दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : इलेक्ट्रिकच्या दुकानाला आग !; पुण्यातील अवैध हुक्का पार्लरवर धाड !

इलेक्ट्रिकच्या दुकानाला आग !

नाशिक – येथील मुंबई नाका परिसरातील शताब्दी रुग्णालयाच्या संकुलात तळमजल्यावरील इलेक्ट्रिकच्या दुकानाला रात्री १ वाजता आग लागली होती. २ घंटे शर्थीने प्रयत्न करून अग्नीशमनदलाने आगीवर नियंत्रण मिळवले. वरच्या मजल्यावरील रुग्णालयास आगीची झळ पोचण्यापासून वाचवण्यात सैनिकांना यश आले.


पुण्यातील अवैध हुक्का पार्लरवर धाड !

पुणे – कोंढव्यातील मॅश हॉटेलमध्ये चालू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड घातली. या कारवाईत तंबाखूजन्य पदार्थ, हुक्का पात्र असा ३६ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मॅश हॉटेलचे मालक अली इरानी आणि व्यवस्थापक अली सय्यद यांसह अन्य ३ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (अशांवर पोलिसांनी कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक)


बिबट्याच्या आक्रमणात ८ वर्षीय मुलाचा मृत्यू !

पुणे – जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथे बिबट्याच्या आक्रमणात रूपेश जाधव (वय ८ वर्षे) याचा मृत्यू झाला. रूपेश प्रातर्विधीसाठी गेला असतांना बिबट्याने त्याच्यावर झडप घालून जवळच्या उसाच्या शेतात ओढत नेले.


शहापूर येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू !

शहापूर (जिल्हा ठाणे) – तालुक्यात २४ सप्टेंबरला रात्री मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट यांमुळे शेंद्रूण येथे वीटभट्टीवर काम करणार्‍या दिनेश जाधव (वय ३० वर्षे) याचा वीज पडून मृत्यू झाला.


पामबीचवर अपघातात १ जण जागीच ठार !

नवी मुंबई – येथील पामबीच मार्गावर २३ सप्टेंबरला रात्री झालेल्या अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाला असून १ जण घायाळ झाला. अपघातानंतर प्रचंड वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका १ घंट्याहून अधिक वेळाने घटनास्थळी पोचली. तोपर्यंत रस्त्यावरच मुलाच्या मृतदेहाजवळ पालकांनी आक्रोश केला होता.


उद्योग आणि पर्यटन वाढीला चालना द्या !  – राधाकृष्णन्

सातारा २५ सप्टेंबर (वार्ता.) – सातारा जिल्ह्याला निसर्गाचे कोंदण लाभले आहे. यामुळे जिल्ह्यामध्ये देशातील पर्यटकांसह विदेशी पर्यटकांचेही येणे-जाणे चालू असते. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग आणि पर्यटन क्षेत्राच्या वाढीला विशेष चालना द्यावी, असे निर्देश राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांनी दिले आहेत.  शासनाने ७०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, असे त्यांनी सांगितले.