तेल अविव (इस्रायल) – गाझा पट्टीत ६ ओलिसांचे मृतदेह सापडल्यानंतर इस्रायलमध्ये(Israel) संतापाची लाट उसळली. १ सप्टेंबरच्या रात्री विविध शहरांमध्ये अनुमाने ५ लाख ज्यूंनी निदर्शने केली. एकट्या राजधानी तेल अविवमध्ये ३ लाख लोक जमले होते. आंदोलक गटांनी ७ लाख लोक उपस्थित असल्याचा दावा केला आहे. या वेळी ६ हत्या केलेल्या ओलिसांच्या मृतदेहांचे प्रतीक म्हणून आंदोलकांनी ६ शवपेट्या हातात धरल्या होत्या. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू(Benjamin Netanyahu) आणि त्यांचे सरकार ओलिसांच्या सुटकेसाठी ठोस पावले उचलत नसून राजकीय कारणांसाठी ते तडजोड करू इच्छित नाहीत, असा आरोप करण्यात येत होता. या वेळी आंदोलन(Protest) करणार्या २९ जणांना पोलिसांनी कह्यात घेतले.
७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हमासने केलेल्या आक्रमणानंतर इस्रायलमधील हे सर्वांत मोठे आंदोलन आहे. इस्रायलमधील सर्वांत मोठी कामगार संघटना असलेल्या ‘जनरल फेडरेशन ऑफ लेबर’ने २ सप्टेंबापासून देशव्यापी संप पुकारला आहे. आरोग्य, वाहतूक आणि बँकिंग आदी क्षेत्रांतील ८ लाख कर्मचारी या संघटनेचे सभासद आहेत.
३० ऑगस्टला झाली होती ओलिसांची हत्या !
३० ऑगस्टच्या रात्री इस्रायली सैन्याने गाझामध्ये असलेल्या राफा येथील हमासच्या बोगद्यातून ६ ओलिसांचे मृतदेह बाहेर काढले होते. त्यांच्या डोक्यात अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात आढळून आले होते.
संपादकीय भूमिकाहमासने ओलीस ठेवलेल्या मूठभर ज्यूंसाठी ५ लाख ज्यू रस्त्यावर उतरतात, तर बांगलादेशातील सहस्रावधी हिंदूंवर अत्याचार चालू असतांना मूठभर हिंदुत्वनिष्ठ संघटना सोडल्या, तर अन्य हिंदू निष्क्रीय रहातात. अल्पसंख्यांक असो कि बहुसंख्यांक, हिंदूंची स्थिती दयनीय असण्यामागे हेच कारण आहे, हेच खरे ! |