कोल्हापूर महापालिकेने पंचगंगा नदी परिसरात उभारलेले ‘बॅरिकेड्स’ तोडून गणेशभक्तांकडून श्री गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन !

  • हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पुढाकार

  • सलग दुसर्‍या वेळी प्रशासनाची बंदी झुगारून नदीत विसर्जन

  • मूर्तीदान म्हणून घेतलेल्या श्री गणेशमूर्ती हिंदुत्वनिष्ठांकडून पुन्हा नदीत विसर्जन

(‘बॅरिकेड्स’ म्हणजे तात्पुरते लावलेले अडथळे)

पंचगंगा नदी परिसरात लावलेले ‘बॅरिकेड्स’ हटवतांना हिंदुत्वनिष्ठ आणि गणेशभक्त

कोल्हापूर, १२ सप्टेंबर (वार्ता.) – विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि गणेशभक्त यांनी निवेदनांद्वारे वारंवार मागणी करूनही महापालिका प्रशासनाने आडमुठी भूमिका न सोडता यंदाही घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीत होऊ नये, यासाठी संपूर्ण पंचगंगा नदी परिसरात ‘बॅरिकेड्स’ (अडथळे) लावले होते. गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशभक्तांनी ही सक्ती झुगारून पंचगंगा नदी परिसरात असलेले ‘बॅरिकेड्स’ काढले आणि श्री गणेशमूर्तींचे पंचगंगा नदीतच विसर्जन केले. आदल्यादिवशीच हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी गणेशभक्तांना विसर्जनासाठी नदीवर जमा होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार दुपारी १ वाजल्यापासूनच गणेशभक्तांनी विसर्जनासाठी नदीवर येण्यास प्रारंभ केला.

पंचगंगा नदी परिसरात लावलेले ‘बॅरिकेड्स’हटवून झाल्यावर उपस्थित हिंदुत्वनिष्ठ आणि गणेशभक्त

प्रारंभी काही काळ पोलीस आणि प्रशासनाने आलेल्या गणेशभक्तांना ‘बॅरिकेड्स’च्या बाहेर रोखले; मात्र गणेशभक्तांच्या आक्रमकतेसमोर पोलिसांनाही माघार घ्यावी लागली. प्रारंभी गणेशभक्तांनी एका बाजूचे ‘बॅरिकेड्स’ काढले, नंतर उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी अन्य बाजूचेही ‘बॅरिकेड्स’ काढून गणेशभक्तांना नदीत विसर्जन करायला जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. या प्रसंगी ‘हिंदुत्वनिष्ठ कोल्हापूर’, ‘गणपति बाप्पा मोरया’ यांसह अन्य घोषणांनी पंचगंगा नदीकाठ दणाणून गेला.

या प्रसंगी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. श्री गणेशमूर्ती नदीतच विसर्जन करावयास मिळाल्याविषयी अनेक भाविकांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला. अनेक गणेशभक्तांनी वाजत-गाजत सहकुटुंब येऊन श्री गणेशमूर्तींचे पंचगंगेत विसर्जन केले. हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना या वहात्या पाण्यातच विसर्जन होण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांना आता मूर्त स्वरूप प्राप्त होतांना दिसत आहे.

पंचगंगा नदीच्या परिसरात एक नाला वहात येऊन थेट नदीत मिसळत होता. यामुळे परिसरात घाण पाणी साचून दुर्गंधी येत होती. हिंदुत्वनिष्ठांनी याविषयी आवाज उठवल्यावर महापालिका प्रशासनाला जाग आली आणि मनपाने पसरलेल्या पाण्यावर पावडर टाकली.

शहरात काही गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी, तसेच काही चौकांमध्ये विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. तेथे काही राजकीय, तसेच लोकप्रतिनिधींनीही आवाहन करणारे फलक लावले होते. काही भाविकांनी विसर्जन कुंडात श्री गणेशमूर्ती दिल्या; मात्र त्याला मिळणारा प्रतिसाद हा अल्प होता.

मूर्तीदान म्हणून घेतलेल्या श्री गणेशमूर्ती हिंदुत्वनिष्ठांनी नदीत विसर्जन केल्या !

पंचगंगा नदी पीरसरात दान मिळालेल्या मूर्ती ट्रकमधून परत खाली उतरवून नदीत विसर्जनासाठी नेतांना हिंदुत्वनिष्ठ
पंचगंगा नदी पीरसरात दान मिळालेल्या मूर्ती ट्रकमधून परत खाली उतरवून नदीत विसर्जनासाठी नेतांना हिंदुत्वनिष्ठ

सकाळपासून पंचगंगा नदीच्या बाहेर काही स्वयंसेवी संस्था आणि महापालिका प्रशासनाने श्री गणेशमूर्ती दान घेऊन त्या एके ठिकाणी ठेवल्या होत्या. या मूर्ती घेऊन जाण्यासाठी एक ट्रक आला. हे हिंदुत्वनिष्ठांना कळताच त्यांनी ट्रकमधून मूर्ती काढून त्या पुन्हा पंचगंगा नदीत विसर्जित केल्या, तसेच परिसरात ठेवलेल्या विसर्जन कुंडातील पाणी खाली ओतून कुंड उलटे करून ठेवले.

उपस्थित मान्यवर

हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई आणि शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, सकल हिंदु समाजाचे श्री. अभिजित पाटील, उद्योजक श्री. प्रसन्न शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे आणि करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, पंचगंगा विहार मंडळाचे सदस्य श्री. सुशील भांदिगरे, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापूरे, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. शरद माळी, हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांच्यासह अनेक श्री गणेशभक्त उपस्थित होते.

जोपर्यंत आकाशात सूर्य-चंद्र आहे, तोपर्यंत श्री गणेशमूर्तींचे पंचगंगा नदीतच विसर्जन होणार ! – गजानन तोडकर, शहराध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन

गणेशभक्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी वारंवार आवाहन करूनही महापालिका प्रशासन हिंदूंच्या धार्मिक भावनांना शून्य किंमत देते, हेच यातून सिद्ध होते. जर ‘इकोफ्रेंडली’ गणेशोत्सव असेल, तर इकोफ्रेंडली ‘बकरी ईद’ आणि ‘नाताळ’ का नाही ? अन्य धर्मियांचे सण ‘इकोफ्रेंडली’ (पर्यावरणपूरक) साजरे करण्याचे आवाहन का करत नाही ? यापुढील काळात श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे नदी प्रदूषण होते, असा कांगावा महापालिका प्रशासनाने बंद करावा आणि पुढील वर्षीपासून महापालिकेने बोध घेऊन ‘बॅरिकेड्स’ लावणे बंद करावे. जोपर्यंत आकाशात सूर्य-चंद्र आहे, तोपर्यंत श्री गणेशमूर्तींचे पंचगंगा नदीतच विसर्जन होईल.

इचलकरंजीतही उत्साहात पंचगंगा नदीतच विसर्जन !

इचलकरंजी शहरातही भाविकांनी पंचगंगा नदीतच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले.

‘श्री गणेशमूर्ती पंचगंगा नदीतच विसर्जन करा’ असे आवाहन करणारा फलक घेऊन पंचगंगा नदीपरिसरात उभे असलेले हिंदुत्वनिष्ठ श्री. बाळासाहेब निगवेकर

श्री. बाळासाहेब निगवेकर हे वयोवृद्ध हिंदुत्वनिष्ठ सकाळी १० वाजल्यापासून ‘श्री गणेशमूर्तीचे विसर्जन पंचगंगा नदीतच करा’, असे आवाहन करणारा फलक घेऊन पंचगंगा नदीपरिसरात उभे राहिले होते.

संपादकीय भूमिका

धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचा आदर्श सर्वांनी घ्यावा !