कल्याण, २४ सप्टेंबर (वार्ता.) – आज संपूर्ण जग छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकौशल्याचा विद्यापिठाच्या स्तरावरून अभ्यास करत आहे. या युद्धनीतीचा अविभाज्य भाग असलेल्या आरमाराच्या निर्मितीचे स्मारक आता जवळपास ४०० वर्षांनंतर सुमारे २५ एकर जागेवर कल्याणच्या खाडीकिनारी उभे रहात आहे. त्याकाळी हे आरमार उभारतांना शिवाजी महाराजांनी सरखेल, सरनौबत या पदांवर काम करणारी मंडळी कदाचित कल्याणबाहेरून नेमली असतील; पण सामान्य बांधकाम कारागीर हे कल्याण आणि परिसरातीलच असतील. ते कोण ? त्यांचे वंशज कोण ? त्यातील कुणी ही कला जपली आहे का ? त्यांच्यापैकी कुणाकडे काही कागदपत्रे किंवा संबंधित हत्यारे आहेत का ? त्यांची वंशावळ कुणी जतन केली आहे का ? हे शोधण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार, ‘लोकसत्ता’चे माजी निवासी संपादक श्री. सुधीर जोगळेकर यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार श्री. शेखर जोशी यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स – ठाणे प्लस’ पुरवणीतील लिहिलेल्या ‘विस्मरणातील कल्याणकर’ या लेखमालिकेच्या पुस्तकाचे प्रकाशन श्री. जोगळेकर यांच्या हस्ते नुकतेच येथे झाले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे संचालक अधिवक्ता सुरेश पटवर्धन, श्री. भालचंद्र जोशी, श्री. मयुरेश आगलावे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती
श्री. श्रीराम मोडक, ‘विस्मरणातील कल्याणकर’ पुस्तकाचे लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. शेखर जोशी, सार्वजनिक गणेशोत्सव सुभेदार वाडा मंडळाचे या वर्षीचे अध्यक्ष श्री. प्रवीण शिंपी, श्री. राम जोशी उपस्थित होते.
श्री. जोगळेकर पुढे म्हणाले की, आपल्या शहरासाठी आणि समस्त कल्याणकरांसाठी अवघे आयुष्य वेचलेल्या पितरांचे स्मरण आणि त्यांच्या कार्याची नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी ‘स्वर्गीय गंगाधरपंत जोशी उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार समिती’ने ‘विस्मरणातील कल्याणकर’ पुस्तकाची निर्मिती केली आहे. कल्याणची ओळख जपणारी ठिकाणे विकासाच्या धबडग्यात हरवली जाण्याची शक्यता आहे. विस्मरणात जाणार्या कल्याणच्या ओळखीच्या ठिकाणांवरही श्री. शेखर जोशी यांनी लिहावे.
याच कार्यक्रमात ‘स्वर्गीय गंगाधरपंत जोशी उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार समिती’कडून देण्यात येणारा या वर्षीचा ‘उत्कृष्ट कार्यकर्ता’ पुरस्कार श्री. रघुनंदन दाबके यांना श्री. जोगळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ११ सहस्र रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.