‘हे गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), या जिवाला तुमचा कधी स्थुलातून सहवास लाभला नाही. ‘आपण सद्गुरु दादांच्या (सद्गुरु राजेंद्र शिंदे) माध्यमातून या जिवाला आणि देवद आश्रमातील साधकांना आपला सत्संग आणि सहवास देता’, असे सतत वाटते. ‘सद्गुरु दादांच्या सहवासात आपणच भेटता’, असे मला वाटते आणि भावजागृती होते. ते सर्वांशी प्रेमाने, आईच्या मायेने वागतात, बोलतात आणि सहजावस्थेत असतात.
१. सहजता, दिसले ते कर्तव्य, इतरांचा विचार आणि निरपेक्षता
एके दिवशी एका बालसाधिकेची (१२ वर्षे) आई रुग्णाईत होती; म्हणून ती डबा भरत होती. तिलाही थकवा आलेला होता. तिला जेवणाचा डबा भरणे जमत नव्हते. हे सद्गुरु दादांच्या लक्षात आले आणि त्यांनी इतरांना न सांगता अगदी सहज स्वतःच त्या बालसाधिकेला डबा भरून दिला. ते सद्गुरु आहेत; म्हणून स्वतःचे वेगळेपण ठेवत नाहीत. सतत शिष्यभावात राहून प्रत्येक सेवा सहज आपलेपणाने करतात. या प्रसंगात त्यांनी तिच्या आईच्या विभागातील अन्य साधकांनाही सांगितले की, प्रेमभाव म्हणून त्यांना डबा भरून द्यायला हवा. मला या प्रसंगातून त्यांची सहजता, दिसेल ते कर्तव्य, इतरांचा विचार आणि निरपेक्षता शिकायला मिळाली.
२. साधकांना नामजपादी उपाय शोधून देऊन त्वरित साहाय्य करणे
महाप्रसाद घेत असतांना सद्गुरु दादांना आध्यात्मिक त्रास होत असल्याचा साधकांचा दूरध्वनी येतो. तेव्हा ते जेवण थांबवून नामजपादी उपाय शोधून देतात. नंतर तो साधक भेटल्यावर त्याची प्रेमाने विचारपूस करतात. त्यामुळे त्या साधकाला बरे वाटते आणि त्याचा उत्साह वाढतो. कधी कधी साधकाला त्रासदायक शक्तीच्या आवरणामुळे त्रास होत आहे, हे कळत नाही. असा साधक सद्गुरु दादांच्या समोर आल्यावर ते स्वत: त्याची आपलेपणाने चौकशी करतात आणि नामजपादी उपाय सांगतात.
३. साधकांतील गुण पाहून अपार प्रेम करणे आणि त्यामुळे साधकांमध्ये पालट होणे
सद्गुरु दादांना सर्व साधकांचे स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू ठाऊक असूनही ते त्यांच्यावर अपार प्रेम करतात. त्यांच्या या वागण्यामुळे मलाही ‘साधकांचे दोष न बघता त्यांचे गुण बघून प्रेम करावे’, असे वाटू लागले. ‘सद्गुरु दादांच्या सहवासानेच स्वतःमध्ये पालट करावेत’, असे मला अंतःकरणापासून वाटते.
४. बालसाधकांच्या परीक्षेचे निकालपत्र पाहून त्यांचे कौतुक करून प्रोत्साहन देणे
आश्रमातील बालसाधकांचा परीक्षेचा निकाल लागला होता. मुले निकालपत्र घेऊन ते सद्गुरु दादांना भोजनकक्षात दाखवायला आली. तेव्हा सद्गुरु दादा अत्यंत प्रेमाने आणि कौतुकाने ते बघत होते. त्यांनी त्यांचे कौतुक केले. त्यांच्याकडून विविध गोष्टी जाणून घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे बालसाधक आनंदी झाले. त्यांना चांगले गुण मिळाले; म्हणून त्यांचे आणि त्यांच्या आई-वडिलांचेही सद्गुरु दादांनी अभिनंदन केले. मुलांना चॉकलेट्स दिली. ते लहान मुलांशी त्यांच्या सारखेच लहान हाेऊन बोलत होते. सद्गुरु दादांच्या या सर्व कृती बघतांना सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीलाच अनुभवता येऊन आनंद मिळत होता.
५. इतरांचा विचार करणे
सद्गुरु दादा स्वतःची कृती आणि बोलणे यांतून ‘इतरांचा विचार कसा करायचा ?’, ते शिकवतात. सद्गुरु दादा रहातात, त्या इमारातीचा जिना मी झाडत असतांना महाप्रसाद झाल्यावर सद्गुरु दादा थोडा वेळ मार्गिकेत फेर्या मारत होते. असे २ – ३ वेळा झाले. ते म्हणाले, ‘‘माझ्यामुळे तुम्हाला अडचण नको. मी माझी वेळ पालटतो.’’ दुसर्या दिवसापासून ते जिना झाडून झाल्यावर फेर्या मारू लागले.
६. सद्गुरु दादा श्रीकृष्ण वाटणे आणि त्यांच्या भेटीत कृष्ण भेटीचा आनंद मिळणे
कधी कधी सद्गुरु दादा श्रीकृष्ण वाटतात. त्यांचे सहज, निखळ हास्य, बोलणे मनाला प्रसन्न करून टाकते. त्यांची साधकांवरील निरपेक्ष प्रीती प्रत्येक क्षणी अनुभवायला येते. कधी कधी मी मनात श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असते, तेव्हा श्रीकृष्णाला भेटण्याची ओढ लागलेली असते. मन व्याकुळ होऊन त्याला शोधत असतांना सद्गुरु दादा भेटतात. तेव्हा ‘श्रीकृष्णच त्यांच्या माध्यमातून भेटत आहे’, असे मला अनुभवायला येते आणि माझे मन शांत अन् आनंदी होते. ‘त्यांच्या अंतःकरणात कृष्णस्वरूप गुरुमाऊलीप्रती असलेल्या अपार भावभक्तीमुळेच श्रीकृष्णाला त्यांच्या माध्यमातून यावे लागते’, असे मला अनुभवता येते. कृष्णाला भेटण्याची तळमळ असणार्या माझ्यासारख्या अनेक जिवांना कृष्णभेटीचा आनंद घेता येतो.
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली आणि श्री कृष्णा, सद्गुरु दादांचा आम्हाला आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेण्यासाठी आमची भावभक्ती वाढूदे, ही तळमळीने प्रार्थना.’
– कु. स्वाती बाळकृष्ण शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.८.२०२२)
|