११.५.२०२३ या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव फर्मागुढी (गोवा) येथील मैदानात साजरा करण्यात आला. या सोहळ्यापूर्वी साधकाला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. पहाटे आलेल्या अनुभूती
अ. ‘पहाटे ४.३० वाजता आमच्या घरी मला तिरुपति बालाजी आणि लक्ष्मी यांचे अस्तित्व जाणवले.
आ. पहाटे ५.३० वाजता ‘मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन घेत आहे’, असे मला जाणवले. ही जाणीव स्थूल आणि सूक्ष्म यांचा सुवर्णमध्य साधणारी होती.
इ. मी सकाळी ६.३० वाजता घराच्या आगाशीत आलो. तेव्हा वातावरण उल्हसित करणारे वाटत होते. त्या वेळी माझ्याकडून गुरु आणि ईश्वर यांचे स्मरण आतून स्वयंस्फूर्तीने होत होते.
ई. मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचेही सूक्ष्मातून दर्शन झाले. मला गुरूंविषयी पुष्कळ आत्मीयता वाटत होती.
२. ‘साधकांच्या गाड्यांना लावण्यासाठी मिळालेल्या स्टिकरमधून कारंज्याप्रमाणे चैतन्याचे प्रक्षेपण होत आहे’, असे जाणवणे
मी सकाळी ७.३० वाजता रामनाथी (गोवा) येथील आश्रमात गेलो. एका साधिकेकडून मला ब्रह्मोत्सवाच्या ठिकाणी नेण्यात येणार्या साधकांच्या गाड्यांना लावण्यासाठी स्टिकर मिळाले. तेव्हा ‘त्या स्टिकरमधून कारंज्याप्रमाणे चैतन्याचे प्रक्षेपण होत आहे’, असे मला जाणवले. ते दृश्य डोळे दीपवणारे होते.
३. ध्यानमंदिरातील देवतांची पूजा करत असतांना जाणवलेली सूत्रे
अ. आश्रमातील ध्यानमंदिरात पूजा करतांना एक वेगळाच प्रकाश जाणवत होता.
आ. सर्व देवतांची चित्रे आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आणखी जिवंत वाटत होते. त्यांतील रंगांची छटा वेगळीच जाणवत होती.
इ. ‘देवतांची चित्रे नवीनच आणली आहेत’, असे मला वाटत होते.
ई. पूजा झाल्यानंतर ‘देवता आणि गुरु यांच्या चरणांतून चैतन्याचा स्रोत निघून तो माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी येत आहे’, असे मला दिसले.
उ. ‘आनंद किती घेऊ आणि किती नाही ?’, असे मला झाले होते.
ऊ. एखादे बालक खेळण्याच्या दुकानात गेल्यावर त्याला ‘दुकानातील सर्वच खेळणी घ्यावीत’, असे वाटते, तसेच मला होत होते. ‘सगळीकडून चैतन्य घेत रहावे’, असे मला वाटत होते.
४. ब्रह्मोत्सवाच्या वेळी मिळालेल्या सेवा करण्यात एक वेगळाच आनंद होता. गुरूंकडून पुष्कळच ऊर्जा आणि बळ मिळत होते.
५. पहाटे घरात तिरुपति बालाजीचे अस्तित्व जाणवण्यामागील कारणाचा झालेला उलगडा
श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे) यांनी सांगितले, ‘‘सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितले आहे की, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा हा जन्मोत्सव सोहळा तिरुपति बालाजीच्या ब्रह्मोत्सवाप्रमाणे करावा.’’ ते ऐकून माझ्या मनात विचार आला, ‘प.पू. गुरुदेव हे श्री बालाजीचे रूप आहेत.’ तेव्हा ‘त्या दिवशी पहाटे ४.३० वाजता मला घरात श्री तिरुपति बालाजीचे अस्तित्व का जाणवले ?’, याचा मला उलगडा झाला.’
– पशूवैद्य अजय जोशी (वय ६८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), फोंडा, गोवा. (१२.५.२०२३)
|