नाशिक येथे म्‍हशीचे मांस बाळगणार्‍या वृद्धाला मारहाण करणार्‍यांविरोधात गुन्‍हा नोंद !

नाशिक – मुंबईहून सुटणार्‍या धुळे – सी.एस्.एम्.टी. एक्‍सप्रेसमध्‍ये गोमांस बाळगल्‍याच्‍या संशयावरून ७२ वर्षांच्‍या वृद्धाला तरुण मारहाण करत केल्‍याचा व्‍हिडिओ प्रसारित झाला आहे. या प्रकरणी रेल्‍वे पोलिसांनी तक्रार प्रविष्‍ट केली आहे. या प्रकरणी एम्.आय.एम्. पक्षाचे नेते आणि माजी खासदार इम्‍तियाज जलील यांनी ‘संबंधितांवर कडक कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे. तरुणांनी पडताळणी केल्‍यावर वृद्धाकडे म्‍हशीचे मांस असल्‍याचे आढळले. त्‍यानंतर त्‍याला मारहाण करण्‍यात आली.

रेल्‍वे पोलीस आयुक्‍तांनी या प्रकरणी गुन्‍हा नोंदवला आहे. संबंधित २ -३ तरुण धुळे जिल्‍ह्यातील असून त्‍यांना ठाणे येथे आणण्‍यात आले आहे. म्‍हशीच्‍या मांसावर बंदी नसल्‍याचे पोलिसांनी म्‍हटले आहे.

संपादकीय भूमिका

१-२ दिवसांपूर्वी दादरी येथे गोमांस खाल्‍ल्‍याच्‍या संशयावरून एका मुसलमानाचा मारहाणीत मृत्‍यू होणे, याआधीही त्‍याच गावात गोमांस ठेवल्‍याच्‍या कारणाने अकलाखची हत्‍या करणे आणि आता नाशिकमधील ही तिसरी घटना पहाता अशा घटना मुद्दामहून घडवून भारताला अस्‍थिर करण्‍याचे षड्‍यंत्र रचले जात नसेल कशावरून ?