५ सहस्र स्वामीभक्तांचा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

प्रभु श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य टीका केल्याचे प्रकरण

जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाप्रसंगी उपस्थित शिवसेनेचे खासदार श्री. धैर्यशील माने यांसह अन्य स्वामीभक्त

ज्ञानेश महाराव यांना अटक करण्याची स्वामीभक्तांची मागणी

कोल्हापूर – ठाणे येथील संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य टीका केली आहे. महाराव यांनी अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले असून संत गाडगे महाराज आणि संत श्री तुकाडोजी महाराज यांच्या कार्यावर आक्षेप घेतला. ज्ञानेश महाराव यांनी केलेल्या टीकेमुळे श्री स्वामी समर्थ भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला असून ‘ज्ञानेश महाराव यांना अटक करा’, या मागणीसाठी ५ सहस्र श्री स्वामी समर्थ भक्तांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्च्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

२० सप्टेंबरला सकाळी ११ वाजता ऐतिहासिक दसरा चौकात श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून मोर्चाचा प्रारंभ करण्यात आला. मोर्च्यामध्ये भजनी मंडळे, टाळ, मृदुंग, निषेधार्थ फलक, भगवे झेंडे, भगव्या टोप्या घालून ‘श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ’, हा गजर करत भक्त सहभागी झाले होते. या वेळी ‘हा तर एक महाभाग’, ‘कावळा करतो काव काव; चोपून काढा महाराव’, यांसह अन्य घोषणा देण्यात आल्या. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे गेल्यावर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी शिवसेनेचे खासदार श्री. धैर्यशील माने, उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ, स्वामीभक्त सर्वश्री सुहास पाटील, धनंजय महिंद्रकर, कुलदीप जाधव, अरुण गवळी, प्रथमेश माळी, रमेश चावरे, धनंजय महिंद्रकर, अमोल कोरे, गुरुदेव स्वामी, अभिनंदन शिंदे यांसह अन्य सहभागी होते.