्‍यवहार कायदेशीर आहेत आणि कोणत्‍याही प्रकारे अनधिकृत ताबा घेण्‍यात आला नाही, असा त्‍यांचा दावा आहे. या नोटिसीमुळे मालमत्ताधारकांच्‍या चिंतेत भर पडली आहे. काही व्‍यापार्‍यांनी या नोटिसीविषयी अधिक स्‍पष्‍टता मागितली आहे, तर काहींनी वक्‍फ बोर्डाकडून या प्रकरणात अधिक सुस्‍पष्‍ट माहिती देण्‍याची मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका :

  • वक्‍फ बोर्डाचा कायदा कायमस्‍वरूपी रहित करण्‍यासाठी हिंदूंनी संघटित व्‍हावे !
  • वक्‍फ बोर्डाकडून आता भूमी जिहाद करण्‍यात येत आहे. त्‍यामुळे व्‍यापार्‍यांनी संघटित होऊन या वक्‍फ बोर्डाच्‍या विरोधात लढा दिला पाहिजे. जर हिंदू जागे झाले नाहीत, तर दुकानांप्रमाणे हिंदूंच्‍या घरांवरही वक्‍फ बोर्ड ‘त्‍यांची संपत्ती आहे’ म्‍हणून दावा करू शकते, हे हिंदूंनी लक्षात घ्‍यावे.