पिंपरी (जिल्हा पुणे) – आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञान असलेले तब्बल २ सहस्र ७५० सीसीटीव्ही कॅमेरे शहरात गर्दीचे ठिकाण, महत्त्वाचे चौक, अपघातप्रवण क्षेत्र आदी ठिकाणी बसवले जाणार आहेत. वाहतुकीच्या कायद्याची कडक कार्यवाही आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे कॅमेरे उपयुक्त ठरणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका वोल्क्सरा टेक्नो सोल्युशन आस्थापनाच्या साहाय्याने शहरातील विविध भागात हे कॅमेरे बसवणार आहेत. या संपूर्ण प्रणालीवर देखरेख करण्यासाठी नियंत्रण कक्षही उभारला आहे.
प्रारंभीच्या टप्प्यात चिंचवड स्टेशन, इंद्रायणीनगर, आकुर्डी चौक, निगडी येथील टिळक चौक, प्रभाग कार्यालय, रुग्णालय, शाळा, उद्याने अशा ६०६ ठिकाणी हे कॅमेरे बसवले आहेत. संबंधित कॅमेर्यातील प्रणाली २४ घंटे कार्यरत राहून ३६० अंशामधील घडामोडी चित्रीत करू शकते. त्यामुळे शहरात घडणार्या घडामोडींचे बारकाव्यांनी चित्रीकरण करता येईल. महापालिका आणि स्मार्ट सिटी प्रथमच अशा प्रकारचा प्रकल्प राबवत आहे. स्मार्ट सिटीने चालू केलेल्या उपक्रमामुळे वाहतूक नियमन सुधारण्यास साहाय्य झाले. नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण सिद्ध होण्यासही हातभार लागत आहे, असे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण राज यादव यांनी सांगितले. शहरात पाळत ठेवण्याच्या दृष्टीने हे कॅमेरे उपयुक्त आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिल्याने सकारात्मक पालट दिसतील, असे वोल्क्सरा टेक्नो सोल्युशनच्या संस्थापक संचालक सायली लाड यांनी सांगितले.