बनावट नळ जोडणी देणार्‍यांवर कारवाई न केल्यास पुन्हा आंदोलन करणार ! – विनायक येडके, उपतालुका प्रमुख, शिवसेना

शिवसेनेच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन सादर !

प्रतिकात्मक छायाचित्र

सांगली, २८ ऑगस्ट (वार्ता.) – येत्या ८ दिवसांत महापालिका पाणीपुरवठा विभागातील भ्रष्ट कर्मचारी नितीन आळंदे यांना बडतर्फ करावे, तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी अन् त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करून व्याजासह पैसे वसूल करावेत, याचसमवेत ग्राहक भावेश शहा यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आम्ही मानवाधिकार आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे दाद मागू, तसेच महापालिकेच्या दारात शिवसेना पद्धतीने आंदोलन करू, अशी चेतावणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विनायक येडके यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, २८ मार्चपासून शिवसैनिकांनी पाणीपुरवठा विभागातील भ्रष्टाचार आंदोलन करून पुराव्यानिशी कागदोपत्री उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला. या अंतर्गत माहिती अधिकाराखाली माहिती मागवली असता कायद्यानुसार ३० दिवसांमध्ये आम्हाला कोणतीही माहिती मिळाली नाही. पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी नितीन आळंदे यांच्याविषयी सर्व पुरावेही दिले आहेत. त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी उपोषण करून केली. त्यानंतर नितीन आळंदे यांच्यावर कारवाईचे आश्वासन देण्यात आले. त्या वेळी आळंदे यांचे मिरज येथे स्थानांतर करण्यात आले. त्यानंतरही आळंदे याने एक देयक संमत केले आहे. वखारभाग अग्रदूत पेपर परिसराजवळ ४०० मीटर एच्.डी.पी. ४ इंची जलवाहिनी घालण्यात आली, असे कागदोपत्री आहे. त्याचे देयक संमत झाले आहे. वास्तविकरित्या तेथे कोणतीही जलवाहिनी टाकलेली नाही. तरीही तिचे देयक काढण्यात आले. भावेश शहा यांनाही त्याने बनावट नळजोडणी दिली होती. हे सर्व असतांना महापालिका आळंदे आणि त्यांचे सहकारी यांना पाठीशी घालण्याचे काम महापालिका करत आहे.