सद्गुरु राजेंद्र शिंदे देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असतात. ते त्यांच्या लहान लहान कृतींतून साधकांना प्रेरणा देतात आणि घडवतातही. ९.९.२०२४ या दिवशी त्यांचा ६२ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने साधकाला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी त्यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. साधकांची साधना व्हावी, अशी तळमळ असलेले सद्गुरु राजेंद्रदादा !
१ अ. आश्रमात फिरून साधकांशी संवाद साधणे आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मार्गदर्शन करणे : ‘सद्गुरु राजेंद्रदादा दिवसातून ३ – ४ वेळा पूर्ण आश्रमातून फेरी मारतात. त्या वेळी ज्या साधकाला आवश्यक असते, त्याच्याशी ते संवाद साधतात. ३ – ४ वर्षांपूर्वी महाप्रसादाच्या वेळी ते प्रत्येक साधकाजवळ बसून त्याच्या साधनेतील अडचणी जाणून घ्यायचे आणि साधकाने ‘ती अडचण सोडवण्यासाठी काय केले पाहिजे ?’, याविषयी मार्गदर्शन करायचे. आश्रमातील अनेक साधकांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला.
१ आ. सद्गुरु राजेंद्रदादा घेत असलेले आणि साधकांच्या जीवनाला कलाटणी देणारे व्यष्टी साधनेचे आढावा सत्संग ! : सद्गुरु दादा देवद आश्रमात साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. हे आढावा सत्संग म्हणजे साधकांच्या जीवनाला कलाटणी देणारे अमृतच आहे. या सत्संगांतून अनेक साधकांच्या विचारप्रक्रियेत पूर्णतः पालट होतो आणि त्यांच्यात ‘सकारात्मकता वाढणे’, ‘साधनेची तळमळ वाढून दृष्टीकोन प्रगल्भ होणे’, ‘झोकून देऊन सेवा करण्याची सिद्धता होऊन तसे प्रयत्न होणे’, ‘सेवेतील उत्साह आणि कार्यक्षमता वाढणे’, इत्यादी पालट होतात, असे साधकांनी अनुभवले आहे. या आढावा सत्संगांमुळे अनेक साधकांची आध्यात्मिक उन्नती झाली असून काहींची संतपदाकडेही वाटचाल झाली आहे.
१ इ. सद्गुरु राजेंद्रदादांनी साधकांवर आश्रमातील सर्व कृती योग्य प्रकारे करून साधनेतील एक एक गुण मिळवण्याचा संस्कार करणे : एखाद्या साधकाला आश्रमात अथवा आश्रम परिसरात काही अयोग्य दिसले आणि त्याने योग्य कृती केल्याचे सद्गुरु दादांना दिसल्यास ते त्या साधकाला येथे साधनेचे गुण मिळाले, असे सांगतात. तो साधक योग्य कृती न करता तसाच पुढे गेल्यास साधनेचे गुण उणे झाले, असेही ते लक्षात आणून देतात, उदा. भोजनकक्षातील आसंद्या योग्य प्रकारे ठेवलेल्या नसल्या आणि एखाद्या साधकाने त्या व्यवस्थित ठेवल्यास त्याला ते गुण मिळाल्याचे सांगतात. यामुळे साधकांवर साधनेतील एक एक गुण मिळवण्याचा संस्कार होतो आणि अशा ‘लहान लहान कृती व्यवस्थित करणेही किती आवश्यक आहे ?’, हेही त्याच्या लक्षात येऊ लागते.
१ ई. सद्गुरु दादांनी छायाचित्रे काढतांना ‘ती व्यवस्थित यावीत’, यासाठी सर्व बाजूंनी विचार करणे आणि त्यामुळे प्रत्येक कृती परिपूर्णतेने करण्याचे महत्त्व साधकाच्या मनावर बिंबणे : ऑगस्ट २०२३ मध्ये देवद आश्रमातील काही साधकांसह मी रामनाथी आश्रमात गेलाे होतो. त्या वेळी सद्गुरु दादांनी सनातनच्या संत पू. रत्नमाला दळवी यांना आणि आम्हा साधकांना त्यांच्या फोंडा, गोवा येथील घरी बोलावले होते. त्यांच्या घरून निघतांना त्यांनी साधकांसह काही छायाचित्रे काढून घेतली. ती छायाचित्रे पाहून ते म्हणाले, ‘‘ही छायाचित्रे चांगली आली नाहीत. या छायाचित्रात प्रकाश नीट नाही, तसेच याची पार्श्वभूमीही व्यवस्थित नाही. आपण पुन्हा छायाचित्रे काढूया.’’ नंतर त्यांनी खोलीतील योग्य जागा शोधली. तेथील सर्व साहित्य बाजूला काढून ठेवले. आमच्यापैकी काहींना योग्य अंतरावर बसवून आणि काहींना उभे राहून २ – ३ छायाचित्रे काढण्यास सांगितली. ‘छायाचित्रात सर्व साधक नीट दिसत आहेत ना’, याची निश्चिती झाल्यावर त्यांनी पुढील छायाचित्रे काढण्यास सांगितले.
वरकरणी पहाता एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या वेळी एवढा वेळ देऊन, तसेच सर्व सिद्धता करून छायाचित्रे काढण्यासाठी कुणी एवढे कष्ट घेतले नसते. या प्रसंगातून मला शिकता आले की, ‘प्रत्येकच कृती परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.’
म्हणूनी आपण मंगलमूर्ती।
देवद आश्रमी आपण उत्साहमूर्ती।
व्यष्टी अन् समष्टी साधनेची स्फूर्ती।। १।।
वात्सल्यभावे साधते अखंड प्रीतीपूर्ती।
प्रोत्साहने होई साधकांची मनोकामनापूर्ती।। २।।
साधक अन् संतांसाठी नामजप करी ध्यानमूर्ती।
अध्यात्मप्रसार करूनी बनली चैतन्यमूर्ती।। ३।।
अनेक दैवी गुणांचे होते आपल्यात प्रकटन।
म्हणूनी आपण मंगलमूर्ती।। ४।।
– श्री. यज्ञेश सावंत (२०.०९.२०२३)
२. लोलकाचा प्रयोग करून ‘एक वस्तू अनिष्ट शक्तीने भारित आहे’, हे सद्गुरु दादांनी दाखवणे आणि वेगवेगळे उपाय करून वस्तूतील अनिष्ट शक्ती न्यून करणे
अनिष्ट शक्तींचा त्रास असलेल्या एका साधिकेने मला एक वस्तू वापरण्यासाठी दिली होती. ती वस्तू वापरायला लागण्यापूर्वी मी ती सद्गुरु दादांना दाखवली. तेव्हा त्यांनी त्या वस्तूवर प्रयोग म्हणून एक लोलक पकडला. तो लोलक वस्तूवरून उलट दिशेने फिरला. तेव्हा ‘त्यात अनिष्ट शक्ती आहे’, असे त्यांनी माझ्या लक्षात आणून दिले. त्यानंतर त्यांनी ती वस्तू स्वतःच्या हातात घेतली आणि तिच्यावर लोलक पकडला. तेव्हा लोलक थोडा सुलट दिशेने फिरला. तेव्हा त्यातील ‘अनिष्ट शक्ती थोडी न्यून झाली आहे’, हे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी ती वस्तू हातात घेऊन ५ मिनिटे नामजप केला. तेव्हा लोलक आणखी मोठ्या कक्षेत सुलट दिशेने फिरला. तेव्हा त्यातील अनिष्ट शक्ती आणखी घटल्याचे आमच्या लक्षात आले. नंतर ती वस्तू त्यांनी त्यांच्याकडील कपाटात ३ दिवस ठेवली आणि त्यातील अनिष्ट शक्ती पूर्ण नष्ट झाल्यावर मला दिली.
३. सद्गुरु दादांचे महत्त्व त्यांच्या नातेवाइकांच्याही लक्षात येऊ लागणे
काही वर्षांपूर्वी सद्गुरु दादा संतपदी विराजमान झाले. तेव्हा त्यांच्या नातेवाइकांना त्याचे विशेष महत्त्व वाटले नव्हते. त्यामुळे ते ‘संत’ या दृष्टीने सद्गुरु दादांकडे न पहाता त्यांचे ‘एक नातेवाईक’ म्हणून पहायचे. आता मात्र वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या अमेरिकेत असलेल्या एका नातेवाईकाने सद्गुरु दादांना शुभेच्छा संदेश पाठवला. त्यात त्यांचा ‘गुरुदेव’ असा उल्लेख केला.
देवद आश्रमातील आम्हा साधकांसाठी सद्गुरु राजेंद्रदादा एक आधारस्तंभच आहेत.’
श्री गुरुचरणार्पणमस्तु।
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (४.९.२०२३)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |