मुंबई – येत्या पाच वर्षांमध्ये मुंबईत रस्त्यांची तब्बल ५८ सहस्र कोटींची कामे केली जाणार आहेत. एम्.एम्.आर्.डी.ए. (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण)ने या प्रकल्पाला संमती दिली आहे. मुंबईत येत्या पाच वर्षांत ९० किलोमीटरचे रस्ते बांधले जाणार आहेत. उत्तर, दक्षिण आणि पश्चिम या दिशेने मुंबईत येणार्या रस्त्यांत वाढ होणार आहे. यात वेगवेगळ्या भागांतील रस्ते, उड्डाणपूल, रिंग रोड आणि भुयारी मार्ग यांचा समावेश आहे. ‘शहराच्या एका बाजूकडून दुसर्या बाजूला पोचायला एका घंट्याच्या वर लागता कामा नये’, असे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
मुंबईतील वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईतील पायाभूत सुविधांवर ताण येतो. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरातील गर्दी दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतूककोंडीला आणि खड्ड्यांच्या रस्त्यांना नागरिकांना प्रतिदिन सामोरे जावे लागत आहे. या प्रकल्पाने या समस्या सुटतील, असा जाणकारांचा कयास आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणसमवेत मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र रस्ते वाहतूक विकास प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हेही एकत्रित काम करणार आहेत. यातील काही प्रकल्प पूर्ण, काही चालू, काही निविदा अवस्थेत तर काही नियोजन अवस्थेत आहेत.
मुंबई हे असे पहिले शहर ठरेल, जिथे समुद्रातून, खाड्यांमधून, वन क्षेत्रातून आणि अगदी शहरी भागातील महामार्गातूनही भुयारी वा उड्डाणपुलाच्या माध्यमातून जाणारे ‘रिंग रोड’ असतील, असे एम्.एम्.आर्.डी.ए.चे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले आहे.