पणजी, २४ सप्टेंबर (वार्ता.) – राज्यात २४ सप्टेंबर या दिवशी पडलेल्या मुसळधार पावसाने गोवा राज्याला झोडपून काढले. दुपारपर्यंत पडलेल्या मुसळधार पावसाने राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आणि नद्यांच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली. पणजी येथे बसस्थानक आणि पाटो भाग येथे पाणी साचल्याने दुचाकी चालकांना वाहने चालवणे कठीण झाले. अंत्रुजनगर, कुर्टी, फोंडा येथील एक संरक्षक भिंत कोसळून पडली. पेडणे येथील मासळी बाजारात पाणी शिरले. त्यासह राज्यात अनेक ठिकाणी पडझड झाल्याच्या घटना घडल्या.
हवामान खात्याने २५ सप्टेंबर या दिवशी ‘ऑरेंज अलर्ट’ (मुसळधार पाऊस) जारी केला असून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे, तसेच २६ सप्टेंबर या दिवशी ‘यलो अलर्ट’ (मध्यम पाऊस) जारी करण्यात आला आहे. गेल्या २४ घंट्यांमध्ये गोव्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला. हवामान खात्याच्या नोंदीनुसार २४ सप्टेंबरला सकाळी ८.३० वाजेपर्यंत फोंडा भागात सर्वाधिक म्हणजे ७९ मी.मी. पावसाची नोंद झाली. मडगाव येथे ४५.४ मी.मी., दाबोली येथे २७.२ मी.मी., काणकोण येथे २४.३ मी.मी., याप्रमाणे पावसाची नोंद झाली. १ जून २०२४ ते आतापर्यंत सांगे भागात सर्वाधिक म्हणजे ५२७२.२ मी.मी., सांखळी येथे ४६३५.६ मी.मी. आणि पेडणे येथे ४३१८.५ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.
मुसळधार पावसामुळे सासष्टी येथील जनजीवन विस्कळीत
१. मुसळधार पावसाने सासष्टी भागातील जीवन विस्कळीत झाले.
२. वेर्णाहून लोटलीकडे जाणार्या मार्गावर दरड कोसळली. यामुळे दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाकडून एका बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली. अग्नीशमनदलाच्या सैनिकांनी घटनास्थळी पोचून दगड आणि माती हटवली. जवळजवळ ३ घंट्यांनी रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
३. जोरदार पावसामुळे मडगावसह सासष्टी परिसरातील रस्त्यांवर पाणी साचलेले दिसून आले. सकाळी पावसाचा जोर अधिक असल्याने शाळा-महाविद्यालयांत जाणारे विद्यार्थी, तसेच कामावर निघालेले नागरिक यांची तारांबळ उडाली.
४. मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात पाणी साचले होते. यामुळे रुग्णांना पाण्यातूनच वाट काढत जावे लागत होते.
पावसामुळे पिकांची हानी
सासष्टी भागातील बहुतांश शेतकर्यांनी पावसाच्या पूर्वार्धात भाताची लावणी केली होती. आत थोड्याच दिवसांत पिकांची कापणी करायची स्थिती असतांना पाऊस पडल्यामुळे पिकांची हानी होणार आहे.