मुंबई – राज्यशासनाच्या स्वमालकीच्या आणि विजेची सुविधा नसलेल्या ३६ सहस्र ९७८ अंगणवाड्यांना सौर ऊर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय ५ सप्टेंबर या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
या अंगणवाड्यांना १ किलो वॅट क्षमतेचे पारेषण विरहित सौर संच आणि बॅटरी टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहेत. महाऊर्जा विभागाद्वारे ही कार्यवाही होणार आहे. यासाठी ५६४ कोटी रुपये व्यय करण्यास शासनाने संमती दिली आहे.
पुणे-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार !
पुणे-शिरूर-अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचा निर्णयही मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पुणे ते शिरूर हा ५३ किलोमीटरचा मार्ग ६ पदरी करण्यात येणार आहे. ‘एम्.एस्.आय.डी.सी.’कडून हे काम केले जाणार आहे. यासाठी ७ सहस्र ५१५ कोटी रुपये व्यय अपेक्षित आहे. शिरूर-अहिल्यानगर बाह्यवळण रस्ता मार्गे छत्रपती संभाजीनगर हा सध्याचा रस्ता सुधारण्यासाठी २ सहस्र ५० कोटी रुपये व्यय अपेक्षित आहे. यासह अमरावती येथे नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयाला मंत्रीमंडळामध्ये संमती देण्यात आली. यासह अन्य काही निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले.