संपादकीय : भारतद्वेषी राहुल गांधी

विरोधी पक्ष नेते राहुल गांधी

काँग्रेसचे खासदार आणि भारतीय संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. या दौर्‍याच्या कालावधीत त्यांनी केलेली विधाने पहाता ते न केवळ भारताची आणि लोकशाही यांची अपकीर्ती करत आहेत, तर या विधानांमध्ये चीनचे कौतुक करणे, देशातील आरक्षण आणि बेरोजगारी यांच्या माध्यमातून भारताची अपकीर्ती होईल अशांचा समावेश आहे. याचसमवेत ते दौर्‍याच्या कालावधीत कट्टर इस्लामी, खलिस्तानचे समर्थन करणारे, ज्या घटकांना भारतात फुटीरतावाद हवा आहे असे यांना जाणीवपूर्वक ठळकपणे भेटत आहेत. यावरून ‘गांधी’ कुटुंबियांमध्ये ‘भारत’ आणि ‘हिंदु’ द्वेष कशा प्रकारे नसानसांत भिनला आहे, हेच सातत्याने समोर येते. खरे पहाता आपण जेव्हा भारत सोडून अन्य देशात जातो, तेव्हा भलेही आपण विरोधी पक्षात असलो, तरी देशाच्या विरोधात वक्तव्य न करणे, देशाच्या धोरणांच्या विरोधात न बोलणे हे अपेक्षित असते; कारण भारताबाहेर गेल्यावर ते प्रत्येकाला भारताचा प्रतिनिधी म्हणून पहातात. याउलट राहुल गांधी मात्र जेव्हा जेव्हा परदेश यात्रा करतात, तेव्हा तेव्हा ते भारत, देशातील लोकशाही व्यवस्था, भाजप सरकार यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. काँग्रेसच्या कार्यकाळापेक्षा भारतात सध्या लोकशाही व्यवस्थेपासून संरक्षण, परराष्ट्र धोरण यांसह प्रत्येक क्षेत्रात भारताची चांगली स्थिती असतांना राहुल गांधी मात्र इंग्लंड, अमेरिका आदी ठिकाणी गेल्यावर तेथील लोकांसमोर नेहमी दिशाभूल करणारी, भारताची मानहानी करणारी, फुटीरतावादाला प्रोत्साहन देणारी वक्तव्ये नेहमीच करतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योगपती जॉर्ज सोरोस आणि त्यांचे साहाय्यक जे भारतविरोधी खोटे कथानक बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचा ‘एक प्रमुख तोंडवळा’ हे राहुल गांधी आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

भारतविरोधी जिहाद्यांच्या भेटी !

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील रेबर्न हाऊसच्या कार्यालयात अनेक अमेरिकेतील खासदारांची भेट घेतली. यात पाकिस्तानचे उघड समर्थन करणारी आणि नेहमी भारतविरोधी भूमिका घेणारी अमेरिकी प्रतिनिधी सदस्य इलहान उमर उपस्थित होती. इलहान ही कट्टर इस्लामी, ‘स्वतंत्र काश्मीर’ची पुरस्कर्ती असून ती खलिस्तान समर्थकही आहे. भारतविरोधी आतंकवादी कारवाया करणार्‍या जिहादी आतंकवाद्यांना इलहानचा पाठिंबा असून तिने गतवर्षी ‘पाकव्याप्त काश्मीर’मध्ये जाऊन भारतात आतंकवादी आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्याहीपुढे जाऊन इलहानने अमेरिकेच्या संसदेत भारताच्या विरोधात ठराव मांडला होता, ज्यात भारताला ‘धार्मिक स्वातंत्र्याची चिंताजनक स्थिती असलेला देश’, असे नामांकित करण्याची मागणी केली होती. अशा भारतविरोधी, जिहादी प्रवृत्तीच्या व्यक्तींना भेटून राहुल

गांधी भारताच्या शत्रूंना उघड पाठिंबा देऊन नेमके काय साध्य करत आहेत ? भारताच्या शत्रूंना उघडपणे पाठबळ पुरवून भारत कमकुमत करण्याचा प्रयत्न करणे, हा देशद्रोहच आहे ! अशा प्रकारे देशद्रोह्यांच्या पक्षांना आणि त्यांच्या लोकप्रनिधींना भारतीय मतदारांनी जेव्हा जेव्हा त्यांना मतदानाची संधी मिळेल, तेव्हा मतपेटीतून धडा शिकवण्याची संधी सोडायला नको.

… जाणीवपूर्वक अपकीर्ती

जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश असा आहे की, जिथे प्रत्येकाला त्याच्या धर्मानुसार आचरण आणि वेशभूषा करण्याचे स्वातंत्र्य आहे. प्रत्येक समुदायाचे, संप्रदायाचे लोक भारतात आनंदाने रहातात आणि एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात. शीख हे स्वातंत्र्यपूर्व काळातही भारतात पगडी घालत होते आणि हातात कडे घालत होते अन् आताही शीख या दोन्ही गोष्टी करत आहेत. असे करण्यापासून त्यांना कधीच कुणी रोखले नाही. असे असतांना अमेरिकेत व्हर्जिनियामध्ये एका माणसाला राहुल गांधी म्हणाले, ‘‘तुम्हाला शीख म्हणून भारतात पगडी घालण्याची अनुमती मिळेल का ? एक शीख म्हणून त्यांना भारतात कडे घालण्याची अनुमती मिळेल का ? हाच आमचा लढा आहे आणि केवळ त्यांच्यासाठी नाही, तर सर्व धर्मांसाठी आम्ही लढत आहोत’’, अशा प्रकारची विधाने करून राहुल गांधी जाणीवपूर्वक भारतात शिखांना धार्मिक स्वातंत्र्य नसल्याची खोटी माहिती देऊन किंवा तसा संभ्रम निर्माण करणारे प्रश्न विचारून परदेशात भारताची अपकीर्ती करत आहेत. खरे पहाता वर्ष १९८४ नंतर इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यावर उसळलेल्या दंगलीत शिखांना जाणीवपूर्वक लक्ष केले गेले आणि ती काँग्रेस पुरस्कृत दंगल होती. त्यामुळे ज्यांच्या पक्षाच्या कार्यकाळात शीख असुरक्षित होते, त्यांनी असे प्रश्न उपस्थित करणे, म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’च होय !

महाभारत काळात एकलव्याचा अहंकार वाढू नये; म्हणून द्रोणाचार्य यांनी एकलव्याचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मागितला, हे वास्तव आहे. असे असतांना आणि कुठेही उच्च-नीच असा भेदभाव नसतांना ‘बेरोजगारी’ या विषयाशी या वास्तवाशी काही संबंध नसतांना ‘महाभारतात आदिवासी समाजातून आलेल्या एकलव्याने युद्धकलेत निष्णात गुरु द्रोणाचार्य यांच्याकडे धनुर्विद्या शिकण्याची इच्छा व्यक्त केल्यावर उजव्या अंगठ्याची मागणी केली’, असे सांगत ‘कौशल्याचा आदर करून आणि कुशल लोकांना आर्थिक-तांत्रिक साहाय्य देऊन भारताची तांत्रिक क्षमता वाढवली जाऊ शकते’, असे मत मांडले. अशा प्रकारे अर्धवट विधान ऐकल्यावर कुणालाही भारतात आदिवासी लोकांकडून शास्त्र शिकण्याची संधी उच्चवर्णीय जाणीवपूर्वक काढून घेत होते, असा अपसमज निर्माण होऊ शकतो किंबहुना तो व्हावा म्हणूनही राहुल गांधी तसे बोलले असतील. महाभारतातील जगाला आदर्श असणार्‍या व्यक्ती आणि व्यक्तीरेखा यांवर जाणीवपूर्वक चुकीची विधाने करणारे राहुल यांच्या मनातील हिंदु संस्कृतीविषयी असणारा हिंदुद्वेषच पुन्हा उघड झाला आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ९९ जागा मिळाल्यापासून काँग्रेस आणि राहुल गांधी आता उघडउघड भारतविरोधी भूमिका घेत आहेत. बांगलादेशात ज्या प्रकारे शेख हसीना यांना अराजक माजवून पळवून लावण्यात आले, तोच प्रकार राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी यांना भारतात करायचा आहे. त्यामुळे मणीपूर, शीख, शेतकरी अथवा समाजातील प्रत्येक घटकाच्या मनात भारत, भारतीय शासनकर्ते, धोरणे यांच्याविषयी असंतोष पसरवून देशातही अराजकता माजावी, अशा दृष्टीने राहुल गांधी यांची वाटचाल चालू आहे. त्यामुळे प्रत्येक भारतियाने आता याकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे. प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाने अशा राष्ट्रद्रोह्यांचा खरा चेहरा उघडा पाडण्यासाठी प्रयत्न करणे, त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचे खटले नोंद करणे, मतपेटीद्वारे शक्ती दाखवून काँग्रेसचे अस्तित्व शून्य करणे, असे करणे नितांत आवश्यक आहे !

काँग्रेस आणि राहुल गांधी हे उघडउघड भारतविरोधी भूमिका घेत असतांना प्रत्येक भारतियाने त्यांना जाब विचारायला हवा !