चंद्रपूर येथील शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण निलंबित !

अखेर शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण निलंबित

नागपूर – चंद्रपूर येथील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती कल्पना चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या अनियमिततेची चौकशी झाल्यावर ‘त्यांना तात्काळ निलंबित करावे आणि त्यांच्या संपत्तीची विशेष अन्वेषण पथकाद्वारे चौकशी करावी’, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी पावसाळी अधिवेशन २०२४ मध्ये तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली होती. ‘एका आठवड्यात त्यांचा खुलासा प्राप्त होताच निलंबित करू’, असे उत्तर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात दिले होते. त्यानुसार शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे सहसचिव यांनी वरील कारवाई केली.

चंद्रपूर येथील माध्यमिक शिक्षण विभागात श्रीमती कल्पना चव्हाण ३ वर्षांपूर्वी रुजू झाल्या होत्या. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील अनेक शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची प्रकरणे प्रलंबित ठेवली जात होती. याविरोधात आमदार अडबाले यांच्या नेतृत्वात त्यांच्याविरुद्ध अनेकदा आंदोलने करण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

शिक्षणाधिकार्‍यांनी कामात अनियमितता करणे लज्जास्पद !